पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ओएनजीसीच्या ‘सागर सम्राट’ ह्या महत्वाच्या प्रकल्पाचे केले मोबाईल ऑफशोअर उत्पादन युनिट म्हणून पुनर्राष्ट्रार्पण
ओएनजीसीने सरकार देत असलेल्या सुविधापूरक धोरणात्मक वातावरणाचा पुरेपूर उपयोग करवा, आणि ऊर्जा तसेच पेट्रोलियम क्षेत्रात देशाचे नेतृत्व करावे, अशी देशाची अपेक्षा आहे- केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
“भारताच्या उत्खननाची सरासरी 2025 पर्यंत 0.5 दक्षलक्ष चौरस किमी आणि 2030 पर्यंत 1.0 दशलक्ष चौरस किमीपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट”
2020 ते 2040 या काळात, एकूण जागतिक ऊर्जेपैकी 25 टक्के ऊर्जा भारतातून निर्माण होणार आहे.
Posted On:
28 JAN 2023 6:11PM by PIB Mumbai
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज म्हणजेच, 28 जानेवारी 2023 रोजी, मुंबईत सागर सम्राट इथे झालेल्या एका कार्यक्रमात, ओएनजीसी म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या महत्वाकांक्षी सागर सम्राट या मुंबईच्या पश्चिम सागरी किनाऱ्यापासून 140-145 किमी दूर असलेल्या सागरी तेल उत्खनन प्रकल्पाचे, ‘मोबाईल ऑफशोअर उत्पादन विभाग’ (MOPU) म्हणून पुनर्राष्ट्रार्पण केले. ‘ओएनजीसी जिंकेल, तर भारत जिंकेल’ अशी घोषणा पुरी यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमानंतर पुरी यांनी, ओएनजीसी च्या केंद्रीय विद्यालय, पनवेल फेज 2 इथल्या कार्यालयात जाऊन, ओएनजीसीचे ऊर्जा सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
हरदीप पुरी यांनी सागर सम्राट या उत्खनन विहिरीचा कार्यभार सांभाळणाऱ्या ओएनजीसी च्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली तसेच या प्रकल्पाला एमओपीयु मध्ये रूपांतरित करणाऱ्या चमूचीही त्यांनी भेट घेतली. त्याशिवाय, सत्तरच्या दशकात, ‘बॉम्बे हाय’ चा शोध लागल्यानंतर सागर सम्राट ह्या जहाजावर, सुरुवातीला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्यांनी सत्कार केला. त्यांनी ओएनजीसी च्या ऊर्जा सैनिकांना त्यांनी भारताच्या ऊर्जासुरक्षेसाठी पुढेही काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच, हरदीप पुरी यांनी असेही अधोरेखित केले की सागर सम्राट ही भारताच्या स्वतःचे तेल उत्खनन करण्याच्या दूरदृष्टीचे समर्पक उदाहरण आहे. भारताला जेव्हा जगाने, हायड्रोकार्बन उत्खनन क्षेत्रातील ‘नापीक’ भूमी म्हणून हिणवले जात होते, अशा वेळी भारताने स्वतःचे तेल उत्खनन करण्याचा निर्णय घेतला, हे महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
भारतातील सर्वात प्रमुख आणि विपुल तेलक्षेत्र असलेले ओएनजीसी, सातत्याने ज्ञानाचा पाठपुरावा, निरंतर उत्कृष्टता आणि तांत्रिकदृष्ट्या विकसित होण्याच्या दिशेने कटिबद्ध होऊन प्रयत्न करत आहे, असे पुरी यावेळी म्हणाले. "सागर सम्राटचा वारसा ओएनजीसीसाठी आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हुतात्मा झालेल्या अधिकाऱ्यांच्या स्मृतींचा सन्मान करणार आहे", असेही ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी सागर सम्राटवरील कर्मचारी आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांचा सत्कार केला.
ओएनजीसी भारताच्या नवीन आशा आणि अपेक्षांसाठी स्वत:ला नव्या उमेदीने NOC- नॅशनल ऑइल कंपनी या नात्याने पुनर्विकसित करत आहे, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री यांनी व्यक्त केला. सरकार आज पेट्रोलियम उद्योगांसाठी जे सुविधापूरक धोरणात्मक वातावरण निर्माण करत आहे, त्याचा पुरेपूर लाभ घेत, ऊर्जा आणि पेट्रोलियम क्षेत्रात ओएनजीसी ने नेतृत्व करावे, अशी देशाची या तेल कंपनीकडून अपेक्षा आहे, असेही ते पुढे म्हणाले.
भारताचे उत्खनन क्षेत्र 2025 पर्यंत 0.5 दशलक्ष चौरस किमीपर्यंत वाढवण्याचा तसेच, 2030 पर्यंत 1.0 दशलक्ष चौ. किमी. पर्यंत वाढवण्याचा भारत सरकारचा मानस आहे, असेही केंद्रीय मंत्री यावेळी म्हणाले.
भारत आज जगातील, सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून, जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जा ग्राहक देश आहे. तसेच चौथ्या क्रमांकाचा तेल शुद्धीकरण करणारा देश, असून, तिसऱ्या क्रमांकाचा, कच्चे तेल खरेदीदार देश आहे. तसेच, सहाव्या क्रमांकाचा पेट्रोलियम पदार्थांचा आयातदार देशही आहे, आणि सातव्या क्रमांकांचा पेट्रोलियम उत्पादनांचा निर्यातदार देश आहे, अशी माहिती पुरी यांनी दिली. 2040 पर्यंत भारताची ऊर्जाविषयक गरज, वार्षिक 3 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, सध्या हे प्रमाण 1 टक्के इतके आहे. त्याशिवाय, 2020 ते 2040 या काळात, एकूण जागतिक उर्जेपैकी 25% टक्के ऊर्जा भारतातून निर्माण केली जाईल, कारण, आपली वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, यामुळे आपण या क्षेत्रात वेगाने पुढे जाऊ, असे ते म्हणाले.
मात्र आज भारत आपल्या गरजेच्या 85% पेट्रोलियम आयात करतो आणि त्यावर आपण आर्थिक वर्ष 2021-22 सुमारे 120 अब्ज डॉलर्स खर्च केले, असे सांगत, भारताचा अमृत काळ खऱ्या अर्थाने अस्तित्वात आणायचा असेल, तर त्यासाठी, 2047 पर्यंत देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण झाल्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले
सागर सम्राट MOPU बद्दल माहिती :
1973 साली सुरु झालेले, सागर सम्राट मित्सुबिशी यार्डमध्ये बांधले गेले. 32 वर्षांमध्ये, सागर सम्राट जहाजाने जवळपास 125 विहिरी खोदल्या आहेत. भारतातील 14 प्रमुख ऑफशोअर तेल आणि वायू शोधांमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. सुरुवातीला एक जॅक-अप ड्रिलिंग रिग असलेले सागर सम्राट आता मोबाईल ऑफशोअर प्रोडक्शन युनिट (MOPU) मध्ये रूपांतरित झाले आहे. एमओपीयू सागर सम्राटने 23 डिसेंबर 2022 रोजी उत्पादन सुरू केले.
हे जहाज सध्या पश्चिम किनाऱ्याच्या मुंबईच्या पश्चिमेला 140-145 किलोमीटर अंतरावर असलेल्या (WO)-16 या फील्डवर तैनात आहे. MOPU ची क्षमता दररोज 20,000 बॅरल कच्च्या तेलाची हाताळणी करण्याइतकी आहे. त्याची कमाल निर्यात गॅस क्षमता प्रति दिन 2.36 दशलक्ष घनमीटर इतकी आहे.
***
S.Kakade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894381)
Visitor Counter : 245