आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत, iNNCOVACC (इन कोव्हॅक) या जगातील पहिल्या नाकावाटे घ्यायच्या कोविड-19 लसीचं केलं अनावरण
जगातील नाकावाटे घ्यायची ही पहिली कोविड 19 लस, म्हणजे एकप्रकारे आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला गौरवास्पद मानवंदना आहे: डॉ. मनसुख मांडवीय
विकसनशील देशांमध्ये सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या आजारांसाठी लस आणि औषधं विकसित करण्यात भारतानं आघाडी घेतली आहे: डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
26 JAN 2023 6:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी आज केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत iNNCOVACC COVID19(इन कोव्हॅक कोविड 19) या लसीचं अनावरण केलं. लसीकरण सुरू करताना सुरुवातीला दोन मात्रांमध्ये घ्यायची आणि हेटरोलॉगस बूस्टर डोस म्हणजे आधी घेतलेल्या कुठल्याही प्रकारच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीनंतर घेता येणारी वर्धक मात्रा म्हणून मान्यता मिळालेली, इन कोव्हॅक ही जगातील नाकावाटे घ्यायची पहिली कोविड 19 लस आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत असलेल्या, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स (BIRAC) , या जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकार्यासाठी असलेल्या सार्वजनिक उपक्रमाच्या सहकार्यानं, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (BBIL) नं, ही लस विकसित केली आहे.

जगात पुरवठा होत असलेल्या लसींपैकी 65 टक्के लसींचा पुरवठा भारतातून होतो, असं या कार्यक्रमात आनंद व्यक्त करत डॉ. मांडवीय म्हणाले. नाकावाटे घ्यायची जगातील पहिली कोविड लस विकसित केल्याबद्दल BBIL चा चमू आणि जैवतंत्रज्ञान विभागाचं अभिनंदन करून, त्यांनी सांगितलं, "जगातील नाकावाटे घ्यायची ही पहिली कोविड 19 लस भारतानं विकसित करणं, म्हणजे एकप्रकारे आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला गौरवास्पद मानवंदना आहे".

केंद्रीय आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, दर्जेदार आणि स्वस्त औषधांच्या निर्मितीमध्ये ठसा उमटवल्यामुळे भारताच्या लस उत्पादन आणि नवोन्मेष क्षमतेचं जगभरात कौतुक होत आहे. जगात कोविड प्रतिबंधात्मक पहिली लस आल्यानंतर एक महिन्याच्या आत, BBIL नं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (ICMR)च्या सहकार्यानं भारतात को-व्हॅक्सिन या कोविड प्रतिबंधात्मक लसीचं उत्पादन केलं, याची सुद्धा मांडवीय यांनी यावेळी आठवण करुन दिली.
जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य (BIRAC) संस्थेच्या सहयोगाने आणखी एक लस शोधून काढल्याबद्दल, बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (BBIL) चे अभिनंदन करताना डॉ जितेंद्र सिंग म्हणाले की, "विकसनशील जगात सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या आजारांसाठी लस आणि औषधे विकसित करण्यात भारताने आघाडी घेतली आहे". “मिशन कोविड सुरक्षा” सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आणि ते सुलभ करण्यात पंतप्रधानांनी केलेला वैयक्तिक हस्तक्षेप आणि नियमित देखरेख याला त्यांनी या यशाचे श्रेय दिले. याने केवळ आत्मनिर्भर भारताला बळ दिले नाही, तर लस विकास आणि उत्पादनाचे जागतिक केंद्र म्हणून भारताचा दर्जा उंचावला असून, यामधून भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमतेचे सामर्थ्य दिसून येते. असंसर्गजन्य रोगांसाठी लस विकसित करणे, ही यापुढील पायरी असेल”, ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, 12 वर्षे किंवा त्या पुढील वयाची मुले आणि प्रौढांसह मानवाला दिली जाणारी झायकोव-डी (ZyCoV-D) ही जगातील पहिली आणि भारताची स्वदेशी विकसित कोविड-19 ची डीएनए आधारित लस, BIRAC ने ‘मिशन कोविड सुरक्षा’ अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या भागीदारीने विकसित केली आहे.

आगाऊ मागणी नोंदवणाऱ्या खासगी रुग्णालयांमध्ये iNCOVACC या लसीचा वापर सुरू होण्याची अपेक्षा आहे. वर्षाला अनेक दशलक्ष मात्रांचे उत्पादन करण्याची प्राथमिक क्षमता विकसित करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार ही क्षमता वर्षाला काही अब्ज मात्रांपर्यंत वाढवता येईल. राज्य सरकारे आणि भारत सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील खरेदीसाठी iNCOVACC लसीची किंमत 325 रुपये प्रति डोस/मात्रा इतकी निश्चित करण्यात आली आहे.
जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ राजेश गोखले, तंत्रज्ञान विकास मंडळाचे सचिव राजेश कुमार पथक आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. भारत बॉयोटेकचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ कृष्णा ईला आणि भारत बॉयोटेकच्या सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा ईला हे देखील उपस्थित होते.
R.Aghor/Ashutosh/Rajashree/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1893959)