संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली इथे झालेल्या सर्वोच्च समितीच्या बैठकीत एअरो इंडिया 2023 च्या तयारीचा घेतला आढावा

Posted On: 24 JAN 2023 3:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 24 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या सर्वोच्च समितीच्या बैठकीत आगामी एअरो इंडिया शोच्या तयारीचा आढावा घेतला. कर्नाटकमध्ये बंगळूरू इथे 13-17 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आशियातील सर्वात मोठ्या, 14 व्या एअरो शोच्या व्यवस्थेची तपशीलवार माहिती संरक्षण मंत्र्यांना देण्यात आली. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांना सुसज्ज  व्यवस्था सुनिश्चित करण्याचे आवाहन  राजनाथ सिंह यांनी सर्व भागधारकांना केले. ते म्हणाले, एअरो इंडिया 2023 हा केवळ एक कार्यक्रम नसून, भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस (हवाई क्षेत्र) मधील वाढत्या वर्चस्वाचे आणि प्रबळ आणि आत्मनिर्भर ‘नव्या भारताच्या’ उदयाचे प्रदर्शन असेल.

येलाहंका इथल्या हवाई तळाच्या  सुमारे 35,000 चौ.मी. परिसरात, आयोजित  'अब्जावधी संधींची धावपट्टी' या संकल्पनेवरचे पाच दिवसांचे हे प्रदर्शन , आतापर्यंतचा सर्वात मोठा एअरो शो असेल. आतापर्यंत 731 प्रदर्शकांनी कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे.

संरक्षण मंत्र्यांनी निदर्शनास आणले की भारतीय संरक्षण उद्योग परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे, आणि खासगी क्षेत्राचा सक्रीय सहभाग या परिवर्तनाला चालना देणारा सर्वात मोठा घटक आहे.

एअरो  इंडिया हा एक व्यावसायिक कार्यक्रम असला तरी, इतर देशांबरोबरचे भारताचे संबंध मजबूत करणे, हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राज्य सरकारचे अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे या बैठकीत सहभागी झाले, तर संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते.

 

 

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893246) Visitor Counter : 163


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu