आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी-20 भारत आरोग्य ट्रॅक


केरळच्या तिरूअनंतपुरम इथे जी-20 आरोग्य कार्यगटाच्या पहिल्या बैठकीच्या उद्घाटनसत्राला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एस.व्ही मुरलीधरन यांनी केले संबोधित

पहिल्या सत्रात भविष्यातील आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याच्या सज्जतेवर भर

दुसऱ्या सत्रात सुरक्षित, प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि वाजवी दरात वैद्यकीय सेवा-सुविधा सुनिश्चित करण्यासाठीचा सहकार्यात्मक आराखडा तयार करण्याबाबत विचारमंथन

Posted On: 18 JAN 2023 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2023

 

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील, जी-20 आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक सध्या केरळच्या तिरूअनंतपुरम इथे सुरू आहे. यात,सदस्य, आमंत्रित देशांचे पाहुणे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे निमंत्रित प्रतिनिधी सहभागी झाले होते.

बैठकीच्या पहिल्या दिवशीच्या सत्रात, बहुविध विषयांवर विचारमंथन झाले. उद्घाटन सत्रात, भारताच्या आरोग्य क्षेत्राशी संबंधित तीन प्रमुख मुद्यांवर सविस्तर चर्चेत भर देण्यात आला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवारकेंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, एस. व्ही. मुरलीधरन यांची प्रमुख भाषणं झाली. भारताचे आरोग्य धोरण निश्चित करतांना, त्यात भारताच्या महामारीच्या काळातील धोरणाचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा. कारण, आजच्या बहुक्षेत्रीय आणि एकमेकांशी जोडलेल्या जगात, असे कुठलेही मोठे आरोग्यविषयक संकट आले, तर, ते देशात आर्थिक संकटही निर्माण करू शकते. हे लक्षात घेऊन धोरण ठरवले जावे. असे मत, भारती पवार यांनी व्यक्त केले.

त्यांच्या भाषणानंतर, ट्रोइका देशांनी (इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील) आपली मते मांडली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी साथीच्या आजारांचा प्रतिबंध, तयारी, प्रतिसाद आणि सर्व उपाययोजनांचा समन्वय असे मुद्दे अधोरेखित केले. तसेच सर्वसमावेशक आणि शाश्वत दृष्टिकोन, एएमआर आणि वन हेल्थवर सातत्याने लक्ष केंद्रित करणे, लस चिकित्सापद्धती आणि निदान यासाठी  ब्लू प्रिंट विकसित करणे, देशांसाठी जागतिक नेटवर्क सुसंगत करणे, डिजिटल आरोग्यावर एकमत निर्माण करणे आणि त्यासाठी निधी गोळा करणे अशा विषयांवरही त्यांनी भारताची भूमिका मांडली.

"आरोग्यविषयक आपत्कालीन स्थिती आणि प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद" या विषयावरील पहिल्या सत्रादरम्यान, जागतिक आरोग्य विषयाचे राजदूत आणि स्वीडन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे डॉ. अँडर्स नॉर्डस्ट्रॉम, नीती आयोगाचे सदस्य विनोद पॉल, आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या महामारी आणि साथरोग विभागाच्या संचालक डॉ. सिल्वी ब्रायंड ह्या प्रमुख वकत्यानी आपली मते मांडली. डॉ. पॉल यांनी CoWIN प्लॅटफॉर्म आणि गेल्या काही वर्षांत भारतात विकसित केलेल्या इतर डिजिटल आरोग्य विषयक कामांची सविस्तर माहिती दिली. भारताने कोविन प्लॅटफॉर्मचा उपयोग संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कसा केला, याची माहिती दिली.

दुसऱ्या सत्रादरम्यान, WHO च्या माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी VTDs च्या पायाभूत संरचनेवर आधारित असलेल्या "सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि परवडणाऱ्या  वैद्यकीय सेवा सुविधांची उपलब्धता व्यापक करण्यावर भर देत  औषधनिर्माण क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे"  यावर मार्गदर्शन केले. क्लिनिकल चाचण्यांच्या पद्धती बळकट करण्याबरोबरच प्रभावी संशोधन आणि विकासाची गरज  त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण होणे आणि विविधांगी उत्पादकतेचे महत्त्व त्यांनी सांगितले. हे साध्य करण्यासाठी संशोधन आणि विकासाचे जाळे उभारणे आणि सहकार्य यावर त्यांनी भर दिला.

बैठकीच्या पहिल्या दिवशी द्विपक्षीय चर्चासत्रासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. कार्यक्रमात कॅलिग्राफी (मल्याळम) सोबत कथकली प्रात्यक्षिक, कलामेझुथ, सरप्पाक्कलम अशा स्थानिक पारंपरिक कला सादर करण्यात आल्या. पहिल्या दिवसाची सांगता, ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारित  मल्टीमीडिया कार्यक्रमाने झाली.

  N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1892067) Visitor Counter : 208
Read this release in: English , Urdu , Hindi