विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आंतरराष्ट्रीय मेगा प्रकल्पविषयक भारत-फ्रांस खगोलशास्त्र बैठकीत येत्या दशकातील वैज्ञानिक दृष्टिकोनावर चर्चा
Posted On:
17 JAN 2023 8:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2023
भारत आणि फ्रांस यांच्यात ‘स्क्वेअर किलोमीटर अॅरे ऑब्झर्व्हेटरी (एसकेएओ)/ मौनाकेआ स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सप्लोरर (एमएसई) अँड मल्टीवेव्हलेंथ सिनर्जी' या विषयावर झालेल्या बैठकीत, भारत-फ्रांस खगोलशास्त्र विज्ञानाचा येत्या दशकातील दृष्टिकोन कसा असावा आणि मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत, अवकाशात असलेल्या लहरींबाबत समन्वय अशा विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यात, खगोलशास्त्रात दोन्ही देशांमध्ये सर्वसमावेशक दीर्घकालीन भागीदारी निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एस चंद्रशेखर या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी, दोन्ही देशांसाठी खगोलशास्त्र कसे महत्वाचे आहे, हे विशद केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था, भारतीय खगोलविज्ञान संस्थेने आयोजित केलेल्या या परिषदेत या क्षेत्रात दोन्ही देश एकत्रित कसे प्रगती करू शकतील, यावर चर्चा झाली.तसेच सीईएफआयपीआरए ही दोन्ही देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक द्वीपक्षीय अत्याधुनिक कार्यक्रमांना पाठबळ देऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे पाठबळ असलेल्या ‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर द प्रमोशन ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्च’ (IFCPAR/CEFIPRA) या संस्थेमार्फत बंगळुरूमधील आयआयए परिसरात 9 ते 13 जानेवारी दरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती. खगोलशास्त्रातील द्विपक्षीय भागीदारीच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी युरोप आणि भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, फ्रांस सरकारची सेंटर नॅशनल डे ला रेचेर्चे सायंटिफिक (CNRS), ही संस्था, यांनी खगोलशास्त्रातील उभय सहकार्यातून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांवर चर्चा केली.
यात, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये असणारी आगामी आंतरराष्ट्रीय रेडिओ वेधशाळा, स्क्वेअर किलोमीटर अॅरे ऑब्झर्व्हेटरी (SKAO), ज्यात भारत आणि फ्रान्स हे दोन्ही प्रमुख भागीदार असणार आहेत, त्याविषयी आणि अमेरिकेतील मौनाकेआ स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सप्लोरर संयुक्त मोहिमेविषयी चर्चा करण्यात आली.
त्याशिवाय, येत्या दशकातील सहकार्याची क्षेत्रे आणि इंडो-फ्रेंच खगोलशास्त्र क्षेत्रातली दूरदृष्टी याची मांडणी करण्यासाठीच्या अनेक प्रकल्पांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या परिषदेत दोन्ही देशांच्या संयुक्त प्रकल्पांवर तसेच भारत आणि फ्रान्समधील खगोलशास्त्रज्ञ ज्यात एकमेकांना सहकार्य करू शकतील अशा प्रमुख वैज्ञानिक प्रश्नांवरही चर्चा झाली.
तसेच विद्यार्थ्यांसाठी, डेटा विश्लेषणावर प्रशिक्षण सत्रही या बैठकीत झाले. त्याशिवाय, खगोलशास्त्र क्षेत्रात लैंगिक समानता, वैविध्य आणि सर्वसमावेशकता आणण्यावरही भर देण्यात आला. तसेच लोकसंपर्क आणि विद्यार्थी सहभाग वाढवणे यावरही चर्चा झाली.
भारताच्या, आदित्य-L1 ही सौर अंतराळ मोहीम, भारतीय स्पेक्ट्रोस्कोपिक स्पेस टेलिस्कोप, राष्ट्रीय भव्य सौर दुर्बिण, नॅशनल लार्ज ऑप्टिकल टेलिस्कोप अशा भविष्यातील नियोजित प्रकल्पांवरही परिषदेत चर्चा करण्यात आली. या बैठकीत दोन्ही देशांतील सुमारे 100 शास्त्रज्ञ, अभियंते आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
अनेक आगामी आंतरराष्ट्रीय टेलिस्कोप मेगा-प्रोजेक्ट्समध्ये भारत आणि फ्रान्स भागीदार आहेत. दोन्ही देशांमधील अनेक संस्था विविध चालू आणि पूर्ववर्ती प्रकल्पांचे नेतृत्व करत आहेत. या बैठकीला दिल्ली आणि बंगळुरू येथील फ्रेंच दूतावास, आंतरराष्ट्रीय खगोलविज्ञान संघटना, खगोलविज्ञान क्षेत्रातील महिला समूह, तसेच भारत आणि फ्रान्समधील एसकेए कम्युनिकेशन ऑफिस यांनीही पाठबळ दिले.
* * *
S.Kakade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891866)
Visitor Counter : 179