वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
लवचिक पुरवठा साखळी उभारणे, व्यापार वाढवणे आणि पर्यटनाला चालना देणे या उद्देशाने ग्लोबल साउथ देशांदरम्यान नव्या भागीदारीला प्रोत्साहन देण्याचा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा आग्रह
Posted On:
13 JAN 2023 10:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2023
भारताने 12 आणि 13 जानेवारी 2023 या रोजी ‘आवाजातील एकता, उद्देशातील एकता’ या संकल्पनेवर आधारित ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल युथ’ या शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेची उद्घाटनपर तसेच समारोप सत्रे राज्यांचे किंवा सरकारचे प्रमुख या पातळीवर घेतली गेली तसेच भारताच्या संबंधित कॅबिनेट मंत्र्यांनी एकूण 8 मंत्रीस्तरीय सत्रे घेतली.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी आज वाणिज्य आणि व्यापार मंत्र्यांचे सत्र घेतले. हे सत्र ‘दक्षिणेकडील देशांमध्ये सुसंवाद विकसित करताना: व्यापार,तंत्रज्ञान,पर्यटन,साधनसंपत्ती.’ बेनिन,बोस्निया आणि हर्जेगोव्हिना, बुरुंडी,सेन्ट्रल आफ्रिकी प्रजासत्ताक, कोट डी आयव्हर, काँगोप्रजासत्ताक, गबन,हैती,मलेशिया,म्यानमार,दक्षिणी सुदान, तिमोर लेस्ते आणि झिम्बाब्वे या 13 देशांच्या मंत्र्यांनी आजच्या सत्रात भाग घेतला.
सत्राच्या सुरुवातीचे भाषण करताना केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, जगातील दक्षिणेकडील देशांनी नव्या भागीदारी तसेच यंत्रणांचा विचार करायला हवा, जेणेकरून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत या देशांचा सहभाग प्रतिबिंबित होईल. ग्लोबल साउथ देशांच्या समस्या तसेच जी-20, संयुक्त राष्ट्रे यांच्यासारखे महत्त्वाचे जागतिक मंच आणि इतर बहुपक्षीय यंत्रणांसमोर उभ्या असलेल्या समस्यांकडे लक्ष देणे हा या शिखर परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
आता ग्लोबल साउथ देशांचे जगाच्या आर्थिक विकासात निम्म्याहून अधिक योगदान आहे आणि या देशांदरम्यान होणारा व्यापार 2021 मध्ये 5.3 ट्रिलीयन डॉलर्स इतका झाला होता यावर त्यांनी अधिक भर दिला. आपल्या सगळ्या देशांच्या परस्पर हितासाठी व्यापारविषयक वाढीव संबंध जोपासण्याचा आग्रह त्यांनी धरला.
वर्ष 2008 पासून डीएफटीपी योजनेच्या माध्यमातून भारत सर्वात कमी प्रमाणात विकसित देशांसाठी एकतर्फी कर मुक्त पद्धतीने बाजार उपलब्ध करून देत आहे याचा उल्लेख करून ते म्हणाले की, दक्षिणेकडील देशांशी प्राधान्यक्रमांचे व्यापारी करार करण्यासाठी भारताची तयारी आहे.
दक्षिणेकडील देश जगातील गुंतवणूक वाढविण्यासाठी देखील मदत करत आहे असे केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले. भारतीय कंपन्या, दक्षिणेकडील देशांसह इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. विकसनशील देशांमधील आर्थिक सहकार्यामुळे जागतिक पातळीवरील धोरणविषयक चर्चांमध्ये अधिक प्रमाणात सहभागी होण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाला आकार देण्यासाठी हे देश अधिक सक्षम होत आहेत असे ते म्हणाले.
विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर अधिक भर देत केंद्रीय मंत्री गोयल यांनी भारताचा अनुभव सामायिक करत सर्वांना सांगितले की, समावेशक डिजिटल स्थापत्यातून सामाजिक आर्थिक परिवर्तन घडून येऊ शकते.
भाषणाच्या शेवटी ते म्हणाले की भारत स्वतःचा विकासात्मक अनुभव ग्लोबल साउथ देशांशी सामायिक करण्यास तयार आहे, आणि इतर सदस्य देशांकडून नव्या गोष्टी शिकून घेण्यासाठी तसेच आपल्या समान चिंतेच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आणि आपल्या संयुक्त शाश्वत आणि समावेशक विकासासाठी सहकार्य करण्यास उत्सुक आहे.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891149)
Visitor Counter : 168