राष्ट्रपती कार्यालय

भारताच्या राष्ट्रपतींनी 17 व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित केले आणि प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केले

Posted On: 10 JAN 2023 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जानेवारी 2023

 

भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मु यांनी आज (10 जानेवारी, 2023) इंदूर, मध्य प्रदेश येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित केले आणि प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय समुदाय आज  जागतिक व्यवस्थेतील एक महत्वाची आणि अद्वितीय शक्ती बनला आहे. तो प्रत्येक प्रदेशात उत्साही आणि आत्मविश्वासाने समृद्ध समुदाय म्हणून विकसित झाला आहे आणि नेतृत्वाच्या पदांवर जागतिक घडामोडींमध्ये उत्कृष्ट योगदान देत आहे. भारतीय समुदायाने असामान्य समर्पण आणि कठोर परिश्रम प्रदर्शित केले आहेत, आणि कला, साहित्य, राजकारण, क्रीडा, व्यवसाय, शिक्षण, परोपकार, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी अनेक आव्हानांवर मात केली आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की गेल्या दोन दशकांमध्ये प्रवासी भारतीय दिवस परिषदेने सरकार, भारतातील लोक आणि भारतीय समुदाया दरम्यानचा संपर्क फलदायी ठरावा, यासाठी आगळे  व्यासपीठ म्हणून भूमिका बजावली आहे.

प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार हे भारतीय समुदायाच्या सदस्यांनी भारतासाठी आणि ते राहात असलेल्या देशांसाठी दिलेल्या योगदानाला देशाने दिलेल्या मान्यतेचे सवोच्च प्रतीक आहे.

हे पुरस्कार महत्वाचे आहेत, कारण ते केवळ प्रवासी भारतीयांच्या कामगिरीप्रति प्रशंसा आणि मान्यता व्यक्त करत नाहीत, तर भारताचा ध्वज जगात उंच फडकत ठेवण्याच्या त्यांच्या संकल्पावरचा आपला विश्वास देखील प्रतिबिंबित करतात.

राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय समुदायाची सामूहिक शक्ती आणि क्षमता देशाच्या सर्वसमावेशक विकासाला चालना देणारी ठरेल. भारतीय समुदायाच्या प्रत्येक सदस्याने या प्रवासाचे पूर्ण भागीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आत्मनिर्भर भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आपली क्षमता वाढवण्यासाठी ते आपली ऊर्जा, अनुभव, कल्पना, व्यावसायिक कौशल्य, गुंतवणूक, तांत्रिक कौशल्य आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणी द्वारे योगदान देऊ शकतात, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1890132) Visitor Counter : 193


Read this release in: English , Urdu , Hindi