परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

'जी-20' परिषदेच्या तयारीचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा


परिषदेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी योग्य समनव्य राखण्याची पालक मंत्र्यांची सूचना

Posted On: 09 JAN 2023 3:57PM by PIB Mumbai

पुणे, 9 जानेवारी 2023

 

पुण्यात होणार असलेल्या जी-20 परिषद बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शहरातील तयारीचा आढावा घेतला. पुढील आठवड्यात होणाऱ्या या बैठकीसाठी विविध 38 देशांचे मिळून अंदाजे 200 प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत . लोहगाव विमानतळावर हे प्रतिनिधी उतरल्यापासून ते सेनापती बापट मार्गावरील बैठकीच्या ठिकाणापर्यंत च्या मार्गाची आज पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि या मार्गावरील शिल्लक त्रुटी दूर करण्याबद्दलच्या आवश्यक त्या सूचना दिल्या. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेची सुद्धा त्यांनी पाहणी केली.

   

त्यानंतर जी-20 परिषदेच्या बैठका होणार असलेल्या ठिकाणीच पाटील यांनी पुण्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. या वेळी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   

जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहर सुशोभीकरण, परदेशी प्रतिनिधींची सुरक्षा आणि शहरातील सुलभ वाहतूक, त्याचबरोबर त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य या मुद्द्यांवर यावेळी व्यापक चर्चा झाली. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी जी-20 बैठकांच्या आयोजनाबद्दलचे सादरीकरण केले  आणि विविध शासकीय यंत्रणांवर सोपवण्यात आलेल्या जबाबदारी विषयी पाटील यांना माहिती दिली. या बैठकांच्या निमित्ताने महापालिका, राज्य पर्यटन विकास महामंडळ, राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि महिला बचत गटांची स्वतंत्र दालने उघडली जाणार असून त्यात अनेकविध वैशिठ्य पूर्ण वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.  या तयारीचा आढावा घेतल्यानंतर सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेऊन पुण्यातील जी-20 बैठकांचे आयोजन यशस्वी पणे पार पाडावे अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

   

पुण्याबरोबरच महाराष्ट्र आणि देशाच्या समृद्ध वैभवशाली परंपरेचे दर्शन या निमित्ताने उपस्थित प्रतिनिधींना घडविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. पुण्यात होणाऱ्या जी-20 बैठकांमधून प्रामुख्याने वाढते शहरीकरण आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा यावर विचार मंथन होणार असल्याचे ते म्हणाले.

पुणे विद्यापीठात या पाहुण्यांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले जाणार आहेत. त्यात लावणीची जुगलबंदी, शिव वंदना, गणेशस्तुती आणि गोंधळ आदींचा समावेश राहणार आहे. याशिवाय खास मराठमोळ्या पद्धतीने फेटा बांधून आणि ढोल ताशाच्या गजरात परदेशी प्रतिनिधींचे स्वागत केले जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

* * *

(Source: DIO) | PIB Pune | M.Iyengar/VS/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1889762) Visitor Counter : 282


Read this release in: English