संरक्षण मंत्रालय

दक्षिण कमांड लष्करी दंतचिकित्सा केंद्रातील तंत्रज्ञानयुक्त निवास संकुलाचे उद्‌घाटन

Posted On: 05 JAN 2023 8:07PM by PIB Mumbai

पुणे, 5 जानेवारी 2023

 

लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए.के.सिंग (एव्हीएसएम, वायएसएम,एसएम,व्हीएसएम) यांनी आज दक्षिण कमांड परिसरातील लष्करी दंतचिकित्सा केंद्रातील  नव्या तंत्रज्ञानयुक्त निवासी संकुलाचे उद्घाटन केले. ही सुविधा रुग्णसेवेप्रती समर्पित करण्यात आली आहे.

लष्करी दंतचिकित्सा केंद्राचे मुख्य अधिकारी आणि मुख्य दंतरोग सल्लागार आणि  मेजर जनरल विनीत शर्मा व्हीएसएम यांनी येणाऱ्या दशकांमध्ये या  नव्या पायाभूत सुविधेमुळे रुग्णसेवेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची माहिती दिली.

ते म्हणाले की, या बहुप्रतीक्षित सुधारणा घडून आल्यामुळे, आरोग्य सेवा देणाऱ्यांना कामासाठी अधिक जागा उपलब्ध होईल.  तसेच  शस्त्रक्रियांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि गुंतागुंतीच्या प्रक्रिया करणे सोपे होईल. या निवासी सुविधेमध्ये रोपण क्रियेनंतरचे पुनर्वसन, डे केअर सुविधा तसेच कॉन्शस सिडेशन आधारित आणि लेसर किरणांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या प्रक्रिया यांच्यासाठी वेगवेगळ्या कक्षांची सोय आहे अशी माहिती त्यांनी दिली. त्याबरोबरच, ही सुविधा कार्यान्वित झाल्यामुळे दंतचिकित्सा क्षेत्राच्या सर्व उपशाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व श्रेणीच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील तांत्रिक प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीने उत्तेजन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

या प्रसंगी, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए.के.सिंग यांनी नव्या संकुलात उभारण्यात आलेल्या सुविधांची प्रशंसा केली. तसेच नव्या सुविधांमुळे या केंद्रात दिल्या जाणाऱ्या दंतचिकित्साविषयक सेवांना अधिक चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अत्यंत कमी कालावधीत या नव्या संकुलातील कार्यात्मक घटकांची उभारणी केल्याबद्दल ले. जन. सिंग यांनी युनिटमधील सहभागी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

 M.Iyengar/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888990) Visitor Counter : 138


Read this release in: English