विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी विज्ञान,तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक - डॉ.बसंत कुमार दास
भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्त शेतकरी विज्ञान काँग्रेसचे आयोजन
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा भारतीय विज्ञान काँग्रेसच्यावतीने सत्कार
Posted On:
05 JAN 2023 7:42PM by PIB Mumbai
नागपूर, 5 जानेवारी 2023
देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कोलकाता येथील केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ.बसंत कुमार दास यांनी केले.
भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्त शेतकरी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.दास बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना होत्या. पद्मश्री राहीबाई पोपेरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.आशिष पातुरकर यावेळी उपस्थित होते.
डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या, आजही शेतकऱ्यांची स्थिती नाजूक आहे. मेहनती इतके उत्पन्न मिळत नाही. निसर्गातील बदलाचा देखील फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, यासाठी यंदा पहिल्यांदाच शेतकरी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. देश, विदेशातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन करतील आणि त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल.
डॉ.प्रकाश कडू यांनी अकोला येथील कृषी विद्यापिठाच्या कामाची माहिती दिली. विद्यापिठाने आतापर्यंत 176 विविध पिकांचे वाण विकसित केले आहे. विदर्भातील 11 हजारावर गावांपर्यत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यात आले आहे. जैविक शेतीसाठी विद्यापीठ नियमित काम करीत असल्याचे डॉ.कडू यांनी सांगितले.
शेतकरी विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित बीज माता म्हणून देशभर ओळख असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा भारतीय विज्ञान काँग्रेसच्यावतीने अध्यक्षा डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना यांनी सत्कार केला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना राहीबाई पोपेरे म्हणाल्या, सुरवातीच्या काळात माझ्या कामावर टिका व्हायची, लोक हसायचे. आज 3 हजार 500 महिलांना सोबत घेऊन 200 गावांमध्ये काम सुरु आहे. देशी बियाण्यांचा वापर व त्यापासून मिळणारे उत्पादन वाढले पाहिजे. विविध पिकांच्या देशी बियाण्यांच्या संवर्धनासह त्याचा प्रचार प्रसार आम्ही करतो आहे. प्रत्येकाच्या शेतात देशी बियाणे वापरले गेले पाहिजे, गावात विषमुक्त भाजीपाला विकला गेला पाहिजे, तरच पुढची युवापिढी सशक्त होईल. रासायनिक खते, औषधांच्या वापरामुळे रानभाज्या नष्ट झाल्या. भविष्यात माती देखील नष्ट होईल, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.
SOURCE: DIO NAGPUR
D.Wankhede/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888984)
Visitor Counter : 230