विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान’ विषयावर परिसंवाद


सर्वसामान्यांना उपयोगी ठरणारे तंत्रज्ञान विकासास ‘इस्त्रो’ चे प्राधान्य

Posted On: 05 JAN 2023 4:20PM by PIB Mumbai

नागपूर, 5 जानेवारी 2023

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) अनेक अशक्यप्राय अंतराळ मोहीमा, अभियान  यशस्वीपणे राबविले आहेत. डीटीएच सेवा, हवामानाचा अंदाज वर्तविणे हे उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य झाले आहे. इस्त्रोच्या मोहीमा व अभियानाचा उद्देश हा सर्वसामान्यांना उपयोगी ठरणारे तंत्रज्ञानाचा विकास करण्यास प्राधान्य देणाऱ्या आहेत, असा सूर या  परिसंवादात सहभागी वैज्ञानिकांनी व्यक्त केला.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी 4 जानेवारी रोजी   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले परिसरात ‘अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान’या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सचिव एस.सोमनाथ, अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक प्रा. अनिल भारद्वाज, इस्त्रोचे सायंटिफिक सचिव डॅा. शंतनु भातवडेकर, डायरेक्टोरेट ॲाफ टेक्नॅालॅाजी डेव्हलपमेंट अँड असोसिएट सायंटिफिकचे संचालक डॅा. व्हिक्टर जोसेफ टी., ह्युमन फेसफ्लाईट अँड ॲडव्हान्स टेक्नॅालॅाजी एरिया स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबादचे उपसंचालक डॉ. डी.के. सिंग या परिसंवादात सहभागी झाले.

एस. सोमनाथ म्हणाले की, अंतराळ तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत आहेत. कोरोनाच्या काळात जग थांबले असताना शंभरावर अंतराळ मोहीमा राबविण्यात आल्या. देशातही अंतराळ क्षेत्राशी संबंधित शंभरावर स्टार्टअप पुढे आले आहेत. सर्वसामान्यांचे जीवन  तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुसह्य करीत देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावण्याचा इस्त्रोचा उद्देश असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. अनिल भारद्वाज म्हणाले की, यंदा मंगलयान 3 आणि आदित्य एल 1  या अंतराळ मोहीमा राबविण्यात येणार आहे. यापूर्वी राबविण्यात आलेली मंगलयान ही मोहीम जगातील सर्वात कमी खर्चिक मोहीम होती. जागतिक पातळीवर या मोहीमेची दखल घेण्यात आली. नॅशनल जिओग्राफी तसेच अनेक विज्ञानविषयक जगप्रसिद्ध मासिकांनी आपल्या मुखपृष्ठावर या मोहीमेला स्थान दिल्याचे त्यांनी सांगितले.

डॅा. शंतनु भातवडेकर यांनी इस्त्रोच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. इस्त्रोची स्थापना करण्यात आल्यानंतर जगाच्या तुलनेत भारताच्या अंतराळ मोहीमेतही आमूलाग्र बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. आर्यभट्ट ते रिसॅट या अंतराळ मोहीमांचा प्रवासही त्यांनी सादकरीकरणाच्या माध्यमातून उलगडून दाखविला. ते म्हणाले की, शेती व शेतीपूरक व्यवसायांना फायदेशीर ठरणारे तंत्रज्ञान निर्मिती करण्याकडे इस्त्रोने लक्ष केंद्रीत केले आहे. देशाला 750 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून सुमारे 70 लाख लोकांचे जीवन हे मासेमारीवर अवलंबून आहे. मासेमारी या शेतीपूरक व्यवसायास सहाय्यभूत ठरणारे तंत्रज्ञान निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागासोबत मिळून वादळाची पूर्वकल्पना देणे हा त्याचाच एक भाग आहे. अस्मानी आपत्तींची माहिती उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.व्हिक्टर जोसेफ टी. म्हणाले की, इस्त्रोमार्फत आतापर्यंत 208 मोहीमा राबविण्यात आल्या आहेत. 2024-2025 मध्ये गगनयान  ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कृषी, मनुष्यबळ विकास, क्वांटम तंत्रज्ञान या क्षेत्रात संशोधन सुरू असल्याचे ते म्हणाले.

डॉ. डी.के. सिंग म्हणाले की, वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अंतराळातील सॅटेलाईटच्या सहाय्याने हे शक्य झाले आहे. याचे अनेक फायदे आहेत. वायरलेस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध होऊ शकते. डीटीएच ही सेवा आज घरोघरी पहायला मिळते. सॅटेलाईटन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे शक्य झाले आहे.

 SOURCE: DIO NAGPUR

 

D.Wankhede/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888884) Visitor Counter : 193


Read this release in: English , Urdu