इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु तो करताना बँक खाते तसेच पासपोर्टसारखे  दस्तऐवज वापरताना जशी खबरदारी घेतो, किमान तशी खबरदारी घ्या. : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण

Posted On: 30 DEC 2022 6:09PM by PIB Mumbai

 

अनेकविध लाभ आणि सेवा मिळविण्यासाठी आपण स्वेच्छेने आवडीनुसार आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु आपण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधारच्या वापराबाबतही बाळगा.

आधार म्हणजे नागरीकांचे डिजिटल ओळखपत्रच आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या ओळखीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड हा देशभरात वापरला जाणारा एक महत्वाचा स्रोत आहे. देशातले नागरिक आपल्या आधार कार्ड क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक किंवा ऑफलाइन वापर करून आपल्या ओळखीशी संबंधित तपशीलाची पडताळणी आणि खात्री करू शकतात.

आपण जरी कोणत्याही विश्वासार्ह संस्थेला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज देणार असू तर अशावेळी देखील तशाच पद्धतीची खबरदारी घ्यायला हवी जशी आपण, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, मतदार ओळखपत्र तसेच पॅन कार्डसारखे दस्तऐवज देताना बाळगतो

जर का एखाद्या नागरिकाला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज द्यायचा नसेल तर अशा परिस्थितीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) व्हर्जुअल आयडेन्टिटीफायर अशी आभासी पद्धतीने ओळख पटवून देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्ष आधार क्रमांक देण्याऐवजी अशा तऱ्हेच्या पर्यायी पद्धतीने आपली ओळख पटवून देण्यासाठी संबंधीताला अधिकृत संकेतस्थळाला किंवा माय आधार पोर्टलला (myaadhaar portal) भेट द्यावी लागेल.

यूआयडीएआयने आधारच्या सुरक्षेसाठी आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. जर का एखादा नागरिक विशिष्ट काळात आधारचा वापर करणार नसतील तर अशावेळी ते आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगचा वापर करून आपल्या आधारची सुरक्षितता निश्चित करू शकतात.

नागरिकांनी आपल्याला आलेले आधारचे पत्र / पीव्हीसी कार्ड किंवा त्याची प्रत कुठेही ठेवू नये / गहाळ करू नये असे आवाहन यूआयडीएआयने केले आहे. नागरिकांनी सर्वांसाठी खुल्या असलेल्या कोणत्याही व्यासपीठावर विशेषतः समाजमाध्यमे आणि सर्वांसाठी खुल्या माध्यमांवर आपले आधार कार्ड कुणाशीही सामायिक करू नये असा सल्लाही यूआयडीएआयने दिला आहे.

जर आपल्याला आधारचा अनधिकृत वापर होत असल्याचा संशय असेल, किंवा आधारशी संबंधित अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर अशा माहितीसाठी आधारक्रमांक धारक नागरिक 1947 या विनाशुल्क आधार मदत क्रमांकावर यूआयडीएआयशी संपर्क साधू शकतात. ही मदत क्रमांकाची सेवा 24x7 उपलब्ध आहे. याशिवाय असे नागरिक help@uidai.gov.in  या ईमेलवरही ईमेल करू शकतात.

***

S.Kane/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887586) Visitor Counter : 161


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu