रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यामधील न्यू झुआरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे केले उद्घाटन


2024 पर्यंत देशातील रस्त्यांचा दर्जा जगातील सर्वोत्तम रस्त्यांच्या बरोबरीने असेल असा नितीन गडकरी यांचा विश्वास

Posted On: 29 DEC 2022 10:26PM by PIB Mumbai

गोवा, 29 डिसेंबर 2022

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज गोव्यामधील न्यू झुआरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा पूल मडगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील कोर्टालीम गावात झुआरी नदीवर असून, राज्यातील वाहतूक कोंडी कमी करणे, हे या पुलाचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यामध्ये, 8 मार्गीकांच्या स्टेड केबल पुलाच्या 4 मार्गिकांच्या उजवीकडील कॉरिडॉरचे (विभागाचे) उद्घाटन करण्यात आले आहे. 2530 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात नवीन पूल आणि बांबोळी ते वेर्णा या मार्गांचा समावेश आहे आणि एकूण प्रकल्पाची लांबी 13.20 किमी आहे.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी, एक भव्य आणि महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकारत आहे, अशा प्रसंगी आपण उपस्थित आहोत, याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी दिवंगत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांना, मांडवी पूल आणि झुआरी नदीवरील नवीन केबल पूल या दोन्हींचे शिल्पकार म्हणून श्रेय दिले. या प्रकल्पाच्या बांधकामाचा अलीकडचा वेगही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशभरात पूल बांधण्यासाठी वापरत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा पुरावा असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केले. गोवा-मुंबई महामार्गाचे कामही येत्या 7 ते 8 महिन्यांत पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारांनी नव्या झुआरी पुलावर फिरते उपाहारगृह साकारलेले पाहण्याचा निश्चय केला आहे, असे मंत्री म्हणाले. जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या सुंदर राज्यात बांधलेल्या या नव्या पुलावर असे पहिलेच फिरते उपाहारगृह असणे राज्याच्या सौंदर्याला साजेसे आहे. तसेच, देशातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असे सांगून, वर्ष 2024 पर्यंत देशातील रस्त्यांचा दर्जा जागतिक पातळीवरील सर्वोत्तम रस्त्यांच्या दर्जाइतका उंचावण्याचा सरकारचा मानस आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

गोव्याचा सकल विकास साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कार्यरत असल्याचे केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाज व जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी सांगितले. सामान्य गोवेकरांपुढील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यात नवा झुआरी पूल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय महामार्गांशी व बंदरांशी जोडण्यात सुधारणा करण्याकरता राज्याला मार्गदर्शन केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आभार मानले. नव्या झुआरी पुलावरील फिरते उपाहारगृह पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरेल, असे ते म्हणाले. नव्या पुलामुळे उत्तर व दक्षिण गोवा यांच्यातील वाहतूक सुलभ होईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी नव्या पुलाभोवती प्रकाश व ध्वनीचा खेळ उभारण्याची आणि राज्यातील बंदर, विमानतळ व रेल्वेला जोडणाऱ्या वर्तुळाकार मार्गाची आग्रही मागणी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकात्मिक कार्य व्यवस्थापनासाठी मोबाईल एप्लिकेशन प्रणालीची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला गोवा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री निलेश काब्राल, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, लोकसभा खासदार फ्रान्सिस्को सारडिन्हा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

* * *

PIB Panaji | S.Patil/R.Agashe/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1887423) Visitor Counter : 376


Read this release in: English , Urdu