इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘स्टे सेफ ऑनलाईन’ अभियान आणि ‘जी-20 डिजिटल इनोव्हेशन अलायंस’ची सुरुवात केली
‘स्टे सेफ ऑनलाईन’ अभियान आणि ‘जी-20 डिजिटल इनोव्हेशन अलायंस’ हे कोणत्याही मंत्रालयातर्फे जी-20 समूहाकडून जागतिक पातळीवर सुरु करण्यात आलेले पहिले कार्यक्रम आहेत – जी-20 समूहाचे शेर्पा अमिताभ कांत यांचे प्रतिपादन
Posted On:
28 DEC 2022 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2022
भारताच्या जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाचा भाग म्हणून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली येथे ‘स्टे सेफ ऑनलाईन’ अर्थात ‘ऑनलाईन पद्धतीने काम करताना सुरक्षित राहा’ अभियान आणि ‘जी-20 डिजिटल इनोव्हेशन अलायंस’ अर्थात ‘जी-20 डिजिटल नवोन्मेष आघाडी’ची सुरुवात केली.
जी-20 समूहाचे शेर्पा अमिताभ कांत, विविध केंद्रीय मंत्रालये तसेच विभागांतील मान्यवर, दूतावास तसेच वाणिज्य दूतावासांचे प्रतिनिधी यांच्यासह सरकार, उद्योग संघटना,समाज माध्यम मंच, स्टार्ट अप्स आणि नागरी समाजसेवी संस्था या क्षेत्रांतील निमंत्रित या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जी-20 समूहाच्या डिजिटल अर्थव्यवस्था विषयक कार्यकारी (डीईडब्ल्यूजी) गटाचे नोडल मंत्रालय म्हणून काम करणाऱ्या केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याधीच्या जी-20 समूहाच्या कार्यकाळात विविध कार्यकारी गटांमध्ये तसेच मंत्रालयीन सत्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. जी-20 समूहाचे अध्यक्षपद यावर्षी भारताकडे असतानाच्या काळात, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान ‘स्टे सेफ ऑनलाईन’ तसेच डीईडब्ल्यूजी अंतर्गत ‘डिजिटल इनोव्हेशन अलायंस’ यांसह डिजिटल सरकारी पायाभूत सुविधा (डीपीआय), सायबर सुरक्षा आणि डिजिटल कौशल्य विकास या तीन प्राधान्यक्रम क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहे. सुरक्षित सायबर वातावरणात अभिनव संशोधन आणि भविष्यासाठी सज्ज असलेले डिजिटल कौशल्ययुक्त कार्यबळ यांच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा वितरणासाठी जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये डिजिटल परिवर्तन घडविण्याची संकल्पना पुढे घेऊन जाण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.
याप्रसंगी बोलताना, अश्विनी वैष्णव म्हणाले, “भारत समावेशकतेच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवतो. भारतातील लोकसंख्येचे प्रमाण आणि युपीआय तसेच आधार यांसारख्या खुले स्त्रोत असलेल्या ‘सरकारी डिजिटल मंचां’नी, आर्थिक तसेच सामाजिक समावेश घडवून आणला आणि नवोन्मेषाला चालना दिली. आज सुरु करण्यात आलेल्या दोन अभियानांमध्ये मानवतावादी मार्गाच्या विचारांचा समावेश आहे.”
मान्यवरांच्या समुदायाला संबोधित करताना, अमिताभ कांत म्हणाले, “भारतात वेगाने निर्माण होणाऱ्या सुविधा जगातील केवळ 1.4 अब्ज लोकांसाठी नसतील तर येत्या काळात जगभरात गरिबीतून वर येऊन मध्यम वर्गात स्थिरावणाऱ्या, 5 अब्ज लोकांसाठी असतील.”
‘स्टे सेफ ऑनलाईन’ अभियानाविषयी माहिती
जनतेकडून होणारा समाज माध्यम मंचाचा विस्तृत प्रमाणात वापर आणि डिजिटल स्वरूपातील आर्थिक व्यवहारांचा वेगाने होत असलेला स्वीकार यांच्यामुळे, नागरिकांमध्ये ऑनलाईन आर्थिक व्यवहार किंवा इतर कामे करताना स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने जागरूकता वाढवणे हा ‘स्टे सेफ ऑनलाईन’ अभियानाचा उद्देश आहे. भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ आणि सतत नव्याने उदयाला येत असलेल्या बदलांनी युक्त तंत्रज्ञानविषयक चित्राने अनेक अद्वितीय आव्हाने निर्माण केली आहेत. हे अभियान विविध वयोगटातील नागरिकांना, विशेषतः लहान मुले, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, शिक्षक,प्राध्यापक, केंद्र तसेच राज्य सरकारी अधिकारी इत्यादींना सायबर धोक्यांविषयी जाणीव निर्माण करुन देईल आणि त्या धोक्यांचा सामना करण्याचे मार्ग देखील दाखवेल. देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने हे अभियान इंग्रजी, हिंदी तसेच स्थानिक भाषांमध्ये राबविले जाईल.
या मोहिमेमध्ये इन्फोग्राफिक्स, कार्टून कथा, कोडी, छोटे व्हिडिओ इत्यादींच्या रूपात बहुभाषिक जागरूकता सामग्रीचा प्रसार करणे आणि MyGov ‘मायगव्ह’ संकेतस्थळाचा (https://www.mygov.in/staysafeonline) प्रमुख समाज माध्यमांवर व्यापक वापर करून त्याचा विस्तार केला जाणार आहे. याशिवाय, मुद्रित प्रसार माध्यमे , इलेक्ट्रॉनिक्स आणि समाज माध्यमांद्वारे वर्षभर विविध प्रकारे सुरक्षित राहण्याचा ऑनलाइन संदेश पोहोचविण्यासाठी उपक्रम राबवले जातील. याव्यतिरिक्त, प्रमुख भागधारकांचे सहकार्य यासाठी घेण्यात येणार आहे. या मोहिमेच्या व्यापक प्रसारासाठी केंद्रीय मंत्रालये/विभाग, उद्योग संघटना/भागीदार, स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था इत्यादींची मदत घेतली जाईल.
जी-20 डिजिटल नवोन्मेष आघाडीविषयी (जी 20- डीआयए)
जी-20 डिजिटल नवोन्मेष आघाडी (जी 20- डीआयए) चे उद्दिष्ट जी 20 राष्ट्रांकडून तसेच आमंत्रित बिगर-सदस्य राष्ट्रांकडून स्टार्टअप्सद्वारे विकसित केलेले नाविन्यपूर्ण आणि प्रभावी डिजिटल तंत्रज्ञान ओळखणे, त्याचा स्वीकार करणे आणि सक्षम करणे हे आहे. गंभीर क्षेत्रातील मानवतेच्या गरजा लक्षात घेण्यात येतील. यामध्ये कृषी तंत्रज्ञान, आरोग्य-तंत्रज्ञान, शिक्षण –तंत्रज्ञान ,वित्तीय –तंत्रज्ञान , सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधा आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था; यांचा विचार प्रामुख्याने केला जाणार आहे.
डिजीटल सार्वजनिक मालवाहतूकीसाठी पायाभूत सुविधेव्दारे सक्षम केलेल्या वरील सहा संकल्पनांमधील स्टार्टअप उत्पादने जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाव निर्माण करू शकतात आणि डिजिटल विभाजन कमी करू शकतात तसेच शाश्वत, आणि सर्वसमावेशक तांत्रिक-सामाजिक-आर्थिक विकास सक्षमतेने करू शकतात.
डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप (डीईडब्ल्यूजी) च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बंगळुरू येथे होणारी जी 20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्स (G20- डीआयए) शिखर परिषद हा एक अनेक दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. त्यामध्ये प्रत्येक संकल्पनेच्या क्षेत्रातील शीर्ष नामवंत स्टार्टअप्स जी20 देश आणि बिगर-सदस्य आमंत्रित देश गुंतवणूकदार, मार्गदर्शक, कॉर्पोरेट्स आणि इतर सरकारी भागधारकांच्या जागतिक समुदायासमोर त्यांच्याकडे असलेले पर्याय सादर करतील.
जी20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्स (जी20-डीआयए) द्वारे देण्यात येणा-या पर्यायांच्या व्यासपीठाला नवोन्मेषक, उद्योजक, स्टार्टअप्स, कॉर्पोरेशन्स, गुंतवणूकदार, मार्गदर्शक आणि इतर परिसंस्थेतील भागधारकांच्या एकत्रित सहभागामुळे जलद स्वीकृती मिळेल, अशी योजना आखण्यात येत आहे. जी 20-डीआयए शिखर परिषद, जी 20 सदस्य देश आणि निमंत्रित बिगर-सदस्य देशांमधील इनोव्हेशन परिसंस्थेमधील प्रमुख सहभागींना एकत्र आणत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून झालेले विविध भाग आणि आधुनिक जागतिक अर्थव्यवस्था, यांच्यामध्ये सेतू निर्माण होईल अशा सहा संकल्पनांमध्ये अत्याधुनिक डिजिटल पर्याय तयार करणार्या स्टार्टअप्सना चिह्नीत करून, त्यांना पाठिंबा मिळवता येणार आहे.
* * *
S.Patil/S.Bedekar/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887171)
Visitor Counter : 341