विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

वार्षिक आढावा : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय)

Posted On: 27 DEC 2022 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2022

 

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने - सीएसआयआरने जैव इंधनाचा वापर करून भारतातील पहिल्या उड्डाणाचा मार्ग प्रशस्त केला. देहरादून ते दिल्लीदरम्यानच्या या प्रवासाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि या प्रवासाबरोबरच शाश्वत आणि पर्यायी इंधनाच्या वापराचा मार्ग मोकळा झाला. जट्रोफा तेलापासून सीएसआयआर – आयआयपीने विमानासाठीचे स्वदेशी जैव इंधन तयार केले, जे संस्थेच्या पेटंट तंत्रज्ञानावर आधारित होते. जगातील सर्वात उंचावरच्या विमानतळांपैकी एक असलेल्या लेह येथील विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या AN-32 या विमानाने पहिल्यांदाच 10 टक्के जैवइंधनाचे मिश्रण असलेल्या इंधनाचा वापर करून उड्डाण केले.

2016 या वर्षात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने सीएसआयआर - अरोमा या मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेंतर्गत सुगंध उद्योगाच्या वाढीला आणि ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी कृषी, प्रक्रिया आणि उत्पादन विकासामध्ये विविध उपक्रम राबवून सुगंध क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या मोहिमेंतर्गत 46 आकांक्षित जिल्ह्यांमधील 6000 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणण्यात आले आहे. सुमारे 44,000 पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षण देण्यात आले असून 231 आसवन एककांची स्थापना करण्यात आली आहे. त्यातून 500 ​​टन बाष्पनशील तेल तयार करण्यात आले आहे.

आधुनिक काळातील नागरी आणि लष्करी एअरफ्रेम्सचा अविभाज्य घटक असलेल्या हलक्या वजनाच्या प्रगत संमिश्रांवर प्रक्रिया करण्यासाठी सीएसआयआर-एनएएलने अत्याधुनिक स्वदेशी ऑटोक्लेव्ह तंत्रज्ञान यशस्वीरित्या विकसित केले आहे.

सीएसआयआर – आयआयपी आणि जीएआयएल यांनी एक तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून एक टन प्लास्टिक कचरा आणि इतर पॉलीओलेफिन उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यापासून 850 लिटर स्वच्छ डिझेल प्राप्त करता येते.

सीएसआयआर- आयआयसीटीने हायड्रॅझिन हायड्रेट तयार करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित केले असून ते कृषीरसायने, औषध निर्मिती आणि जल प्रक्रियेसाठी वापरले जाते. वडोदरामध्ये या तंत्रज्ञानावर आधारित 10,000 टीपीए क्षमतेचा व्यावसायिक प्रकल्प, गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड येथे उभारण्यात आला असून 10 ऑक्टोबर 2022 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो देशाला समर्पित केला.

‘सिंधू साधना’ हे पहिले स्वदेशी बनावटीचे संशोधन जहाज, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी 2014 साली देशाला समर्पित केले होते. सीएसआयआर – एनआयओच्या या अद्ययावत संशोधन जहाजाची लांबी 80 मीटर असून रूंदी 17.6 मीटर इतकी आहे. त्यातून 29 शास्त्रज्ञ आणि 28 कर्मचाऱ्यांसह एकूण 57 जण प्रवास करू शकतात. 13.5 सागरी मैल वेगाने हे जहाज सलग 45 दिवस प्रवास करू शकते. या संशोधन जहाजामध्ये 10 प्रयोगशाळा आहेत, त्यातील अत्याधुनिक उपकरणांमुळे उच्च दर्जाचे अचूक तपशील आणि नमूने प्राप्त करणे सुलभ होते.

सीएसआयआर – एनपीएलच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल अटॉमिक टाइमस्केल आणि भारतीय निर्देशक द्राव्य प्रणाली देशाला समर्पित केली. तसेच राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेची पायाभरणी केली.

सीएसआयआर- सीएसएमसीआरआयने उसाच्या मळीवर आधारित अल्कोहोल डिस्टिलरीमधून मौल्यवान पोटॅश पुनर्प्राप्त करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परकीय चलन वाचणार असून फायदेशीर ठरणारे हे तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले.

सीएसआयआर - सीआरआरआयने शेतकऱ्यांना पुरवठा साखळी आणि माल वाहतूक व्यवस्थापन प्रणालीशी जोडण्यासाठी किसान सभा अॅप विकसित केले आहे. हे पोर्टल शेतकरी, वाहतूकदार आणि कृषी उद्योगाशी संबंधित इतर घटकांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून काम करते. हे अॅप प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध असून एक लाखापेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.

भेसळयुक्त दूध शोधण्याच्या तंत्रज्ञानाचा समावेश असणारा अल्पदरातला आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज नेता येणारा - पोर्टेबल क्षीर स्कॅनर सीएसआयआरने विकसित केला आहे.

सीएसआयआर – एनएएलने विकसित केलेल्या SARAS PT1N या नवीन अद्ययावत 14 आसनी प्रवासी विमानाने 24 जानेवारी 2018 रोजी पहिले यशस्वी उड्डाण पूर्ण केले.

शालेय विद्यार्थी आणि सीएसआयआर मधील वैज्ञानिकांची परस्परांशी भेट घालून देत सीएसआयआरची वैज्ञानिक- सामाजिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी सीएसआयआरतर्फे राष्ट्रीय स्तरावर हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांमध्ये "जिज्ञासा" या उपक्रमाचा समावेश होतो. या उपक्रमांतर्गत सीएसआयआरने केंद्रीय विद्यालय संघटना आणि जवाहर नवोदय विद्यालय यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. 3,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे. अलीकडेच, सीएसआयआरने नीति आयोगाच्या अटल टिंकरिंग लॅब्ससोबत हातमिळवणी केली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये एसटीईएम आधारित संशोधन आणि नवोन्मेषाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने देशभरात अटल इनोव्हेशन मिशनने स्थापन केलेल्या 295 अटल टिंकरिंग लॅब दत्तक घेण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.

 

SARS-CoV2 साथरोग आणि त्यावर मात करण्यासाठी सीएसआयआरचे योगदान:

  • सीआरआयएसपीआर/ सीएएस आधारित पेपर डायग्नोस्टिक टेस्ट (FELUDA)
  • ड्राय-स्वॅब-डायरेक्ट- आरटीपीसाआर डायग्नोस्टिक
  • आयुर्वेदावर आधारित औषधांच्या प्रयोगशाळेत चाचण्या
  • स्वास्थ्य वायु नॉन-इनवेसिव्ह व्हेंटिलेटर
  • प्राणवायू देणाऱ्या वनस्पती
  • कोविड-19 रुग्णांसाठी तात्पुरती रुग्णालये
  • संसदेचा सेंट्रल हॉल, बस, रेल्वेचे डबे अशा ठिकाणी यूव्ही-सी व्हायरस निर्जंतुकीकरण यंत्रणा बसवण्यात आली
  • रुग्णालये आणि घराच्या परिसरात SARS-CoV2 वर हवाई देखरेख
  • लस वितरणासाठी ऑक्टाकॉप्टर ड्रोन

 

सीएसआयआर अरोमा मोहिम आणि पुष्पशेती मोहिम (मधमाशीपालन): शेतकरी समुदायामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, सीएसआयआरच्या सुगंध आणि पुष्पशेती 6,000 हेक्टर क्षेत्रावर सुगंधी पिकांची लागवड करण्यात आली. सुगंधी पिकांची लागवड आणि प्रक्रिया तसेच उच्च दर्जाची सुगंधी रसायने आणि उत्पादनांसाठी मूल्यवर्धित सुगंधी पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सीएसआयआरने उद्योजकतेच्या संधी सुद्धा विकसित केल्या आहेत. भारतात प्रथमच हिंगाची लागवड सुरू करण्यात आली असून केशराच्या लागवडीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.

 

गावातले पाणी गावात: सीएसआयआरने निवडक गावांमध्ये जलस्रोतांचे प्रमाण वाढवण्यासाठी ग्रामस्तरीय जल व्यवस्थापन योजना विकसित करण्यासाठीच्या पथदर्शी प्रकल्पाचे नेतृत्व केले आहे.

 

टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन एनर्जी स्टोरेज उपकरणे: सीएसआयआरच्या इनोव्हेशन सेंटर फॉर नेक्स्ट जनरेशन एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स प्रकल्पांतर्गत, सीएसआयआर सीईसीआरआयच्या लिथियम-आयन बॅटरी तंत्रज्ञानाची माहिती मुंबईतील मे. टाटा केमिकल्स मर्यादित यांना देण्यात आली. 100 मेगावॅट ली-आयन बॅटरी उत्पादन सुविधा असणारी प्रगत ऊर्जा साठवण उपकरणे विकसित करणे आणि विद्यमान सुविधांच्या प्रमाणात प्रतिदिन 1000 सेलपर्यंत वाढ करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आयपीआर आणि तंत्रज्ञानाचा विकास, बॅटरी सामग्रीचे प्रमाण वाढवून उत्पादनातही वाढ करणे, पुरवठा साखळी निर्माण करणे आणि स्वदेशीकरण साध्य करणे तसेच कोळशापासून लिथियमच्या शाश्वत उपलब्धतेची खातरजमा करणे आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी विकसित करणे, ही या प्रकल्पाची इतर उद्दिष्ट्ये आहेत.

 

भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या हायड्रोजन फ्युएल सेल बसचा शुभारंभ: सीएसआयआर- एनसीएल आणि सीएसआयआर सीईसीआरआय यांनी सेंटिंट लॅब्सच्या सहकार्याने हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित बसची रचना आणि विकसन केले आहे. मध्यवर्ती वातानुकुलन यंत्रणेने सुसज्ज असलेली ही 32 आसनी बस 30 किलो हायड्रोजनचा वापर करून 450 किलोमीटर प्रवास करू शकते. हायड्रोजन इंधन सेल आणि हवेचा वापर करून ही बस वीज निर्माण करते आणि न थांबता 600 किमी प्रवास करू शकते. बसमधून फक्त पाण्याचे उत्सर्जन होते, त्यामुळे ती वाहतुकीचे सर्वात पर्यावरण अनुकूल साधन ठरली आहे. या भारतीय बनावटीच्या हायड्रोजन इंधन सेल बसचा 15 डिसेंबर 2021 रोजी पुण्यात शुभारंभ करण्यात आला.

 

वापरकर्त्यांसाठी पेटंट कार्यालयांव्यतिरिक्त TKDL डेटाबेसचा वापर खुला करायला मंत्रिमंडळाची मान्यता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 17 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, वापरकर्त्यांसाठी पेटंट कार्यालयांव्यतिरिक्त पारंपारिक ज्ञान डिजिटल लायब्ररी – TKDL चा डेटाबेस उपलब्ध करून द्यायला मान्यता देण्यात आली. वापरकर्त्यांसाठी TKDL चा डेटाबेस खुला केल्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये भारताच्या मौल्यवान वारशावर आधारित संशोधनाला तसेच विकास आणि नवकल्पनांना चालना मिळेल.

 

भूकंप आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात होणारे मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचे विकसन: सीएसआयआर – सीबीआरआय आणि सीएसआयआर – एसईआरसी तर्फे भूकंपांना तोंड देऊ शकतील, अशा संरचनांची रचना केली जाते आहे आणि या सर्व संरचनांमध्ये या पैलूंचा समावेश करण्यावर आवश्यक भर आणि महत्त्व दिले जात आहे.

 

स्वच्छता मोहिमेच्या प्रयत्नांना हातभार म्हणून सीएसआयआरकडून 'वेस्ट टू वेल्थ' तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित: डिस्टिलरीमधील उत्सर्जन, औद्योगिक घनकचरा, समुद्रातील गाळ, ई-कचरा, कोळशावर आधारित ऊर्जा उद्योगातून उद्भवणाऱा कचरा, शेतीतील कचरा, खत उद्योगातील कचरा, चुन्याचा गाळ, संगमरवरातील टाकाऊ भाग अशा अनेक बाबींचा वापर करून सीएसआयआरने अनेक वेस्ट टू वेल्थ तंत्रज्ञाने आणि उत्पादने विकसित केली आहेत. एमएसएमई, उद्योग आणि इतर भागीदारांसोबत या तंत्रज्ञानांची अंमलबजावणी सध्या विविध टप्प्यांवर सुरू आहे.

 

हंसा एनजी चे पहिले उड्डाण: सीएसआयआर – एनएएलने हंसा एनजी विमानाची रचना आणि विकसन केले आहे. भारतातील फ्लाइंग क्लबमध्ये प्राथमिक उड्डाण प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे हे दोन आसनी हलके विमान आहे. प्रशिक्षणासाठीचे विमान म्हणून उपयुक्तता वाढविण्यासाठी हंसा 3 विमानात लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. डीजीसीए कडून विशेष उड्डाणासाठी परवानगी मिळाल्यानंतर नव्याने विकसित हंसा 3 एनजी ने 3 सप्टेंबर 2021 रोजी पहिले उड्डाण केले. 20 मिनिटांच्या या उड्डाणात हंसा 3 एनजीने 4,000 फूट उंची आणि 80 नॉट्सचा वेग नोंदवला. पुढे 19 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान या विमानाने पुद्दुचेरी येथे समुद्र सपाटीशी संबंधित चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. 19 फेब्रुवारी 2022 रोजी पुद्दुचेरीला उड्डाण करताना या विमानाने 155 किमी/तास या वेगाने 140 नॉटिकल मैलांचे अंतर दीड तासात ओलांडले.

 

इंडियन नॅशनल फूटवेअर साइझिंग सिस्टमचा विकास: सीएसआयआर – सीएलआरआयने भारतीय फुटवेअर साइझिंग सिस्टम तयार करण्यासाठी थ्री डी डिजिटल इमेजिंग तंत्राचा वापर करून भारतीय लोकसंख्येच्या पायांच्या आकारमानाबाबत देशव्यापी सर्वेक्षण केले. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात तीस थ्री डी फूट स्कॅनर्स मागवण्यात आले आणि बसवण्यात आले. या उपक्रमात सोबत काम करण्यासाठी भागीदार निश्चित करण्यात आले आणि चेन्नई तसेच आग्रा येथील सेंट्रल फूटवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कोलकाता येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड लेदर टेक्नॉलॉजी आणि मुझफ्फरपूर येथील मुझफ्फरपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण संघटनेच्या शिफारशींच्या आधारे लोकसंख्येची ठिकाणे (79  जिल्हे) निश्चित करण्यात आली आहेत. थ्रीडी फूट स्कॅनरवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या 90 कर्मचार्‍यांसाठी 5 ऑक्टोबर 2021 रोजी प्रशिक्षण सुरू झाले. मार्च 2022 अखेरीस एकूण 1,01,880 पावलांची मापे घेण्यात आली. भारतीय राष्ट्रीय फुटवेअर साइझिंग यंत्रणा विकसित केली जात असून त्याद्वारे लोकांच्या पायाला नीट बसणारी पादत्राणे निवडता येतील, परिणामी त्यांच्या पायांना आराम मिळेल आणि पाय दुखण्याच्या त्रासातून त्यांची सुटका होईल.

 

जागतिक स्तरावरील भारतीय वैज्ञानिक समुदायाशी डिजिटल पद्धतीने संपर्क: सामाजिक आव्हानांचे आणि समस्यांचे संयुक्तपणे निराकरण करण्यासाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक भारतीयांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सीएसआयआरने प्रभास (PRABHASS - Pravasi Bharatiya Academic and Scientific Sampark) हे पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर 47 देशांतील 6000 पेक्षा जास्त अनिवासी भारतीयांची माहिती उपलब्ध आहे.

 

सीएसआयआरचा स्किल इंडिया उपक्रम’: युवा वर्गाला सीएसआयआरच्या प्रयोगशाळांच्या संपर्कात आणून आवश्यक अशा तांत्रिक कौशल्यांनी सुसज्ज करणे, हे सीएसआयआरच्या ‘स्किल इंडिया उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत 2 लाखापेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

* * *

S.Thakur/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887017) Visitor Counter : 463


Read this release in: Tamil , Hindi