संरक्षण मंत्रालय
स्कॉर्पिन प्रकारातील ‘वागीर’ या पाचव्या पाणबुडीचे भारतीय नौदलाकडे हस्तांतरण
Posted On:
20 DEC 2022 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2022
प्रकल्प -75 मधील कलवरी वर्गातील 11879 यार्डची पाचवी पाणबुडी आज 20 डिसेंबर 2022 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली.प्रकल्प-75 मध्ये स्कॉर्पिन प्रकारातील एकूण सहा पाणबुड्यांची स्वदेशी निर्मिती करण्यात येणार आहे. या पाणबुड्यांची उभारणी मुंबईच्या माझगाव डॉक जहाजबांधणी कंपनीतर्फे केली जात असून या कामी कंपनीला फ्रान्सच्या नेवल उद्योग समूहाचे सहकार्य लाभले आहे. वागीर पाणबुडीचे अनावरण 12 नोव्हेंबर 2020 रोजी झाले आणि तिच्या सागरी चाचण्या 01 फेब्रुवारी 2022 रोजी सुरु झाल्या. यापूर्वी उभारण्यात आलेल्या पाणबुड्यांच्या तुलनेत ‘वागीर’ या पाणबुडीने शस्त्रास्त्रे आणि संवेदके यांच्या चाचण्यांसह सर्व महत्त्वाच्या चाचण्या किमान वेळेत पूर्ण केल्या ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
पाणबुडीची बांधणी ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते कारण यात वापरण्यात आलेली साधने अत्यंत लघु स्वरुपात असणे आवश्यक असते आणि त्यांची गुणवत्ता अत्यंत उत्तम असणे आवश्यक असते. या प्रकारच्या पाणबुड्यांची उभारणी भारतीय गोदीत होणे हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे आणि त्यामुळे या क्षेत्रात आपला आत्मविश्वास अधिक वाढला आहे. तसेच, 24 महिन्यांच्या कालावधीत भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेली ही तिसरी पाणबुडी आहे ही अत्यंत उल्लेखनीय कामगिरी आहे.
ही पाणबुडी लवकरच भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होईल आणि त्यामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत भर पडेल.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1885262)
Visitor Counter : 287