विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भोपाळ इथे जानेवारी 2023 मध्ये होणारा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ)-2022 हा भारताच्या G20 शिखर परिषदेच्या अध्यक्षकाळात होत असल्याने ठरणार अधिक महत्त्वाचा - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
12 DEC 2022 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ)-2022 भोपाळ येथे जानेवारी 2023 मध्ये आयोजित केला जाईल.भारताने G-20 चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांपैकी हा एक आहे.
नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात गेल्या 8 वर्षात वैज्ञानिक शोध आणि उपक्रम प्रयोगशाळेतून आता जनसामान्यांच्या जीवनापर्यंत खरं तर प्रत्येक घरात पोहोचले आहेत. सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी आता विज्ञानाचा वापर केला जात आहे.
डॉ जितेंद्र सिंग यांनी भारताची नाममुद्रा उमटवणारे अधिकाधिक कृषितंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि नवीन क्षेत्रातील स्टार्टअप्स सुरू करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, सर्जनशीलता आणि नवकल्पनांसह विज्ञानाव्यतिरिक्त स्टार्टअपचेही स्वागत आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव या विषयावर डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, भारतातील आणि परदेशातील विद्यार्थी, कारागीर, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांसह भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीच्या यशाचा उत्सव साजरा करण्याचा हा सण आहे. ते म्हणाले, ही देशातील आणि परदेशातील लोकांना आणि वैज्ञानिक बंधुत्वाला एकत्र येण्याची, एकत्र काम करण्याची आणि भारत आणि मानवतेच्या कल्याणासाठी विज्ञानाचा वापर करण्याचा आनंद अनुभवण्याची संधी देते.
संभाव्य नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांना तसेच पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवांमध्ये मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्याची सूचना मंत्र्यांनी आयोजकांना केली.
या चार दिवसांत देशभरातील 8,000 हून अधिक प्रतिनिधींच्या सहभागाने समांतरपणे चालणारे 14 कार्यक्रम होणार असल्याची माहिती डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2022 दरम्यान अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा शास्त्रज्ञ परिषद हा आणखीन एक मोठा उपक्रम आहे, जिथे सुमारे 1500 तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विविध विषय तज्ञांशी संवाद साधतील अशी अपेक्षा आहे. भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक कामगिरीची झलक अनेक प्रदर्शनांद्वारे सादर केली जाईल, 'स्टार्टअप कॉन्क्लेव्ह' हे यातील आणखी एक आकर्षण असेल. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव सुद्धा या महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असेल. हा चित्रपट महोत्सव चित्रपट निर्मात्यांना वैज्ञानिक आणि नाविन्यपूर्ण सामग्री विकसित करण्यासाठी प्रेरित करेल.
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1882916)
Visitor Counter : 697