कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन
Posted On:
07 DEC 2022 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2022
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने देशभरात महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. तथापि, एमएसडीई ने देशातील महिला उद्योजकांसमोरील आव्हानांचा कोणतेही अभ्यासात्मक सर्वेक्षण केलेले नाही.
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी, एमएसडीईने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचे तपशील पुढील प्रमाणे आहेत:
भारतामधील महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांच्या चौकटीबाबतच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, एमएसडीई च्या भागीदारीने जर्मन फेडरल मिनिस्ट्री फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (BMZ) च्या वतीने, डॉईश गेसेलशाफ्ट फर इंटरनॅशनल झुसॅमेनार्बिट (GIZ) द्वारे, ‘महिला उद्योजकांचे आर्थिक सक्षमीकरण आणि महिलांद्वारे स्टार्ट अप्स’ (WEE) या प्रकल्पाला पाठींबा मिळत आहे.
सूक्ष्म-उद्योग क्षेत्रातील महिला उद्योजकांसाठीच्या कार्यक्रमांना गती देणे आणि नवीन कार्यक्रम राबवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट असून, त्या द्वारे या महिलांना महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि देशातील ईशान्येकडेच्या आठ राज्यांमध्ये नवीन व्यवसाय सुरु करता येईल आणि त्यांचा चालू व्यवसाय आणखी वाढवता येईल.
'Her&Now' या शीर्षकाखाली, महिला उद्योजक आणि महिलांनी सुरु केलेले स्टार्टअप्स प्रकल्प, यशस्वी महिला उद्योजकांच्या कथा सर्वांसमोर मांडण्यासाठी आणि याबाबत समाजातील महिलांसंदर्भातली भूमिका आणि निकषांबाबतच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी चित्रपट आणि माध्यमांद्वारे एक मोहीम देखील राबवत आहे. कार्यक्रमांना गती देणे आणि नवीन कार्यक्रम राबवणे या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 900 पेक्षा अधिक महिला उद्योजकांना आधार देण्यात आला आहे.
एमएसडीई च्या सहा पवित्र शहरांमधील उद्योजकता विकास प्रकल्पांचा उद्देश, उद्योजकतेची क्षमता असणारे आणि विद्यमान उद्योजक, बेरोजगार युवक, महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडणारे, मागास समुदायातील युवा यांच्या सहभागाद्वारे स्थानिक उद्योजकता उपक्रमांना चालना देणे, हा आहे. हा प्रकल्प पुरी, बोधगया, कोल्लूर, वाराणसी, हरिद्वार आणि पंढरपूर येथे राबवला जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्यांची एकूण संख्या 7,185 इतकी असून यामध्ये 4,535 महिलांचा समावेश आहे.
उद्योजकता शिक्षण, प्रशिक्षण, प्रचार आणि उद्योजकता नेटवर्कमधील सहज समावेश, याद्वारे समावेशक परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने एमएसडीईने पीएम युवा प्रायोगिक प्रकल्प (नोव्हेंबर 2019 ते मार्च 2022) लागू केला.
ही योजना महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात आली. हा कार्यक्रम पूर्णपणे महिला केन्द्री नसला तरी कार्यक्रमात महिलांचा लक्षणीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. या प्रकल्पाचे एकूण 63,255 लाभार्थी असून यामध्ये 24,398 महिलांचा समावेश आहे.
कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1881585)