राष्ट्रपती कार्यालय

मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली

Posted On: 06 DEC 2022 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022

बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सह-अध्यक्ष आणि विश्वस्त मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी आज (डिसेंबर 6, 2022) रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. मेलिंडा फ्रेंच गेट्स यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत करताना, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने गेल्या दोन दशकांत केलेल्या कामाची दखल घेत राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत सरकार विविध प्रमुख उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य आणि विकास कामांमध्ये लक्षणीय गुंतवणूक करत आहे. या उपक्रमांचा लाभ समाजाच्या सर्वात वंचित घटकापर्यंत पोहोचावा यासाठी सरकार सर्वसमावेशक दृष्टीकोन सुनिश्चित करण्याचा विशेष प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.  त्यांनी विश्वास व्यक्त केला की फाउंडेशन सर्वात जास्त गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करेल – मग त्या महिला आणि मुली असोत, आदिवासी समुदाय असोत किंवा देशाच्या दुर्गम भागात राहणारे नागरिक असोत. राष्ट्रपतींनी देशाच्या सर्वांगीण विकासामधील महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि फाउंडेशनने लैंगिक समता आणि महिला सक्षमीकरणासाठीचे आपले प्रयत्न सुरू ठेवावेत असे आवाहन केले.

सार्वजनिक आरोग्य, संसर्गजन्य रोग नियंत्रण आणि मलेरिया आणि क्षयरोग प्रतिबंधक क्षेत्रामध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने केलेल्या भरीव कामाचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. सिकलसेल अॅनिमिया, या आदिवासी समुदायामध्ये प्रामुख्याने दिसून येणाऱ्या आजारासारख्या इतर गंभीर स्वरूपाच्या आजारांकडे देखील लक्ष देण्यासाठी त्यांनी फाऊंडेशनला प्रोत्साहन दिले. कृषी विकास क्षेत्रात फाऊंडेशनने केलेल्या कामाची देखील राष्ट्रपतींनी प्रशंसा केली आणि फाउंडेशनने आदिवासी भागात अल्प वन उत्पादनांसाठी सहकारी विपणन उपक्रम सुरू करण्याचा विचार करावा असे आवाहन केले. 

भारताने जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताचा अनुभव आणि सर्वोत्तम कार्य पद्धती इतर विकसनशील देशांसाठी मोलाचा धडा  ठरू शकतील. विशेषतः, भारताचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आदिवासी वारसा जगासमोर ठेवला जाऊ शकतो- निसर्गाशी सुसंगत राहणे, पारंपरिक औषधोपचार पद्धती आणि ‘शाश्वततेचा’ प्रामाणिक  दृष्टीकोन ही या अनोख्या जीवनशैलीची वैशिष्ट्ये आहेत.  

 R.Aghor/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1881258) Visitor Counter : 146


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi