माहिती आणि प्रसारण मंत्रालय
बांगलादेशचा ‘अ हाऊस विथ नो नेम’ हा सिनेमा आज इफ्फी 53 च्या जागतिक चित्रपट श्रेणी अंतर्गत दाखवण्यात आला
गोवा/मुंबई, 25 नोव्हेंबर 2022
“चित्रपट बनवताना प्रेक्षक लक्षात घेतले पाहिजेत, यापूर्वी ते स्त्री-प्रधान भूमिका असलेल्या बिग बजेट चित्रपटांसाठी पैसे मोजायला तयार नव्हते, मात्र महामारीनंतर जेव्हा लोकांना ओटीटीवरील कथानकाचा आशय आवडू लागला , तेव्हा ते आवर्जून असे चित्रपट पहायला लागले आहेत. आज, कथा हा चित्रपटाचा मुख्य नायक आहे.” असे 'अ हाऊस विथ नो नेम' या बंगाली चित्रपटातील मुख्य अभिनेत्री नुसरत फारिया म्हणाली.
गोव्यातील चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या इफ्फी ‘टेबल टॉक्स’मध्ये अभिनेत्री अफसाना मिमी आणि चित्रपटाचे निर्माते अबू शाहेद इमोन यांच्यासह माध्यमांशी आणि प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/hh-10OTO.jpg)
आज इफ्फी 53 च्या जागतिक चित्रपट श्रेणी अंतर्गत बांगलादेशचा ‘अ हाऊस विथ नो नेम’ हा सिनेमा दाखवण्यात आला.
हा चित्रपट का निवडला हे सांगताना नुसरत फारिया यांनी सांगितले की “गेली 7 वर्षे मी गाणी , नृत्य आणि प्रेमकहाणी असलेले व्यावसायिक चित्रपट करत आहे आणि माझ्या व्यस्त शेड्यूलमुळे मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हते. महामारीच्या काळात, बर्याच वर्षांनी, मी माझ्या कुटुंबासोबत तब्बल 60 दिवस व्यतीत केले आणि जेव्हा अबू (शाहेद इमोन , निर्माता) यांनी मला चित्रपटाची कथा ऐकवली , तेव्हा मला माझ्या आईसोबतच्या नात्याची आठवण झाली आणि मी लगेच हो म्हणाले. ” कोविडच्या दोन लाटांदरम्यान या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/hh-2X08U.jpg)
या चित्रपटात फारियाच्या आईची भूमिका करणारी बांगलादेशची दिग्गज अभिनेत्री अफसाना मिमी यांनी सांगितले की, ही भूमिका खूप आव्हानात्मक वाटली. 18 वर्षांनंतर पडद्यावर परतल्यावर आणि या चित्रपटाचा एक भाग बनण्याबाबत त्यांनी सांगितले , या चित्रपटात मी साकारलेल्या व्यक्तिरेखेचा संघर्ष खूप कठीण आहे. एकीकडे ती गर्भपात सहन करते तर दुसरीकडे तिला तिच्या मुलीसोबत वेळ घालवायचा असतो.” बांगलादेशी चित्रपटसृष्टीतील अशा दिग्गज कलाकारासोबत काम करण्याची संधी मला दवडायची नव्हती , असे फारियाने सांगितले.
चित्रपटात, फारिया एका अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे, जी तिच्या गावी परतते आणि तिच्या कुटुंबाच्या भूतकाळाबाबत रहस्याचा शोध गेहते. पडद्यावरील अभिनेत्री आणि खऱ्या आयुष्यातील अभिनेत्री यातील फरकाबद्दल विचारले असता ती म्हणाली, “जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या कुटुंबाचा मला फारसा पाठिंबा नव्हता. त्यामुळे इथपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागली, मी रंगवलेल्या व्यक्तिरेखेचाही असाच प्रवास आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या उद्योगात येण्याचा ती प्रयत्न करते, जिथे तिला टिकवून ठेवणारी एकमेव गोष्ट तिची अभिनयाची आवड ही आहे . त्यांचे अनुभव वेगळे असतील, मात्र त्यांचा एकूणच प्रवास सारखा आहे आणि मी माझ्या या इंडस्ट्रीत माझी 7 वर्षे घालवली आहेत .”
निर्माते, अबू शाहिदद इमोन यांनी या चित्रपटाचे वर्णन 'एक गुंतागुंतीची आणि अतिशय सुंदर अशी आई-मुलीची कथा' असे केले आहे. या संवादात या उद्योगातील बदलांकडे देखील लक्ष वेधण्यात आले. यावर अफसाना मिमी म्हणाली, "आता तरुण प्रतिभावंत आणि नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी अधिक वाव आहे, जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी याची कल्पनाही करू शकत नव्हते. " बांगलादेशमधील चित्रपट उद्योगात महिलांना किती वाव आहे असे विचारले असता, मिमी म्हणाली की स्त्री-प्रधान भूमिका कायमच होत्या , मात्र महिला दिग्दर्शकांची संख्या खूप कमी आहे.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
Follow us on social media:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878978)
Visitor Counter : 229