माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फीमध्ये 75 सृजनशील प्रतिभावंतांनी ‘आयडिया ऑफ इंडिया@100’ या विषयावर, 53 दिवसांचे आव्हान या स्पर्धेअंतर्गत तयार केले 'पाच अप्रतिम चित्रपट'
गोवा/मुंबई, 24 नोव्हेंबर 2022
इफ्फीमध्ये गेल्यावर्षीपासून सुरु झालेल्या ‘भविष्यातील 75 सृजनशील प्रतिभावंत’ ह्या उपक्रमाअंतर्गत, युवा कलावंतांना देण्यात आलेल्या ‘53-तास आव्हान’ स्पर्धेचा समारोप काल झाला. या स्पर्धेत सगळ्या 75 कलावंतांना आयडिया ऑफ इंडिया@100 या विषयावर केवळ 53 तासांत एक लघुपट बनवण्याचे आव्हान देण्यात आले होते.
21 नोव्हेंबरला केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. 53 व्या इफ्फी मधील या उपक्रमाला, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि शॉर्ट्स टीव्ही यांचे पाठबळ लाभले आहे. आज या स्पर्धेची अंतिम फेरी झाली. या 53 तासांत युवा कलावंतांनी पाच लघुपट तयार केले. चित्रीकरणापासून ते अंतिम चित्रपट निर्मितीपर्यंत, या सगळ्या चित्रपट निर्मात्यांनी अथक परिश्रम करुन, हे सिनेमे निर्माण केले.
या स्पर्धेत, टीम पर्पल च्या ‘डिअर डायरी’ या चित्रपटाने परीक्षकांची विशेष वाहवा मिळवली. या चित्रपटात, एका अशा पीडित महिलेची कथा आहे, जी जेव्हा तिच्या बहिणीला भेटायला जाते, तेव्हा, तिच्यासोबत भूतकाळात झालेल्या, एका दुर्दैवी घटनेच्या स्मृति पुन्हा जाग्या होतात. तिच्यासोबत ही घटना जिथे झाली, तिथेच तिच्या बहिणीला जायचे असते, त्यामुळे ह्या सगळ्या स्मृतींचा पुन्हा एकदा या महिलेला सामना करावा लागतो. प्रथम पुरस्कार मिळवणारा हा लघुपट, भविष्यातील, नव्या आयुष्याचा संदेश देत, महिलांच्या सुरक्षिततेचा विषय अधोरेखित करतो.
टीम पर्पलच्या या विजेत्या चमूमध्ये, 15 सदस्य निवडले गेले होते. सिनेमाक्षेत्रातील त्यांच्या विविध क्षमता, जसे की छायाचित्रण, दिग्दर्शन, अभिनय, संगीत संयोजन, पार्श्वगायन, अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स, पटकथा लेखन, वेशभूषा, मेक अप, संकलन आणि आर्ट डिझाईन अशा विविध क्षेत्रातल्या युवा कलावंतांचा चमू बनवण्यात आला होता. विजेत्या चमूला 2,25,000 रुपयांचा धनादेश, पुरस्कार म्हणून देण्यात आला.
इतर चार सिनेमांची माहिती खालीलप्रमाणे :
टीम ऑरेंज ने ‘अंतर्दृष्टि’ हा लघुपट तयार केला होता. यात अशा एका माणसाची कथा आहे, जो कित्येक वर्षे आपल्या घरातून बाहेरच पडलेला नाही, आणि जो अनेक वर्षांनी घराबाहेर पाडून बाहेरच्या जगाचा सामना करतो आणि जगातील छोट्या छोट्या सुखांचा आनंद घेतो.
‘टीम यलो’ ने ‘द रिंग’ हा चित्रपट तयार केला. हि एक अशा युवतीची कथा आहे, जिला, एका मान्य नसलेल्या परंपरेचा सामना करावा लागतो, तेव्हा, ‘आपण कोण आहोत’ या मूलभूत प्रश्नावर निर्णय घेण्याची वेळ येते.
टीम ग्रीन ने तयार केलेला ‘ऑल्मोस्ट’ हा चित्रपटही एका अशा युवतीची कथा सांगतो, जिला अशी जाणीव होते की मुलाला आई आणि वडील दोन्ही एकाचवेळी मिळू शकतात.
टीम पिंक ने ‘सौ का नोट’ हा सिनेमा बनवला. डिजिटल जगातील भविष्याची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात, प्रत्यक्ष पैशाचा वापर जवळपास कालबाह्य झाल्याने एका छोट्या मुलाला मिळालेली शंभर रुपयांची नोट कशी वापरायची असते, हेच कळत नाही.
हे पाचही चित्रपट आता देशभरात शॉर्ट्स टीव्हीवर, येत्या रविवारी, 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 9 वाजता प्रदर्शित केले जाणार आहेत. त्याचवेळी अमेरिका, युरोप आणि लॅटिन अमेरिकेतही हे चित्रपट दाखवले जातील.
समूह स्पर्धेअंतर्गत ‘आयडिया ऑफ इंडिया@100’ या विषयावरील लघुपट स्पर्धेनुसार, तीन सदस्यीय परीक्षकमंडळाने या पाच चित्रपटांची निवड केली. परीक्षक मंडळाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, पद्मश्री मणी रत्नम हे होते. तर शॉर्ट्स टीव्हीचे संस्थापक आणि सीईओ कार्टर पिचर आणि माहिती प्रसारण विभागाचे उपसचिव(फिल्म्स-I), आर्मस्ट्रॉंग पाम हे सदस्य होते.
या स्पर्धेविषयी बोलतांना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, की सध्या आपण सगळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचालही करत आहोत. अशा वेळी देशभरातील 75 नवोदित चित्रपट निर्मात्यांना 53 तासांचे आव्हान, या स्पर्धेअंतर्गत, त्यांची कौशल्ये आणि गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. “भविष्यातील सृजनशील प्रतिभावंत” अशा या युवकांनी तयार केलेले हे पाच लघुपट आणि त्यात, अव्वल ठरलेल्या ‘डिअर डायरी’ या लघुपटाची केवळ नायिकाच स्त्री आहे, असं नाही, तर लघुपटाचे दिग्दर्शनही एका युवतीनेच केले आहे. भारताच्या नारी शक्तिचे हे उत्तम उदाहरण आहे. आत्मनिर्भर भारत@100 ही दूरदृष्टी घेऊन, महिला कसे समर्थपणे नेतृत्व करत आहे, याचाही प्रत्यय आपल्याला येतो”.
“या पाच पैकी प्रत्येक सिनेमात असं काही तरी आहे जे पूर्णपणे अफलातून आहे,” इफ्फिच्या टेबल टॉक सत्रात बोलताना कार्टर पिचर आज म्हणाले.
दृश्य कथाकथनाचा देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीवर परिणाम होतो, यातून भविष्याचा पाया रचला जातो आणि समाजावर एक सकारात्मक परिणाम होतो. 53 तासांचे आव्हान ही भारतातील उदयोन्मुख प्रतिभेला मिळालेली संधी आहे, ज्यायोगे ते एकत्र येऊन भारत स्वातंत्र्याच्या 100 च्या वर्षी कसा असेल याचा विचार करून चित्रपट बनतील. हे तरुण निर्माते देशाचे भविष्य आहेत आणि आपल्या कथांमधून, देशाला आकार देऊ शकतात.
हे आव्हान संकल्पनेतून प्रत्यक्षात आणण्यासाठी, संकल्पना विकास, निर्मिती संकल्पना, रेखांकन आणि निर्मिती, उपकरणे आणि कामाच्या जागा, चित्रीकरणाच्या जागांची माहिती घेणे, चित्रपट निर्मात्यांच्या सूचनांच्या अनुसार सृजनशील काम, मार्गदर्शन, संहितेवर चर्चा, उपकरणे मिळविणे, कार्यक्रमासाठी चमू उभा करणे आणि त्यातील आव्हाने, संपादन चमू, तांत्रिक मदत आणि स्थानिक निर्माते, यांची गरज होती.
* * *
PIB Mumbai | S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878774)
Visitor Counter : 193