माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अपयश एक घटना आहे, व्यक्ती कधी अपयशी होत नसते : अनुपम खेर
'पडदा आणि नाटकांसाठीचे सादरीकरण' या विषयावर 53 व्या इफ्फीत अभिनेते अनुपम खेर यांनी घेतला मास्टरक्लास
गोवा/मुंबई, 23 नोव्हेंबर 2022
"जन्मापासूनच कोणी अभिनेता नसते. शाळेतील नाटकात माझा पहिला अभिनय एक संकटच होते. मात्र, मी केलेल्या सर्वोत्तम प्रयत्नांसाठी माझ्या वडिलांनी संध्याकाळी मला फुले भेट दिली.” गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पार्श्वभूमीवर, 'पडदा आणि नाटकांसाठीचे सादरीकरण' या विषयावर आज घेतलेल्या मास्टरक्लास दरम्यान ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर बोलत होते.
साधारण पार्श्वभूमी असतानाही ते यशस्वी अभिनेता कसे बनले याचा जीवनप्रवास त्यांनी यावेळी सांगितला.
त्यांचे बालपण सिमला येथे एका संयुक्त कुटुंबात गेले. हा एकप्रकारे आशीर्वादच होता कारण तिथे बोलायला आसपास माणसे होती असे ते म्हणाले. "मला आजोबांची आणि वडिलांची खूप आठवण येते. वडील म्हणायचे 'अपयश एक घटना आहे, व्यक्ती कधी अपयशी होत नसते.' जोपर्यंत मी पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत मी पराभूत होऊ शकत नाही" असे अनुपम खेर यांनी सांगितले.
इतर कोणत्याही क्षेत्र किंवा व्यवसायाप्रमाणेच अभिनयातील प्रशिक्षण देखील अतिशय महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. “प्रशिक्षण तुम्हाला आत्मविश्वास देतो. हे एखाद्या वाहन चालवायला शिकवणाऱ्या वर्गाप्रमाणे आहे. ते भीती दूर करते. अभिनयाचा कोणताही अभ्यासक्रम नसतो. हे सारे मानवी स्वभावाबाबत आहे." असेही ते म्हणाले. भारतीय सिनेमा आपल्या अंतरंगाचा एक भाग असल्याचे अनुपम खेर मानतात.
“पूर्वीच्या काळी सिनेमा हेच मनोरंजनाचे एकमेव माध्यम होते.” असे ते म्हणाले.
“अभिनेता भावनांनी आणि जीवनरसाने ओतप्रोत असला पाहिजे. निरिक्षण, कल्पना आणि भावनात्मक स्मृती ही अभिनेत्याची तीन शस्त्रे आहेत.” असे त्यांनी उत्तम अभिनेता कोण? हे विषद करताना सांगितले. “तुम्ही अभिनयाबरोबर खेळलात तर तुम्ही अधिक शिकू शकता”असा संदेश त्यांनी अभिनयाच्या विद्यार्थ्यांना दिला.
एका अभिनेत्याने, स्वतःला पूर्णपणे मूर्ख बनवण्यासाठी तयार राहायला हवे. जोपर्यंत तुम्ही मूर्ख बनत नाही, तोपर्यंत तुम्ही अभिनेता बनू शकत नाही. अभिनेता आणि व्यक्ती म्हणून स्वतःला गांभीर्याने घेऊ नका” असा सल्ला त्यांनी अभिनेत्यांना दिला.
“लोकांना मी आठवणी दिल्या पाहिजेत असे मला वाटते. आठवणी देणे महत्वाचे आहे, प्रत्येक क्षण जगायला हवा. तक्रार करण्याची आपल्याला सवय आहे. आयुष्य म्हणजे कृतीशीलता, टीका करणे नव्हे.” जीवन हा प्रवास आहे. ध्येय नाही असे ते म्हणाले.
“नाटक तुम्हाला लक्ष्यित एकाग्रता देते. संवाद आणि संकेत सारखेच राहत असले तरी प्रेक्षकांनुसार तुम्हाला सादरीकरणात बदल करावा लागतो. 40 दिवसांच्या तालमीनंतर हे येऊ लागते’. “प्रभूत्व हा प्रतिभेचा सर्वात मोठा शत्रू आहे. “नाटकात रिटेकला जागा नसते. म्हणून अनेक लोक याला हलक्यात घेतात!” अशा शब्दात त्यांनी नाटक आणि सिनेमातील फरक उलगडून सांगितला.
* * *
PIB Mumbai | Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1878487)
Visitor Counter : 237