माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

द स्टोरीटेलर हा चित्रपट म्हणजे सत्यजित रे या सिनेमासृष्टीच्या दंतकथेला वाहिलेली नम्र आदरांजली आहे: आदिल हुसेन


द स्टोरीटेलर चित्रपटातून वाङमयचोरी विरोधात संदेश देण्यात आला आहे

गोवा/मुंबई, 22 नोव्‍हेंबर 2022

 

अभिनेता आदिल हुसेन म्हणाले, “द स्टोरीटेलर हा चित्रपट म्हणजे सत्यजित रे या भारतीय चित्रपटसृष्टीतील महान व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली नम्र आदरांजली आहे.” गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या ‘टेबल टॉक’ या चर्चात्मक कार्यक्रमात ‘द स्टोरीटेलर’ या चित्रपटातील कलाकार आणि इतर तंत्रज्ञांनी उपस्थितांशी संवाद साधला, त्यावेळी हुसेन बोलत होते.  

या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे आदिल हुसेन, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच सिनेरसिकांशी या चित्रपटाबाबत चर्चा करताना म्हणाले की ह्या चित्रपटाची कथा प्रख्यात चित्रपट निर्माते आणि कथाकार सत्यजित रे यांच्या लघुकथेवर आधारित आहे.

“एक कलाकार म्हणून मला असे वाटते की कला नेहमी मुक्त असायला हवी. मात्र सध्याच्या काळात, चित्रपट निर्मितीमध्ये खूप प्रमाणात व्यापारी तत्वे अंतर्भूत झाली आहेत, जगात काहीही फुकट मिळत नसते, त्यामुळे एखाद्याच्या निर्मितीच्या अस्सलपणाचा सन्मान करणे आणि वाङमयचोरी टाळणे ही कलाकार समुदायाची जबाबदारी आहे. आजकाल, कॉपीराईट अर्थात सर्वाधिकार ही केवळ चित्रपट सृष्टीतच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात आव्हानात्मक बाब झाली आहे,” अभिनेत्री तनिष्ठा चटर्जी म्हणाल्या.

वाङमयचोरीबाबतच्या चर्चेदरम्यान आणखी मुद्दे मांडताना आदिल हुसेन म्हणाले, “कार्मिक नियमानुसार, तुम्हाला काहीही मोफत मिळाले तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. म्हणूनच, कला असो वा इतर कोणतीही गोष्ट, कोणतेही उत्पादन किंवा सेवा घेताना तुम्ही त्याचा मोबदला पैशाच्या किंवा कृतज्ञतेच्या रुपात देऊन सर्जकाच्या कार्याची पोचपावती दिली पाहिजे. कॉपीराईटची समस्या सोडवण्यासाठी हे मूलभूत तत्व पाळायला हवे.”

चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना आदिल हुसेन म्हणाले की अभिनेत्याने त्याच्या संकुचित स्वत्वाकडून अधिक व्यापक स्वत्वाकडे प्रवास केला पाहिजे, तेव्हाच तो अभिनेता चित्रपटाच्या कथेशी आणि भूमिकेशी समरस होऊ शकेल. “त्या भूमिकेच्या अंतरंगात शिरण्याची कला आत्मसात करणे हा एखाद्या अभिनेत्याचा सर्वात मोठा गुण आहे,” ते म्हणाले.

उपस्थितांपैकी एका व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री तनिष्ठा म्हणाल्या की, कलाकार आणि प्रेक्षक यांना स्वतःविषयी प्रश्न उपस्थित करण्याच्या स्थितीला नेणे हे कलेचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या उत्तराला जोड देत आदिल म्हणाले की, आपल्या अस्तित्वाविषयी प्रश्न विचारू शकू अशा अधिक उंचीवरील मानसिक पातळीवर आपल्याला घेऊन जाणे हाच कलेचा मूळ हेतू आहे. “चित्रपट केवळ पैसे कमवण्यासाठी बनविले जात नाहीत तर त्यांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याचा देखील उद्देश त्यामागे आहे,” ते म्हणाले.  

निर्मात्या सुछंदा चटर्जी म्हणाल्या की हा चित्रपट वाङमयचोरी विरोधात कडक संदेश देतो. “या चित्रपटाच्या निर्मितीचा तीन वर्षांचा हा अत्यंत खडतर प्रवास होता, पण त्यातून झालेल्या निर्मितीबाबत आम्ही आनंदी आहोत,”त्या म्हणाल्या.

53 व्या इफ्फीमध्ये काल ‘द स्टोरीटेलर’ या चित्रपटाचे सादरीकरण झाले आणि त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट 53व्या इफ्फीमधील प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी देखील इतर चित्रपटांसह स्पर्धेत आहे.  

 

चित्रपटाचे नाव : द स्टोरीटेलर

दिग्दर्शक : अनंत नारायण महादेवन

निर्माता:क्वेस्ट फिल्म्स

पटकथा : किरीट खुराणा

सिनेमॅटोग्राफर: अल्फोन्स रॉय

संकलक: गौरव गोपाळ झा

कलाकार : परेश रावल, आदिल हुसेन, रेवती, तनिष्ठा चटर्जी,जयेश मोरे

 

संक्षिप्त कथा

तारिणी रंजन बंदोपाध्याय हा एक बेछुट कथाकार, कोणत्याही एका नोकरीत टिकून राहत नाही. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने 32 नोकऱ्या बदलल्या आहेत. आता 60 वर्षे वयाचा हा निवृत्त विधुर, त्याची पत्नी अनुराधा जिवंत असताना तिला हव्या त्या ठिकाणी फिरायला घेऊन जाण्यासाठी वेळ न काढू शकल्याबद्दलची एकमेव खंत मनात बाळगून असतो. मात्र, आता अचानक, नोकरी नसताना, जगातील कोणाहीपेक्षा अधिक वेळ त्याच्याकडे आहे, पण त्याचे सुहृद मात्र त्याच्याजवळ नाहीत याची जाणीव त्याला होते.

या चित्रपटाविषयी आज झालेली संपूर्ण चर्चा पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1878064) Visitor Counter : 237


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil