कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी निवृत्तीवेतन विभागाची केली प्रशंसा; अवघ्या 20 दिवसांत राष्ट्रव्यापी मोहीम राबवून 25 लाख निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांची डिजिटल जीवन प्रमाणपत्रे विभागाने केली तयार
Posted On:
21 NOV 2022 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2022
निवृत्तीवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने अवघ्या 20 दिवसांत राष्ट्रव्यापी मोहीम राबवून 25 लाख निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांची डिजिटल लाईफ सर्टिफिकेट्स अर्थात हयातीचे दाखले तयार केले. त्याबद्दल केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री (स्वतंत्र कार्यभार), केंद्रीय भूविज्ञान मंत्री (स्वतंत्र कार्यभार), राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारनिवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा व अवकाश विषयक कार्यभार पाहणारे डॉ. जितेंद्र सिंह यांनी विभागाची प्रशंसा केली आहे.
निवृत्तीवेतन विभागाने 1 ते 19 नोव्हेंबर 2022 या कालावधीत देशाच्या उत्तरेकडील श्रीनगरपासून ते दक्षिणेतील कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकॉईलपर्यंत आणि पूर्वेकडील गुवाहाटीपासून ते पश्चिमेकडील अहमदाबादपर्यंत सर्वत्र, विविध शहरांमध्ये विशेष जनजागरुकता शिबिरांचे आयोजन केले होते. त्यामध्ये विभागाने तयार केलेल्या 25 लाख डिजिटल जीवन प्रमाणपत्रांमधील 2 लाख 20 हजार प्रमाणपत्रे ही चेहरा ओळखणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारे तयार केली आहेत. त्यामुळे वाढत्या वयोमानानुसार वेगवेगळ्या शारिरीक आव्हानांना सामोरे जावे लागणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवी दिल्ली इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
दिल्ली, नॉइडा, चंदिगढ, मोहाली, जम्मू, श्रीनगर, नागपूर, पुणे, अलाहाबाद, जालंधर, ग्वाल्हेर, त्रिसूर, मदुराई, नागरकॉईल, बडोदा, अहमदाबाद, गुवाहाटी, हैदराबाद, अंबरनाथ (मुंबई महानगर), भुवनेश्वर, बालासोर, कटक, तिरुवनंतपुरम आणि जयपूर या शहरांमध्ये आजवर शिबीरे घेण्यात आल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. येत्या दोन आठवड्यांत विभाग डिजिटल दाखल्यांविषयी जनजागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरातील विविध ठिकाणी आणखी 14 शिबिरांचे आयोजन करणार आहे. देशाच्या विविध भागांतील निवृत्तीवेतनधारकांकडून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले.
निवृत्तीवेतन अखंड मिळावे यासाठी निवृत्तीवेतनधारकांना आपण हयात असल्याचा दाखला दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सरकारजमा करावा लागतो. त्यामध्ये 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या निवृत्तीवेतनधारकांना ऑक्टोबर महिन्यात दाखला जमा करता येण्याची विशेष तरतूद आहे. चालू पद्धतीनुसार, निवृत्तीवेतनधारकांना जिवंत असल्याचा दाखला देण्यासाठी बँकांमध्ये रांगेत बराच काळ उभे राहावे लागते. वयोवृद्ध, वयोमानानुसार वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या, शारिरीक ताकद कमी झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना हे गैरसोयीचे होते. खेरीज, ही प्रक्रिया केल्यानंतर दाखला निवृत्तीवेतन वितरण प्राधिकरणाकडे जमा झाल्याची पोच अथवा नोंदीची स्थिती पाहता येत नव्हती, याकडे केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष वेधले.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहाय्याने चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली विकसित करून तिला ‘आधार’च्या विदा बॅंकेशी जोडून हयात असल्याचा डिजिटल दाखला अँड्रॉईड प्रणालीवर आधारित कोणत्याही स्मार्ट फोनमार्फत देता येण्याची सुविधा वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल विभागाबद्दल डॉ. जितेंद्र सिंह यांनी अभिमान व्यक्त केला.
S.Patil/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877846)
Visitor Counter : 190