माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

53व्या इफ्फीमध्ये ‘कंट्री फोकस’ विभागाच्या उद्घाटन समारंभात फ्रान्सचे भारतातील राजदूत इमन्युएल लेनेन आणि फ्रेंच दूतावासातील प्रतिनिधीमंडळाची उपस्थिती

गोवा/मुंबई, 21 नोव्‍हेंबर 2022

 

गोवा येथे सुरु असलेल्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘कंट्री फोकस’ विभागामध्ये फ्रान्सच्या चित्रपटांच्या सादरीकरणाला आजपासून सुरुवात झाली. यामध्ये आज गोवा येथील आयनॉक्स चित्रपटगृहात इमन्युएल कॅरेरे यांचा ‘बिटवीन टू वर्ल्डस’  हा चित्रपट दाखवण्यात आला. फ्रेंच दूतावासातील प्रतिनिधीमंडळासह फ्रान्सचे भारतातील राजदूत इमन्युएल लेनेन यावेळी उपस्थित होते. या प्रतिनिधी मंडळात, फ्रान्सचे मुंबईतील कौन्सिल जनरल जीन-मार्क सेरे-शार्लट, शिक्षण, विज्ञान तसेच संस्कृती विभागाचे सल्लागार आणि फ्रेंच शिक्षण संस्थेचे भारतातील संचालक इमन्युएल लेब्रून-दामियेन्स यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश आहे. यावर्षीच्या ‘कंट्री फोकस’ विभागातील पहिल्या चित्रपटाच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे अतिरिक्त सचिव नीरजा शेखर यांनी फ्रेंच प्रतिनिधीमंडळाचा सत्कार केला.

फ्रान्सचे भारतातील राजदूत इमन्युएल लेनेन यांनी उपस्थितांना फ्रान्सच्या चित्रपटविषयक प्रतिनिधीमंडळातील सदस्यांची ओळख करून दिली. हे सदस्य नेपोलियनच्या लष्करात अधिकारी पदावर काम करणाऱ्या आणि वॉटरलूच्या लढाईत हार पत्करावी लागल्यानंतर ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईत भारतीय शासकांना मदत करण्यासाठी भारतात आलेल्या त्यांच्या पूर्वजांवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या संदर्भात, लेनेन म्हणाले की हा चित्रपट भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान असलेल्या दीर्घकालीन मैत्रीचे दर्शन घडवेल.

इफ्फीमध्ये ‘कंट्री ऑफ फोकस’ अर्थात प्रकाशझोतातील देश म्हणून आमंत्रित केले जाणे हा  मोठा सन्मान आहे, असे फ्रान्सचे राजदूत म्हणाले.  दक्षिण आशिया मधील  सर्वात मोठा चित्रपट बाजार, फिल्म बाजार पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे ते म्हणाले. यावर्षी  गोव्यातील महोत्सवात फ्रान्सच्या सहभागातून उदयास येणाऱ्या नवीन प्रकल्पांबाबतही त्यांनी आशा व्यक्त केली.

भारताप्रमाणेच फ्रान्स देखील देखील चित्रपटसृष्टीचे एक महान राष्ट्र आहे,  ज्यामध्ये दरवर्षी 300 हून अधिक चित्रपट तयार होतात, असे फ्रान्सच्या भारतातील राजदूतांनी सांगितले.

जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग असलेल्या भारतासोबत चित्रपटांसाठी एकत्र काम करायला आणि चित्रपटांची  सह निर्मिती करायला  फ्रान्स उत्सुक आहे, फ्रान्समध्ये सह-निर्मितीला  आमचे  प्राधान्य असून  सहनिर्मितीला  प्रोत्साहन देण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करतील, असे ते म्हणाले.

अधिकाधिक चित्रपटांचे चित्रीकरण फ्रान्स मध्ये व्हावे अशी आमची अपेक्षा असून त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना फ्रान्स देश बघता येईल, असे ते म्हणाले. फ्रान्स मध्ये चित्रपटांचे चित्रीकरण सुरळीत व्हावे यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. फ्रान्समध्ये चित्रपट निर्मिती आणि अॅनिमेशनच्या चांगल्या शाळा असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारत आणि फ्रान्स ने सहनिर्मिती केलेले लंचबॉक्स, सर अँड अदर्स या चित्रपटांना उत्कृष्ट यश मिळाले, असे सांगून त्यांनी  इंडो-फ्रेंच सह निर्मिती असलेल्या 2023 च्या ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश मिळवलेल्या  ‘छेल्लो शो’ चित्रपटाचा देखील  उल्लेख केला.

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/Bhakti/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1877781) Visitor Counter : 213


Read this release in: Kannada , English , Urdu , Hindi