संसदीय कामकाज मंत्रालय

21 व्या जागतिक लेखापाल अधिवेशनाचे  मुंबईत आयोजन


आर्थिक बदलाचे संवाहक  म्हणून एक चांगले, शाश्वत जग निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करा- लोकसभा अध्यक्षांचे लेखापालांना आवाहन 

पृथ्वीचे भवितव्य सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला  शाश्वत जीवनशैली अंगीकारण्याची गरज - केंद्रीय अर्थमंत्री

Posted On: 18 NOV 2022 8:01PM by PIB Mumbai

 

आर्थिक बदलाचे संवाहक म्हणून संवाद, चर्चा आणि सहकार्याद्वारे शाश्वत जगाच्या निर्मितीसाठी  कार्य करण्याचे  आणि  एक चांगले जग उभारण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन लोकसभेचे  अध्यक्ष  ओम बिर्ला यांनी आज लेखापालांना केले.  ते मुंबईत आयोजित 21 व्या जागतिक लेखापाल अधिवेशनाला  (डब्लूसीओए)  संबोधित करत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखापालांच्या जागतिक अधिवेशनाला आभासी माध्यमातून  संबोधित केले.

"तुम्ही आर्थिक जगताचे  इंजिन आहात आणि भारत आणि परदेशातील अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहात.", असे लोकसभा अध्यक्षांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लेखापालांचे स्वागत करताना सांगितले.

आंतरराष्ट्रीय लेखापाल महासंघ (आयएफएसी )आपल्या स्थापनेपासूनच, आर्थिक व्यवस्थेमध्ये विश्वास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी आणि ते  बळकट  करण्यासाठी कार्यरत  आहे.या जागतिक अधिवेशनातील चर्चांमधून निघणारे फलित  जागतिक अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा देईल आणि भविष्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करेल. हे लेखाशास्त्र क्षेत्रातील सध्याच्या समस्यांवर उपाय शोधण्यास  मदत करेल., असे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.

जागतिकीकरण आणि डिजिटल अर्थव्यवस्थेने आपल्यासमोर नवीन आव्हाने उभी केली आहेत. आर्थिक तज्ञ म्हणून, तुम्हाला ती अधिक चांगली समजतील. या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता तुमच्यात आहे., असे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.

लेखापालांच्या जागतिक अधिवेशनाने  विश्वास, नैतिकता, विविधता आणि पारदर्शकता यासारख्या मुख्य विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जागतिक लेखापाल अधिवेशनाला आभासी माध्यमातून संबोधित करताना सांगितले. जागतिक लेखापाल अधिवेशन 2022 पहिल्यांदाच भारतात आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनाच्या माध्यमातून, पारदर्शक लेखा प्रक्रियेच्या शोधात असणाऱ्या  देशांसाठी , बहु-राष्ट्रीय संस्थांसाठी संबंधित कल्पना मांडाव्यात ., असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.

सीतारामन यांनी यावेळी बोलताना शाश्वत जीवनशैलीच्या गरजेवर अधिक भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी एलआयएफई अर्थात पर्यावरणासाठी पोषक जीवनशैलीच्या संकल्पनेवर भर देत आहेत. येत्या 1 डिसेंबर पासून जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे येणार आहे. एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्यही भारताची जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील संकल्पना आहे. पृथ्वीचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करण्याची गरज आहे असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

जागतिक लेखापाल संमेलन 2022 च्या आयोजनातील सर्व संकल्पनांमध्ये विश्वासही एक महत्त्वाची संकल्पना समाविष्ट आहे याकडे निर्देश करत केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, जनतेसाठी शाश्वत उपजीविका तसेच शाश्वत उत्पादन आणि सेवा क्षेत्र उभारण्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे. शाश्वततेसह वाढीव पारदर्शकता आणून हे जग अधिक उत्तम प्रकारे कसे चालवता येईल यासाठीच्या कल्पना या जागतिक संमेलनात मांडल्या जातील अशी मला खात्री वाटते, असे त्या म्हणाल्या.

जागतिक लेखापाल संमेलन 2022 हा लेखा, अर्थ आणि व्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी परस्परसंवादी चर्चांच्या माध्यमातून संकल्पनांच्या देवाणघेवाणीसाठीचा मंच आहे. लेखा क्षेत्राशी संबंधित सहा हजाराहून अधिक व्यावसायिक या संमेलनामध्ये उपस्थित राहणार असून त्यात  जगभरातील 100 देशांतून आलेल्या 1800 हून अधिक परदेशी प्रतिनिधींचा समावेश आहे.

हे संमेलन आंतरराष्ट्रीय लेखापाल महासंघाने आयोजित केले आहे. वर्ष 1977 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय लेखापाल महासंघ ही संघटना लेखा व्यवसायातील व्यावसायिकांची  जागतिक पातळीवरील संस्था असून ती या व्यवसायाला सशक्तता देण्यासाठी आणि जगातील मजबूत आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या विकासात योगदान देण्यासाठी लोककल्याणाच्या सेवेत समर्पित आहे. 135 देश तसेच न्यायाधिकार क्षेत्रांमध्ये या महासंघाचे 180 सदस्य आणि  सहयोगी आहेत. ही संस्था सार्वजनिक सेवा, शिक्षण, सरकारी सेवा,उद्योग आणि वाणिज्य या क्षेत्रांतील 3 दशलक्षांहून  अधिक लेखापालांचे प्रतिनिधित्व करते.

***

S.Patil/S.Chavan/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877148) Visitor Counter : 219


Read this release in: English , Urdu , Hindi