वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
प्रगती मैदानात भरलेल्या 41 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं (IITF) वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी केले उद्घाटन
पारंपरिक कला कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात सर्वत्र स्थानिक पातळीवर व्यापार मेळावे भरवायला हवेत: पीयूष गोयल
IITF 2022 मध्ये देशातली 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, तसेच बाहेरचे 12 देश भाग घेणार, लेह लदाख पहिल्यांदाच सहभागी
Posted On:
14 NOV 2022 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2022
स्थानिक कला-कौशल्यासह, उद्योग तसेच उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि व्यापार मेळाव्यांची परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अधिकाधिक संख्येने व्यापार मेळावे भरवायला हवेत, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. नवी दिल्लीत प्रगती मैदानावर भरलेल्या 41 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आज उद्घाटन केल्यानंतर, ते उपस्थितांना संबोधित करत होते.
हे व्यापारी मेळावे वर्षातून दोनदा भरवावेत आणि दुसऱ्या मेळाव्यात आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वावलंबी भारताच्या संकल्पनेवर भर देण्यात यावा, अशी सूचना पीयूष गोयल यांनी यावेळी केली.यामुळे भारताकडे असलेली स्वदेशी उत्पादन निर्मितीची क्षमता आणि या क्षमतेचे वाढते सामर्थ्य जगापुढे येईल, असे ते म्हणाले. या स्वदेशी मेळाव्यात महिला, सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग(MSME), छोटे उद्योजक, सेवा पुरवठा क्षेत्रातले प्रदर्शक व्यापारी आणि नवे प्रदर्शक व्यापारी यांना जास्तीत जास्त संधी द्यावी. एकीकडे या मेळाव्यांमधला सहभाग जास्तीत जास्त वाढवत असताना दुसरीकडे या मेळाव्यांची वाढलेली व्याप्ती, सहभागी सर्वांनाच कुठल्याही प्रकारच्या गोंधळाविना समन्यायीपणे सामावून घेऊ शकेल हे सुद्धा पहावे असे पीयूष गोयल म्हणाले.
स्थानिक व्यापार मेळावे संपूर्ण देशभरात सर्वत्र, विशेषतः सणासुदीच्या काळात आणि पर्यटनाच्या हंगामात आयोजित करायला हवेत असे मतही गोयल यांनी व्यक्त केले. यामुळे पारंपरिक आणि स्थानिक हातमाग आणि हस्तकलेच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊन चांगली उभारी मिळेल असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यांमध्ये आपापल्या उत्पादनांची विक्री करताना, ग्राहकांना आकर्षित करून घेता येईल अशा पद्धतीने उत्पादनांची दर्जेदार आवरण बांधणी (पॅकेजिंग) आणि या उत्पादनांची तसेच त्यांच्या आवरणांची दर्जेदार रचना ( डिझाईन) करण्यावर भर द्यावा, त्याकडे आपले लक्ष केंद्रित करावे, असे ते म्हणाले.
आज झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश, वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, मेळाव्यात सहभागी झालेल्या राज्यांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या व्यापार मेळाव्यांमध्ये उत्पादनांचा दर्जा आणि एकंदर व्यावसायिकता याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवे असे मंत्र्यांनी सांगितले. भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावे हे भारतीयांसाठी अभिमानाची बाब तर आहेतच, शिवाय या मेळाव्यांनी जगभरात नाव कमावले आहे असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. या मेळाव्यांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी या मेळाव्यांमधून फक्त उच्च दर्जाची उत्पादनेच विकली जातील हे पाहायला हवे, तसेच या मेळाव्यांमध्ये सहभाग निश्चित करण्यासाठी, प्रदर्शक व्यापाऱ्यांना आपापल्या उत्पादनांच्या दर्जाची खात्रीलायक हमी देणे अनिवार्य करावे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
या व्यापार मेळाव्यांमध्ये होणारे सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना करून मंत्री म्हणाले की भारताचे फिनटेक क्षेत्र जगातल्या सर्वात सक्षम फिनटेक क्षेत्रांपैकी एक आहे. गेल्या महिन्यात भारतात सुमारे 600 कोटी रुपयांचे डिजिटल आर्थिक व्यवहार झाले असेही मंत्र्यांनी नमूद केले. असे व्यापारी मेळावे आभासी पद्धतीने म्हणजेच ऑनलाइन भरवण्यावर सुद्धा विचार केला जावा, असेही त्यांनी सांगितले.
41व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात, भारत आणि परदेशातील मिळून सुमारे 2 हजार 500 प्रदर्शक व्यापारी सहभागी होत आहेत. एकंदर 73 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या परिसरात हा मेळावा भरला आहे. यावर्षी बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र ही राज्ये या मेळाव्यातील आयोजक भागीदार राज्ये आहेत, तर उत्तर प्रदेश आणि केरळ ही राज्ये फोकस स्टेटस आहेत. म्हणजेच या मेळाव्यामध्ये या राज्यांतील उत्पादनांवर सर्वात जास्त लक्ष पुरवण्यात आले आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, बहारीन, बेलारूस, इराण, नेपाळ, थायलंड, तुर्कस्तान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंडसह एकूण 12 देशांमधील प्रदर्शक व्यापारीसुद्धा या व्यापार मेळाव्यात सहभागी होत आहेत. गेल्या काही वर्षांप्रमाणेच यावेळी सुद्धा, सहभागी राज्यांचे राज्य दिन सोहळे,परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम, मेळाव्याला भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी या मेळाव्याचे आकर्षण राहणार आहेत.
* * *
R.Aghor/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1875979)
Visitor Counter : 189