माहिती आणि प्रसारण मंत्रालय
53व्या इफ्फीमध्ये स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार
या वर्षीच्या इफ्फीमध्ये फ्रान्स असणार ‘प्रकाशझोतातील’ देश
इफ्फीच्या 53 व्या आवृत्तीमध्ये 79 देशांमधील 280 देशाच्या चित्रपटांचे होणार प्रदर्शन
‘अल्मा अँड ऑस्कर’ महोत्सवाच्या उद्घाटनाचा चित्रपट तर ‘परफेक्ट नंबर’ असणार समारोपाचा चित्रपट
मुंबई, 14 नोव्हेंबर 2022
यंदाच्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी आज दिली. चित्रपट विश्वातील दिग्गजांना एका छत्राखाली आणणाऱ्या, कला, चित्रपट आणि संस्कृतीचे वातावरण निर्माण करून या विश्वात मोठी उर्जा निर्माण करणाऱ्या या महोत्सवाचे गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2022 या काळात आयोजन करण्यात येणार आहे. 53व्या इफ्फीची माहिती देण्यासाठी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे संचालक आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. यंदा या महोत्सवात 79 देशांचे 280 चित्रपट दाखवले जाणार आहेत. इंडियन पॅनोरमा मध्ये 25 भारतीय फीचर फिल्म आणि 20 बिगर फीचर फिल्म दाखवल्या जातील, तर 183 चित्रपट आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग असतील. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी देखील या संदर्भात इतर माहिती दिली.
• सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार
बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डेप्रिसा डेप्रिसा साठी गोल्डन बेअर, त्याचबरोबर ला काझा आणि पेपरमिंट फ्रापे साठी दोन सिल्वर बेअर्स, कार्मेन साठी बाफ्टा आणि कान महोत्सवात तीन पुरस्कार आणि इतर बरेच सन्मान मिळवणारे स्पॅनिश चित्रपट निर्माते कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आणि इफ्फीमध्ये आठ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
• उद्घाटनाचा चित्रपट आणि समारोपाचा चित्रपट
डिएटर बर्नेर दिग्दर्शित ‘अल्मा अँड ऑस्कर’ या ऑस्ट्रियन चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ होईल तर महोत्सवाच्या समारोपाला क्रिझ्टोव्ह झानुसी यांचा ‘ परफेक्ट नंबर’ हा चित्रपट दाखवला जाईल.
• प्रकाशझोतातील देश
यंदा फ्रान्स ‘प्रकाशझोतातील’ देश असेल आणि ‘प्रकाशझोतातील देश’ पॅकेज अंतर्गत 8 चित्रपट दाखवले जातील.
• इंडियन पॅनोरमा
‘इंडियन पॅनोरमा’ चा प्रारंभ पृथ्वी कोनानुर यांच्या ‘हडीनेलेन्तू’ या कन्नड चित्रपटाने होईल तर दिव्या कावसजी यांच्या द शो मस्ट गो ऑन ने बिगर फिचर फिल्म श्रेणीचा प्रारंभ होईल. पॅन नलिन यांच्या ‘चेलो शो- द लास्ट फिल्म शो’ या ऑस्कर चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम परदेशी चित्रपट श्रेणीतील भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटाचे आणि मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटांचे विशेष शो या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.
• जुन्या काळात गाजलेले भारतीय पुनरुज्जीवित चित्रपट’
नॅशनल फिल्म अर्काईव्हस ऑफ इंडियाचे (एनएफएआय) काही चित्रपट एनएफडीसीकडून दाखवले जाणार आहेत. ‘जुन्या काळात गाजलेले भारतीय पुनरुज्जीवित चित्रपट’ या श्रेणींतर्गत त्यांचे प्रदर्शन केले जाणार आहे.
यामध्ये सोहराब मोदी यांचा 1957 मधील ऐतिहासिक पोशाख आणि नाट्य असलेला नौशेरवान ए आदिल, रमेश महेश्वरींचा 1969 मधला राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘नानक नाम जहज है’ हा पंजाबी चित्रपट, 1980 मधला के विश्वनाथ यांचा तेलुगु संगीतमय नाट्य असलेला ‘शंकराभरणम’ आणि सत्यजित रे यांचे दोन गाजलेले चित्रपट, 1977 मध्ये आलेला इंग्रजी राजवटीच्या कालखंडातील संस्थानिकांच्या कथानकावर आधारित शतरंज के खिलाडी आणि 1989 मधला सामाजिक घडामोडींवर आधारित ‘गणशत्रू’ यांचा समावेश आहे.
• दादासाहेब फाळके विजेत्यांचे सिंहावलोकन
52 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी( 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जाहीर) आशा पारेख यांचे तिसरी मंजिल, दो बदन आणि कटी पतंग हे चित्रपट त्यांच्या कारकीर्दीकडे टाकलेला एक दृष्टीक्षेप म्हणून दाखवले जाणार आहेत.
• अभिवादन
अभिवादन विभागात पंधरा भारतीय आणि पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे.
भारतरत्न लता मंगेशकर, गायक संगीतकार बप्पी लाहिरी, महान कथक नर्तक पंडित बिरजू महाराज, अभिनेते रमेश देव, शिवकुमार सुब्रमणियम, टी रामा राव, वत्सला देशमुख, महेश्वरी अम्मा, सलीम घौस, गायक केके, दिग्दर्शक तरुम मजुमदार, दिग्दर्शक निर्माते रवी टंडन आणि सावन कुमार टांक, अभिनेते आणि नाट्य कलाकार निपोन गोस्वामी, अभिनेते आणि चित्रपट निर्माते प्रताप पोथेन, अभिनेते क्रिष्नम राजू आणि गायक भूपेंद्र सिंग यांना या विभागात आदरांजली वाहण्यात येईल.
आंतरराष्ट्रीय विभागात बॉब राफेल्सन, इवान रिटमन, पीटर बोगदानोविच, डग्लल ट्रम्बेल आणि मोनिका विटी यांना अभिवादन करण्यात येईल.
• बुक्स टू बॉक्स ऑफिस
यावर्षी इफ्फी आणि फिल्म बाजारमध्ये अनेक नवीन उपक्रम घेण्यात आले आहेत. पुस्तकांमध्ये छापलेल्या चांगल्या कथा आणि पुस्तकांचे रुपांतर करून बनवता येणारे चांगले चित्रपट यांच्यातील तफावत भरुन काढण्यासाठी नवीन पुस्तक रूपांतरण कार्यक्रम ‘बुक्स टू बॉक्स ऑफिस’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये रुपांतरित होऊ शकणार्या पुस्तकांच्या हक्कांची विक्री करण्यासाठी या कार्यक्रमात काही उत्तम प्रकाशक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
फिल्म बाजार शिफारस विभागात वीस चित्रपट दाखवले जातील,या माध्यमातून बाजार प्रतिनिधींना या चित्रपटांची झलक मिळेल आणि नेटवर्कवर उपस्थित राहून घेण्यात येणाऱ्या बैठकांद्वारे चित्रपट निर्मात्यांना भेटण्याची संधी मिळेल.
- रिचर्ड अॅटनबरो यांच्या ऑस्कर विजेत्या 'गांधी' सारखे चित्रपट ‘दिव्यांगजन’ विभागात दाखवले जातील, यासाठी दिव्यांगजनांना उपलब्ध करून देण्यात येणारी व्यवस्था ध्वनी आणि उपशीर्षकांसह दृकश्राव्य सुविधेने सुसज्ज असेल. या व्यवस्थेमुळे दिव्यांग चित्रपटप्रेमींना सहज चित्रपटाचा आनंद घेता येईल आणि सर्वसमावेशकतेच्या भावनेला प्रोत्साहन मिळेल.
- ईशान्य भारतातील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी एक उपक्रम म्हणून, 5 कथाआधारित आणि 5 कथाबाह्य चित्रपटांचा समावेश असलेला, मणिपुरी चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
- हिंदी चित्रपटांचे अनेक भव्य प्रीमियर असतील यात त्या चित्रपटातील कलाकार सिनेमाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असतील. यामध्ये परेश रावल यांचा 'द स्टोरीटेलर', अजय देवगण आणि तब्बू यांचा 'दृश्यम 2', वरुण धवन आणि कृती सेनॉनचा भेडिया आणि यामी गौतमचा लॉस्ट या चित्रपटांचा समावेश आहे. आगामी तेलगू चित्रपट 'रायमो ', दीप्ती नवल आणि कल्की कोचलिन यांचा 'गोल्डफिश' आणि रणदीप हुडा आणि इलियाना डी’क्रूझचा 'तेरा क्या होगा लवली' या चित्रपटांचा प्रीमियर इफ्फी मध्ये होणार आहे. तसेच वधंधी, खाकी आणि फौदा सीझन 4 सारख्या ओटीटी शोच्या भागांचाही यात समावेश असेल
- कान, बर्लिन, टोरंटो आणि व्हेनिस यांसारख्या जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कार पटकावलेल्या चित्रपटांची मोठी स्पर्धा या महोत्सवात असेल
- काही ऑस्कर विजेते दिग्दर्शित किंवा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही चित्रपट ऑस्कर विजेते दिग्दर्शित किंवा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पार्क-चॅन वूक यांचा डिसिजन टू लिव्ह आणि रुबेन ऑस्टलंडचा ट्रँगल ऑफ सॅडनेस, डॅरेन ओरोनोव्स्कीचीचा द व्हेल, गिलेर्मो डेल टोरोचा पिनोचियो, क्लेअर डेनिसचा बोथ साईड ऑफ द ब्लेड, गाय डेव्हिडीचा इनोसेन्स, अॅलिस डायपचा सेंट ओमेर आणि मरियम टुझानीचा द ब्लू कॅफ्टन. या चित्रपटांचा या समावेश आहे.
- प्रख्यात चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांसोबत 23 'मास्टरक्लासेस' आणि 'इन कॉन्व्हर्सेशन' सत्रांसह, हा एक उत्साहपूर्ण आठवडा असणार आहे. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्या पटकथा लेखनाचा एक मास्टर क्लास असेल, ए. श्रीकर प्रसाद यांचा संकलना संदर्भात आणि अनुपम खेर अभिनयाचा मास्टरक्लास घेतील. एसीइएसवरील मास्टरक्लासमध्ये ऑस्कर अकादमीमधील तज्ञ मार्गदर्शन करतील तर अॅनिमेशनवरचा मास्टरक्लास मार्क ऑस्बोर्न आणि ख्रिश्चन जेझडिक घेतील. आशा पारेख, प्रसून जोशी, आनंद एल राय, आर बाल्की आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे ‘इन-कन्व्हर्सेशन’ या संवादात्मक सत्रांद्वारे संवाद साधतील.
- आभासी इफ्फी - 53 वा इफ्फी आभासी माध्यमातून पाहता येईल. नोंदणीकृत वापरकर्त्यांना गोव्यात उपस्थित नसतानाही या मास्टरक्लासेस, संवादात्मक सत्रांचा, पॅनेल चर्चा आणि उद्घाटन आणि समारोप समारंभाचा भाग बनण्याची संधी मिळेल. अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन या थेट आभासी सत्रांच्या वेळापत्रकाची माहिती घेता येईल.
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यांतर्गत गेल्या 100 वर्षांतील भारतीय चित्रपटांचा विकास ही महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याची संकल्पना असेल.
- चित्रपट प्रदर्शनाच्या निमित्ताने, केंद्रीय संचार ब्युरो 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' प्रदर्शन आयोजित करेल. आयुष मंत्रालय देखील अधिकृत वेलनेस पार्टनर म्हणून प्रतिनिधी आणि सामान्य लोकांसाठी या महोत्सवाच्या कालावधीत योग मार्गदर्शन सत्रे आणि सर्वांगीण तपासणी सुविधा उपलब्ध करून देईल.
- महोत्सवाच्या या पर्वाच्या उद्घाटन आणि समारोप समारंभ भारतभरातीलचित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नामांकित कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील आणि यात फ्रान्स, स्पेन आणि गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करणारे संगीत आणि नृत्य समूह देखील सहभागी होतील.
53 व्या इफ्फीमध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमांचा तपशील येथे पाहता येईल.
* * *
PIB Mumbai | R.Aghor/S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1875973)
Visitor Counter : 318