माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ईफ्फी- 53 ची सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली


तेरे मेरे मिलन की ये रैना, या गीताच्या भावपूर्ण आठवणींना उजाळा देण्यासाठी ईफ्फीने केले प्रतिनिधींना निमंत्रित

“संगीत भारतीयांच्या जीवनात ठायी ठायी भरलेले आहे”: ईफ्फी 33 मध्ये लता मंगेशकर यांनी काढले होते उद्गार

Posted On: 12 NOV 2022 11:37PM by PIB Mumbai

 

आयुष्य लहान आणि भौगोलिकदृष्ट्या मर्यादित असू शकते, मात्र कलेला वेळ आणि स्थानाचे बंधन नाही. त्यामुळेच कलाकार आपल्या मनात आणि हृदयात कायम जिवंत राहतो.  मुंबईत या वर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झालेल्या सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आदरांजली वाहण्यात येत आहे. या  दिग्गज गायिकेची भावपूर्ण गाणी तर अनेक आहेत, प्रत्येक गाण्यातून त्यांनी भारतीय चित्रपट आणि संस्कृतीत स्वतःचे मोठे योगदान दिले आहे, तरीही या महान कलाकाराला श्रद्धांजली वाहण्यासाठी, ईफ्फीने  हृषिकेश मुखर्जी यांचा 1973 वर्षी प्रदर्शित झालेला अभिमान हा संगीतमय भावनाप्रधान   चित्रपट निवडला आहे.

भारतीय चित्रपटांच्या 70 च्या दशकातील हृदयस्पर्शी आठवणींच्या हिंदोळ्यावरुन मारलेला फेरफटका, तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही पिढीतील, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेरसिकांसाठी दुहेरी पर्वणीच ठरते.  अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी खूप सुंदरपणे साकारलेल्या सुबीर आणि उमा या प्रमुख पात्रांच्या जीवनात, प्रेम, सांगितीक महत्वाकांक्षा आणि अहंकार या भावभावनांच्या परस्पर सरमिसळीतून निर्माण होणाऱ्या क्लेशदायी कल्लोळाशी ते एकरुप होतील आणि पुन्हा पुन्हा एकरुप होतच राहतील.  इतकेच काय, 'तेरे मेरे मिलन की ये रैना', 'तेरी बिंदिया रे' आणि 'नदीया किनारे' यासारख्या सुमधूर गाण्यांच्या हृदयद्रावक सादरीकरणाच्या स्वर्गीय सौंदर्यात न्हाऊन निघत, चित्रपटरसिक या  मुलभूत जीवनसंघर्षात  तल्लीन होऊन जातील.  चित्रपट रसिक ज्यांना प्रेमाने दिदी म्हणतात, त्या लताजींनी,  'अब तो है तुमसे हर खुशी अपनी' आणि 'लुटे कोई मन का नगर'... या चित्रपटातल्या अन्य गाण्यांमध्येही आपला कालातीत आवाज आणि सर्वस्व ओतले आहे.

 

Late Lata Mangeshkar (file pic)

भारतीय संस्कृती आणि जीवनपद्धती सतत तुमच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवा: लता मंगेशकर यांनी इफ्फीच्या 33 व्या महोत्सवात,  उद्घाटन सोहळ्यात म्हटले होते.

ऑक्टोबर 2002 मध्ये नवी दिल्ली इथे झालेल्या ईफ्फीच्या 33 व्या महोत्सवात, लतादिदींनी चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रेमींना दिलेल्या या  संदेशाला, आत्ता या महोत्सवात या महान गायिकेला आदरांजली अर्पण करत असताना उजाळा देणे, नक्कीच उचित ठरेल.

संपन्न आणि सभ्य भारतीय संस्कृतीचं तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पिछाडीवर पडण्यापासून रक्षण करायला विसरू नका असं आवाहन या महोत्सवाचं उद्घाटन करताना लता मंगेशकर यांनी चित्रपट निर्मात्यांना केलं. भारतीय सिनेमाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब फाळके यांच्या जोडीने भारतीय सिने उद्योगाला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही अथक परिश्रम घेतलेल्या कलाकारांचा असीम त्याग कायम स्मरणात ठेवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या सह कलाकारांना केलं. भारताच्या सर्व भागातल्या कलाकारांनी भारतीय सिने उद्योगाच्या विकासाकरता योगदान दिल्याची आठवण त्यांनी  इफ्फी-33 च्या शिष्टमंडळाला करून दिली.

भारतीय सिनेमात अमूल्य योगदान देणाऱ्या संगीताचा संदर्भ देत लता मंगेशकर म्हणाल्या की, भारतीय जीवन आणि समाजाच्या प्रत्येक पैलूमध्ये संगीताचा अंतर्भाव आहे. ते केवळ समृद्ध झालं नाही तर त्याने भारतीय सिनेमाला अद्वितीय ओळख निर्माण करून दिली आहे. त्यावेळच्या माहिती आणि प्रसारण मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय सिनेमाला इतर देशांमध्ये प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी प्रशंसा केली. येत्या काही वर्षात हा उद्योग नवीन उंची गाठेल याबाबत संगीतप्रेमींच्या पिढया आशादायी होत्या असं त्या म्हणाल्या. 

लता मंगेशकर : संगीताला समर्पित केलेलं आयुष्य.

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मराठी आणि कोकणी संगीतकार पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घराण्यात झाला. त्यांचा मूळ नाव हेमा असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह इतर पाच भावंडांमध्ये त्या वयानं सर्वात मोठ्या होत्या. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय संगीतकार तसंच रंगभूमी कलाकार होते.

लता मंगेशकर यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं आणि त्यानंतर 1942 मध्ये ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात अभिनय केला. 1946 मध्ये त्यांनी वसंत जोगळेकर दिग्दर्शित हिंदी चित्रपट 'आपकी सेवा मे' मध्ये पहिल्यांदा हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं.

1972 मध्ये लता मंगेशकर यांना ‘परिचय’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. पुढील काळात या ज्येष्ठ गायिकेनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार पटकावले.  यात प्रतिष्ठेच्या भारतरत्न पुरस्कारासह फ्रेंच सरकार द्वारा मानाचा लीजन ऑफ हॉनर खिताब, दादासाहेब फाळके पुरस्कार, तीनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. 1984 मध्ये मध्यप्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराची तर 1992 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा गायनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा केली.

***

M.Jaybhaye/A.Save/S.Naik/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875562) Visitor Counter : 245


Read this release in: Urdu , English , Hindi