माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय संचार ब्यूरोच्या माहिती प्रदर्शनाचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले उद्घाटन
समाज माध्यमाच्या चेहरा विरहित काळात लोकसंपर्क कार्यक्रम ही एक अशी अभिव्यक्ती आहे, जी आपले महत्व राखून आहे आणि जी आम्ही प्रत्यक्ष पाहू शकतो - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
कोणीही मतदार नोंदणीशिवाय राहू नये; मतदाराने स्वेच्छेने, नक्की आणि कोणत्याही भीती, लोभाशिवाय मत द्यावे; या गोष्टी लोकशाहीचा पाया मजबूत करतात - निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे
केंद्रीय संचार ब्यूरोच्या कलाकारांनी गीत व लोककलांच्या माध्यमातून केली मतदार जागृती
Posted On:
09 NOV 2022 4:39PM by PIB Mumbai
पुणे, 9 नोव्हेंबर 2022
आजपासून देशपातळीवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण 2023 कार्यक्रम सुरू होत आहे. या उपक्रमाची सुरुवात आज पुण्यातून करण्यात आली. मतदार यादीतील दुबार नोंदणी तपासणे आणि नवीन मतदारांची नोंदणी करून घेणे, असा याचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र-गोवा राज्य, पुणे च्यावतीने बहु-माध्यम माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी केले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे; निवडणूक आयोगाच्या माध्यम महासंचालक शेफाली शरण; राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे; केंद्रीय संचार ब्यूरो, दिल्ली प्रधान कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक रंजना देव शर्मा आणि पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख उपस्थित होते. रंजना देव शर्मा यांनी केंद्रीय संचार ब्यूरोच्या विविध उपक्रमांची माहिती देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

समाज माध्यमाच्या चेहरा विरहित काळात लोकसंपर्क कार्यक्रम ही एक अशी अभिव्यक्ती आहे, जी आपले महत्व राखून आहे आणि जी आम्ही प्रत्यक्ष पाहू शकतो असे यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. केंद्रीय संचार ब्यूरोच्या कामातून देशाच्या कानाकोपऱ्यात चालणारा लोकसंपर्क कार्यक्रम मी वैयक्तिक पातळीवर पाहत आलेलो आहे. हे माध्यम मनावर अधिक काळापर्यंत छाप सोडणारे आहे असे सांगत यापुढेही आम्ही तुमच्यासोबत काम करत राहू, असे ते म्हणाले . त्यांनी केंद्रीय संचार ब्यूरोचे आभार मानत विभागाने घेतलेल्या कष्टाचे कौतुक केले.

महाराष्ट्र खूप मोठा आहे; महाराष्ट्रात पाहण्यासारखे, अनुभवण्यासारखे खूप काही आहे. आता मी लोककलेची केवळ झलक पाहिली. हा देश एकत्र आहे, कारण लोकसंगीत, लोककथा आपले अस्तित्व टिकवून आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
OW5J.jpeg)
पुणे विद्यापीठाच्या प्रांगणातून आम्ही मतदार जागृती करत आहोत, इथून प्रसारित होणारी गोष्ट नक्की त्याचे फळ देईल. आम्ही चर्चा, सहभाग आणि सशक्त लोकशाही मध्ये विश्वास ठेवतो. विविधतेने नटलेल्या देशात बऱ्याच अडचणी असतील, पण आमचे एक मत, आमचा विश्वास, तरुणांचे नेतृत्व या सर्वापुढे आहे, असेही त्यांनी म्हटले.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण 2023 कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक संबंधी सर्व अडचणींवर उपाय देण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक भौगोलिक प्रदेश, प्रत्येक वर्गातील नागरिक, तरुण, तृतीयपंथी, देहविक्रय करणाऱ्या महिला नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग सर्वांना सामावून घेण्यासाठी काम करत आहोत. या उत्साहापूर्ण वातावरणात येऊन आम्ही प्रेरित झालो आहोत. सर्वांनी नक्की नाव नोंदवा. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सामूहिक प्रयत्न करुयात, असे आवाहन राजीव कुमार यांनी केले.

पुण्यामध्ये आयोजित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम व त्यानिमित्त आयोजित प्रदर्शनाबद्दल बोलताना निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे म्हणाले की, महाराष्ट्रातील जोगवा, लावणी, गोंधळ यासारख्या लोककलांचे सादरीकरण पाहून मी हरखून गेलो आहे . पुणे हे सर्व क्षेत्रात भारताचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते आणि देशाचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु करण्यासाठी हे पुणे विद्यापीठासारखे अन्य ठिकाण असू शकत नाही असे त्यांनी सांगितले .
लोकशाही तेव्हाच सशक्त होऊ शकते जेव्हा तीन गोष्टींची खातरजमा केली जाते; एक म्हणजे कोणीही मतदार नोंदणीशिवाय राहू नये; दुसरे मत कोणालाही द्या, स्वेच्छेने द्या, पण नक्की द्या; आणि तिसरे मत कोणत्याही भीती आणि लोभाशिवाय द्या; याच गोष्टी लोकशाहीचा पाया मजबूत करतात, असे पांडे यांनी यावेळी सांगितले.
भारत तरुणांचा देश आहे. वय वर्ष 17 पासूनच आपल्या तरुणांना मतदार नागरिक म्हणून सहभागी करून घेतले पाहिजे, मतदार नोंदणी आणि मतदानाचे कर्तव्य हे जनआंदोलन झाले पाहिजे, असे आवाहन पांडे यांनी यावेळी केले. आपल्याला हवे तसे सरकार हवे असल्यास मत देणे आवश्यक आहे, हे त्यांनी लक्षात आणून दिले.
केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे मांडण्यात आलेले हे बहु-माध्यम प्रदर्शन पुणे विद्यापीठाच्या मार्बल हॉल मध्ये 9 ते 11 नोव्हेंबर असे तीन दिवस असणार आहे. या प्रदर्शनातून मतदार नावनोंदणी, ऑनलाइन नावनोंदणी, मतदान पत्रक, डिजिटल मतदान पत्रक, मतदान अधिकार याबद्दल चित्रांच्या माध्यमातून आकर्षक अशी माहिती देण्यात आली आहे. आभासी मतदान केंद्र, भारतीय निवडणुकीवर आधारित फ्लिप-बुक, ऑगमेंटेड रिअॅलिटी टच वॉल, एसएसआर फॉर्मचे डिजिटल प्रदर्शन, विविध निवडणुकविषयक कथा, निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांवर आधारित स्वतंत्र विभाग, मतदार नोंदणीचे बॅकलिट्स, लोकशाहीची भिंत, जनजागृतीपर गाणी या सर्वांचा या प्रदर्शनात समावेश आहे.
यावेळी केंद्रीय संचार ब्यूरो, पुणेच्या विभागीय कलाकारांनी आपल्या गीत सादरीकरणातून या कार्यक्रमास शोभा आणली. ही गीते नागरिकांना मतदानासाठी आवाहन करणारी होती. तसेच लोककलावंतांनी जोगवा, लावणी, गोंधळ, वासुदेव, कोळीनृत्य सादर करत मतदारांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
तत्पूर्वी आज सकाळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे सहभागी झालेल्या सायकल फेरी मार्गावर, श्री शिव छत्रपती क्रिडा संकुल (बालेवाडी) - कस्तुरबा वसाहत (राजभवन) - परिहार चौक (औंध) – ज्यूपिटर हॉस्पिटल (बाणेर) अशा चार ठिकाणी केंद्रीय संचार ब्यूरोच्या प्रतिथयश लोक-कलावंतांनी लोककलेच्या माध्यमातून मनोरंजनपर जनजागृती केली, ज्याला उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रदर्शनाच्या जागी मतदार नावनोंदणीची सुविधा ठेवण्यात आली आहे. तसेच एक लोकशाहीची भिंत सुद्धा उभी करण्यात आली आहे, ज्यावर विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून संदेश दिला आहे. नवमतदार आणि प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट देखील लावण्यात आला आहे.
Jaydevi PS/Shilpa P/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1874747)
Visitor Counter : 312