आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरोग्य आणि जैव विज्ञान संशोधनाविषयी राष्ट्रीय परिषदेचा  केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात समारोप


अत्याधुनिक आणि पारंपरिक आरोग्य उपचार पद्धतींच्या योग्य समन्वयातून नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सोनोवाल यांचे प्रतिपादन

Posted On: 05 NOV 2022 8:11PM by PIB Mumbai

ॲलोपॅथी सारखी अत्याधुनिक उपचारपद्धती आणि पारंपरिक आयुर्वेद उपचार पद्धती यांचा योग्य समन्वय साधून देशातील नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज केले. पुण्यातील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्य आणि जैव विज्ञान संशोधनाविषयी राष्ट्रीय परिषदेचा समारोप सोनोवल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ . शां. ब. मुजुमदार, प्रकुलपती डॉ . विद्या येरवडेकर, कुलगुरू रजनी गुप्ते यावेळी उपस्थित होते.

श्री सोनोवाल यांनी उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या समारोप सत्राला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना मार्गदर्शन करताना सोनोवाल यांनी देश उभारणीच्या कार्यात तरुणाचे योगदान फार मोलाचे ठरणार असल्याचे सांगितले. आपले भवितव्य उज्वल करताना देशाच्या भवितव्याचा विचार करा, निसर्गाचा आदर करा, पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध व्हा असा सल्ला त्यांनी दिला. निसर्गातील प्रत्येक घटकाप्रती आपले काही दायित्व आहे आणि ते निभावले तरच समाज तंदुरुस्त राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

अत्याधुनिक आणि पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये वाद होऊ नये अशी अपेक्षा सोनोवाल यांनी व्यक्त केली. पारंपरिक उपचार पद्धतींबद्दल काही जण वैज्ञानिक पुरावे मागत आहेत पण आज जागतिक पातळीवर आयुर्वेदाचा अभ्यास होऊन ते पुरावे जगासमोर आले आहेत, असेही ते म्हणाले. भविष्यात आयुष अंतर्गत सर्व उपचार पद्धतींवर अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतीय औषधोपचार पद्धतीची उपयुक्तता लक्षात आल्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने गुजरात मधील जामनगर इथे कायमस्वरूपी कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सोनोवाल यांनी यावेळी सांगितले.

5 हजार वर्षांपासून आयुर्वेदिक उपचार पद्धती अस्तित्वात असून ऋषी मुनींनी ती शोधून काढली. या आयुर्वेदिक उपचार पद्धतीला जगासमोर आणण्यासाठी आपल्याला अजून खूप काम करायचे आहे, असे  ते म्हणाले. त्या ज्ञानाच्या आधारेच भारत जगात विश्र्वगुरू म्हणून उदयास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  विज्ञान आणि तंत्रज्ञान देशाला पुढे नेण्यास मदत करते पण त्याचबरोबर जीवनमूल्ये देखील तेवढीच महत्वाची असून तीच आपली खरी शक्ती असल्याचे सोनोवाल म्हणाले.

सिंबायोसिस विद्यापीठात उभारण्यात आलेल्या एकात्मिक टेली मेडीसिन केंद्राचे उद्घाटन यावेळी सोनोवाल यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर विद्यापीठ आवारात तयार करण्यात आलेल्या औषधी वनस्पती उद्यानाचे अनावरण त्यांनी केले. पुण्यातील विविध आयुर्वेद महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा यावेळी सोनोवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

***

MI/S.Tupe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1873995) Visitor Counter : 186


Read this release in: English