अर्थ मंत्रालय

गोरगरिबांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ देण्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचे आवाहन

Posted On: 05 NOV 2022 7:18PM by PIB Mumbai

पुणे, 5 नोव्हेंबर 2022

ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचे अधिकाधिक प्रमाणात आर्थिक समावेशन झाल्यास देशाच्या अर्थकारणाला गती मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केले.

पुणे येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री स्वनिधी आणि पुणे विभागीय बँकर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रादेशिक स्तरावरील बँकर्सचा आढावा डॉ. भागवत कराड आणि चंद्रकांत पाटील यांनी घेतला.

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय), प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (पीएमएसबीवाय), अटल पेन्शन योजना (एपीवाय), प्रधानमंत्री जनधन योजना (पीएमजेडीवाय) आणि एआयएफ ,प्रधानमंत्री स्वनिधी या विविध योजनांचा तपशीलवार आढावा मान्यवरांनी घेतला.

सामाजिक सुरक्षा योजनांची संपृक्तता प्राप्त करण्यासाठी एआयएफ, पीएमएफईएम, स्वनिधी, मुद्रा आणि स्टँड अप इंडिया अंतर्गत कर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याचा आणि वेगवान करण्याचा सल्ला कराड यांनी बँका आणि सरकारी  अधिकाऱ्यांना दिला आहे. विविध बँकिंग सेवा देण्यासाठी गावपातळीवर शिबिरे आयोजित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना केंद्रीय योजनेचा लाभ देण्यासाठी आणि त्यासंबंधीची जागरूकता वाढविण्यासाठी विभागवार बैठका घेण्यात येत आहेत. फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महानगरपालिकेत नोंदणी असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रथम 10 हजार रुपये कर्ज आणि वेळेवर परतफेड केल्यास नंतर 20 हजार व त्यानंतर 50 हजार रुपये कर्ज देण्यात येईल. बैठकीत ठरविलेले उद्दिष्ट एका महिन्यात पूर्ण करून गोरगरिबांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन कराड यांनी यावेळी केले.

मागील 8 वर्षात गरिबांच्या आर्थिक उन्नतीसाठी तीन स्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे नमूद करीत डॉ.कराड म्हणाले, बँक खाते नसलेल्यांचे खाते उघडणे, विमा योजनेचा सर्वसामान्यांना लाभ देणे आणि अर्थ सहाय्यापासून वंचित असलेल्यांना ते उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. पशुपालन आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. 47 कोटी जनधन खाते सुरू करण्यासोबत या खात्यांशी आधार व मोबाईल जोडणी केल्याने साडेअकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचविणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी केले. पालकमंत्री पाटील म्हणाले, गरिबांचा विकास झाल्यास देशाचा विकास वेगाने होणार असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबविण्यात येत आहेत. गरजू व्यक्तींना मोफत सुविधा देण्याऐवजी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यास त्यांची खऱ्या अर्थाने प्रगती साधता येईल आणि देशाच्या विकासालाही हातभार लागेल.

प्रास्ताविकात महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक विक्रम कुमार यांनी बैठकीच्या आयोजनाविषयी माहिती दिली.

या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, श्रीरंग बारणे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी, नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

***

MI/S.Tupe/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1873976) Visitor Counter : 195


Read this release in: English