भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोगाने  सुगम्य निवडणुकांसाठी नामवंत दिव्यांगांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे केले आयोजन; विविध राज्यांमधून या नामवंतांचा प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून सहभाग

Posted On: 04 NOV 2022 10:08PM by PIB Mumbai

 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी आज नवी दिल्लीतील आकाशवाणीच्या रंगभवन सभागृहात सुगम्य निवडणुकांसंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या नामवंत दिव्यांगांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले.

आपल्या भाषणात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, भारतीय निवडणूक आयोग त्याच्या सर्व प्रक्रिया आणि कार्यामध्ये सुलभता आणून त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वचनबद्ध आहे. समारंभातील कलाकारांच्या अदम्य उत्साहाला दाद देत मुख्य निवडणूक आयुक्त कुमार म्हणाले की, दिव्यांगता म्हणजे अक्षमता असे मुळीच नाही. दिव्यांग व्यक्तींची आंतरिक क्षमता जोखण्यात आपली स्वतःची असमर्थता हेच खरे अपंगत्व आहे. आव्हान हे अपंगत्व नसून त्याबद्दल योग्य दृष्टीकोन विकसित करणे, सर्वांच्या गरजा लक्षात घेऊन प्रणालीची क्षमता विकसित करणे हे आहे.

निवडणूक सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने हाती  घेतलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख करताना  मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की आपल्या निवडणुका अधिक समावेशक बनवण्यासाठी प्राप्त झालेल्या सूचनांचा भारतीय निवडणूक आयोग विचार करेल.

निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे म्हणाले की, या परिषदेसारख्या मंचामुळे आपल्या निवडणुका अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी विचारमंथन आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. सहभाग वाढवणे, सुविधा मजबूत करणे, दिव्यांगांच्या क्षमतांबाबत लोकांच्या धारणा तयार करणे आणि समान नागरिक म्हणून त्यांच्या  आवाज समाविष्ट करणे हे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक एकात्मतेसाठी त्यांना इतर नागरिकांप्रमाणे मत प्रदर्शित करण्यासाठी मंच तयार करणे याकडे  भारतीय निवडणूक आयोग लक्ष देईल यावर  त्यांनी  भर दिला.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी PwD अॅप 2.0 चे अनावरण केले, जे दिव्यांगांसाठी नोंदणीच्या प्रक्रियेपासून ते मतदानाच्या दिवशी पिक आणि ड्रॉप सुविधेचा लाभ घेण्यापर्यंत विविध सेवा - सुविधा देण्यासाठी हे मोबाइल अॅप अद्ययावत आवृत्ती आहे. PwD अॅपचा इंटरफेस स्क्रीन रीडर, टेक्स्ट टू स्पीच, दृश्यमानता वाढवणे, रंग समायोजन इत्यादी वैशिष्ट्यांसह प्रवेशयोग्य आणि वापरकर्त्यासाठी अनुकूल करण्यात आला आहे.

आयोगाने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांबाबत निवडणूक कर्मचार्‍यांना संवेदनशील करण्यासाठी प्रशिक्षण मॉड्यूल देखील सुरू केले.

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1873839) Visitor Counter : 142


Read this release in: English , Urdu , Hindi