युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
खेलो इंडिया महिला भारोत्तोलन स्पर्धेत कनिष्ठ आणि युवा गटात अनेक राष्ट्रीय विक्रमांची नोंद
Posted On:
02 NOV 2022 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2022
उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथे आज संपन्न झालेल्या खेलो इंडिया महिला भारोत्तोलन स्पर्धेच्या 2 ऱ्या टप्प्यात अनेक राष्ट्रीय विक्रमांची नोंद झाली आहे. ही स्पर्धा वरिष्ठ, कनिष्ठ आणि युवा वयोगटात पार पडली. भारतीय भारोत्तोलन महासंघाने (IWLF) ही स्पर्धा आयोजित केली होती आणि क्रीडा विभाग, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने पाठबळ दिले होते.

रेल्वे क्रीडा संवर्धन मंडळाने (RSPB) वरिष्ठ महिला गटात विजेत्या संघाचा चषक पटकावला, तर महाराष्ट्राने कनिष्ठ महिला आणि किशोरी गटात विजेत्या संघाचा चषक जिंकला.
लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजनेचा तसेच खेलो इंडिया शिष्यवृत्ती योजनेचा भाग असणाऱ्या भारोत्तोलकानी या स्पर्धेत सहभाग घेतला. आकांक्षा व्यवहारे, भावना, मार्टिना देवी, योगिता खेडकर आणि कल्पना यादव यांनी राष्ट्रीय विक्रम नोंदवला.
गुणांच्या आधारे स्पर्धेतील तीन सर्वोत्तम भारोत्तोलक पुढीलप्रमाणे: कोमल जोहर (वरिष्ठ महिला गट), संजू देवी (कनिष्ठ महिला गट) आणि आकांक्षा व्यवहारे (किशोरी गट).

खेलो इंडिया लीगच्या आत्तापर्यंतच्या सर्व स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारत सरकारने दिलेल्या एकूण पाठबळाची रक्कम 1.88 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये सर्व वयोगटातील 10 वजनी श्रेणींमध्ये अव्वल 8 क्रमांकावर असलेल्या भारोत्तोलकांना एकूण 48.3 लाख रुपयांच्या रोख बक्षीसांचा समावेश आहे.

राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेले भारोत्तोलक:
किशोरी गट: 40 किलो – आकांक्षा व्यवहारे (स्नॅच: 60 किलो, सी आणि जे: 71 किलो, एकूण: 131 किलो); 64 किलो – भावना (स्नॅच: 88 किलो, सी आणि जे: 113 किलो, एकूण: 201 किलो); आणि 81किलो - मार्टिना देवी (स्नॅच: 83 किलो, एकूण: 191 किलो);
कनिष्ठ महिला गट: 64 किलो –भावना (स्नॅच: 88 किलो, सी आणि जे: 113 किलो, एकूण: 201 किलो); 81 किलो – कल्पना यादव (स्नॅच: 90 किलो, एकूण: 201 किलो); 87 किलो – योगिता खेडकर (स्नॅच: 78 किलो, सी आणि जे: 105 किलो, एकूण: 183 किलो); आणि 87 किलो - मार्टिना देवी (एकूण: 191 किलो)
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1873232)