कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या प्रमुख उपस्थितीत बागायती मूल्य श्रृंखला विस्तारासंबंधी कार्यक्रम संपन्न
कृषी उत्पादनाच्या व्यापाराचा जास्तीत जास्त पैसा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे - तोमर
सैनिकांप्रमाणेच शेतकरी देखील वंदनीय, देशाचे पोट भरण्यासाठी शेतकरी करतात त्याग- कृषीमंत्री
Posted On:
01 NOV 2022 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2022
आपले शेतकरी देशाचे रक्षणाचे काम करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच वंदनीय - अभिनंदनीय आहेत, असे उद्गार केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काढले. देशवासियांचे पोट भरण्यासाठी शेतकरी कैक प्रकारचे त्याग करतात असेही ते म्हणाले. संरक्षण आणि कृषी दोन्ही क्षेत्रात काम करणे म्हणजे देशासाठी काम करणे होय. या क्षेत्रात काम करणारे उदरनिर्वाह तर करतातच पण सोबतच देशाचा आत्माही मजबूत करतात असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आज पुण्यात भारतात बागायती मूल्य श्रृंखला विस्तारासंबंधी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केले होते. या कार्यक्रमाला शेतकरी, शेतकरी उत्पादक संघ, स्टार्ट अप्स, बैंकर्स यांच्यासह बागायतीशी संबंधित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खेडी देशाचा आत्मा आहेत, खेडी समृद्ध आणि आत्मनिर्भर असतील तर देशही आपोआप समृद्ध आणि आत्मनिर्भर होईल असे तोमर याप्रसंगी म्हणाले. आपला देश कृषीप्रधान असून शेती आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे ते म्हणाले. कृषी आणि खेड्यांची पारंपरिक अर्थव्यवस्था देशाची सर्वात मोठी ताकद आहे म्हणूनच कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरीही कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सहाय्यकारक ठरेल. कोविड महामारीच्या काळात ही बाब सिद्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मिळकतीवर चिंतन होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. कृषी उत्पादनाच्या व्यापारातला जास्तीत जास्त पैसा शेतकऱ्यांना मिळेल याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे आपला शेतकरी समृद्ध होईल आणि पुढच्या पिढ्या शेती करण्यासाठी प्रेरित होतील तसेच कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवून गावांमध्ये अधिक रोजगार निर्मिती होईल असे ते म्हणाले. या युगात आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासोबतच कृषी क्षेत्रात बदल घडवून नवे आयाम जोडणे गरजेचे आहे आणि ही बाब सरकार ओळखून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, उत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी सचिव मनोज अहुजा, अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी, संयुक्त सचिव प्रियरंजन बागायती आयुक्त प्रभातकुमार, महाराष्ट्र कृषी सचिव एकनाथ डवले यांनीही संबोधित केले. याप्रसंगी तोमर यांनी उत्कृष्ट शेतकऱ्यांना सन्मानित केले तसेच बागायती प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
S.Patil /S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1872852)
Visitor Counter : 373