विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
डिजिटल आरोग्य सेवांच्या वितरण क्षेत्रात भारत हा जगातील एक आघाडीचा देश म्हणून उदयाला आला आहे : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
28 OCT 2022 5:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2022
डिजिटल आरोग्य सेवा क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित पहिल्या जागतिक डिजिटल आरोग्य शिखर परिषद , एक्स्पो आणि नाविन्यता पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते. आपल्याकडे जगातील सर्वोत्तम तांत्रिक मनुष्यबळ आहे, डेटाचे दर सर्वात स्वस्त आहेत आणि 100 टक्के कव्हरेज आहे, त्यामुळे डिजिटल आरोग्य सेवा क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करण्यास पुरेपूर सक्षम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 5G च्या शुभारंभामुळे भारतातील डिजिटल आरोग्य सेवा प्रणालीमध्ये नवीन क्रांती घडून येईल, असेही ते म्हणाले.
कोविड-19 साथरोगाच्या काळात कोवीन या संपूर्ण डिजिटल मंचाच्या माध्यमातून भारताने 220 कोटींपेक्षा जास्त लसीकरण वितरित करण्याचा असाध्य पराक्रम केला आणि हे वितरण अजूनही सुरूच आहे. संपूर्ण जगाने हे पाहिले असून, या क्षेत्रातील भारताच्या नेतृत्वाच्या भूमिकेची दखल घेतली गेली आहे, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
जेव्हा भारतात कोविड-19 चा शिरकाव झाला तेव्हा मार्च 2020 मध्येच भारताने टेलिमेडिसिन संबंधी मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली; एप्रिल 2020 मध्ये आयुष संदर्भातही आपण हेच केले, असे ते म्हणाले. या कामाची उत्तम पायाभरणी झाल्यामुळे आणि पूर्णपणे सज्ज असल्यामुळेच भारत ही मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित करू शकला. ‘डिजिटल हेल्थ फॉर ऑल’ अर्थात सर्वांसाठी डिजिटल आरोग्याचे लाभ सुनिश्चित करण्यासाठी आपण एकत्रितपणे काम केले पाहिजे, ‘सर्वांसाठी आरोग्य’ साध्य करण्यासाठी हे आवश्यक आहे, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा डिजिटल आरोग्यासाठी समर्पित कार्यक्रम भारतात राबविला जात असून त्याअंतर्गत आरोग्य संबंधी 220 दशलक्ष इलेक्ट्रॉनिक नोंदी वितरीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार प्रदान केले जातात.
साथरोगाच्या आव्हानाबाबत बोलताना ते म्हणाले की कोविड-19 साथरोगाने जगभरात आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यास प्रवृत्त केले आहे. साथरोगाच्या काळात जग ठप्प झाले होते आणि डॉक्टर रुग्णांना भेटू शकत नव्हते, त्यामुळे परस्परांना भेटण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागला, असे त्यांनी सांगितले.
भारतात आरोग्य सेवा क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आल्यामुळे भारत ही जगातील सर्वात प्रगत आरोग्य सेवा प्रणाली बनली आहे, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सरतेशेवटी सांगितले. आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने या क्षेत्रात डिजिटलायझेशनचा वापर केला पाहिजे, असे आग्रही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
S.Kane/M.Pange/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1871604)
Visitor Counter : 234