आयुष मंत्रालय
पणजी येथे 9 व्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शनाच्या कर्टन रेझरचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन
पारंपरिक औषधोपचार पद्धतींच्या बाबतीत भारत अग्रेसर आहे : केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल
“हर घर हर दिन आयुर्वेद” या ब्रीदवाक्यासह 23 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिन साजरा केला जाणार
Posted On:
13 OCT 2022 8:11PM by PIB Mumbai
पणजी, 13 ऑक्टोबर 2022
केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज पणजी येथे 9 व्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शनाच्या पूर्व तयारी कार्यक्रमाचे (कर्टन रेझर) उद्घाटन केले. हा कार्यक्रम 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान गोव्यात होणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारे आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहाय्याने चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातून. आयुर्वेद क्षेत्रातले सुमारे 5000 हितधारक - उद्योजक ,चिकित्सक, पारंपरिक उपचार करणारे, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, औषध उत्पादक, औषधी वनस्पतींचे उत्पादक आणि विपणन धोरणकर्ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

'आरोग्यासाठी आयुर्वेद’ही कार्यक्रमाची मुख्य संकल्पना असून जीवनाच्या प्रवासासाठी ती अत्यंत अर्थपूर्ण आहे, असे या कार्यक्रमात बोलताना मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी नमूद केले. केवळ एखाद्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठीच नाही तर धरणी मातेची काळजी घेण्यासाठी आयुर्वेद, ही कशाप्रकारे एक सर्वसमावेशक उपचार प्रणाली आहे, याचे वर्णन त्यांनी यावेळी केले. पारंपरिक औषोधोपचार पद्धतींच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे, आयुष क्षेत्राच्या बाजारपेठेचे आकारमान गेल्या 8 वर्षांत 3 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून वाढून 18 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक झाले आहे, असे सोनोवाल यांनी उद्घाटनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

आयुष मंत्रालय आयुर्वेद क्षेत्रातील सर्व हितधारकांसह दरवर्षी 23 ऑक्टोबर रोजी धन्वंतरी जयंतीला आयुर्वेद दिन साजरा करते, असे त्यांनी सांगितले. “हर घर हर दिन आयुर्वेद' ( दररोज आयुर्वेद , सर्वत्र आयुर्वेद) हे यावर्षीच्या कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य आहे.नवी दिल्लीची अखिल भारतीय आयुर्वेद संस्था ही या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नोडल संस्था आहे असे त्यांनी सांगितले. "या कार्यक्रमासाठी भारत सरकारची सुमारे 22 मंत्रालये आणि विभाग सहयोग करत आहेत," असे ते म्हणाले.
अनेक उपक्रमांच्या बळावर एक प्रमुख आयुर्वेद आणि निरामय पर्यटनाचे केंद्र बनण्याची योजना गोवा आखत आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. पर्यटन, आरोग्य आणि निरामयता केंद्रे विकसित करण्यासाठी आणि आरोग्य पर्यटन क्षेत्रात गोव्याला सर्वोत्तम बनवण्याच्या दृष्टीने , पंतप्रधानांनी अलीकडेच जाहीर केलेल्या आयुष व्हिसाचा लाभ घेण्यासाठी गोवा राज्य उत्सुक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या काही वर्षांत जागतिक आयुर्वेद परिषदेची प्रगती झाल्याचे सांगत, पर्यटन, बंदरे , जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ ) प्रथमच जागतिक आयुर्वेद परिषदेचा भाग आहे आणि यामुळे सहभागींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण होईल. नैसर्गिक सौंदर्यासह गोवा आणि गोमंतक त्यांच्या आदरातिथ्याने जागतिक आयुर्वेद परिषदेचे हे पर्व निश्चितच संस्मरणीय करतील असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे,नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालिका तनुजा नेसारी, कोट्टाक्कल आर्य वैद्य शाळेचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि जागतिक आयुर्वेद परिषद राष्ट्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. पी. एम. वरियर आणि आरोग्य तसेच आयुष क्षेत्रातील इतर प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1867548)
Visitor Counter : 253