माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय निवडणूक आयोगाने मतदार जागृतीकरता आकाशवाणीच्या सहकार्याने 'मतदाता जंक्शन' ही रेडिओ मालिका केली सुरु


विविध भारती केंद्र, एफएम रेनबो, एफएम गोल्ड आणि आकाशवाणीच्या प्रमुख वाहिन्यांवर 15 मिनिटांचा कालावधी असलेले 52 भाग दर शुक्रवारी प्रसारित केले जातील.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या 230 वाहिन्यांवर 23 भाषांमध्ये प्रसारित केला जाईल.

अभिनेता पंकज त्रिपाठी भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन

मतदाता जंक्शन कार्यक्रमाचा पहिला भाग 7, ऑक्टोबर 2022 रोजी प्रसारित होणार

Posted On: 03 OCT 2022 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2022

 

मुख्य निवडणूक आयुक्त  राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त  अनुप चंद्र पांडे यांनी आज नवी दिल्लीत  आकाशवाणी रंग भवन येथे,  वर्षभर चालणारा  मतदार जागृती कार्यक्रम 'मतदाता जंक्शन' या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. मतदाता जंक्शन ही  52 भागांची मालिका असून निवडणूक आयोगाने आकाशवाणीच्या सहकार्याने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. यावेळी भारतीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी,  प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आकाशवाणी वृत्त  महासंचालक  आणि भारतीय निवडणूक आयोगाचे आयकॉन आणि अभिनेता  पंकज त्रिपाठी यावेळी उपस्थित होते.

आकाशवाणीच्या सहकार्याने निर्मिती केलेला मतदाता जागृती कार्यक्रम देशभरातील मतदात्यांशी संपर्क साधण्यासाठी एक उत्कृष्ट मंच ठरेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले. हा कार्यक्रम म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचा संगम असून याद्वारे मतदानाबाबतची शहरी उदासीनता दूर करणे आणि आणि मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक, प्रलोभनमुक्त, आणि सर्वसमावेशक निवडणुका आयोजित करण्याच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रेक्षकांना संवादाच्या  स्वरूपात  माहिती देणे, हा उद्देश आहे.

भारतीय निवडणूक आयोगाचे आयकॉन आणि अभिनेता  पंकज त्रिपाठी यांनी भारतीय निवडणूक आयोगासह मतदार जागृती कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल राजीव कुमार यांनी त्यांचे आभार मानले.  पंकज त्रिपाठी यांनी या कार्यासाठी दाखवलेली बांधिलकी लक्षात घेऊन तसेच  देशभरात त्यांना असलेली लोकप्रियता पाहता   यापुढे ते  भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन असतील, असे राजीव कुमार यांनी घोषित केले.

आपल्या स्वागतपर भाषणात, महासंचालक (माध्यमविभाग) शेफाली शरण यांनी ‘मतदाता जंक्शन: हर मतदार का अपना स्टेशन’ या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. भारतीय निवडणूक आयोग आणि आकाशवाणी या दोन अत्यंत नामांकित संस्था असून विश्वासार्हता आणि तळागाळातील घटकापर्यंत जोडल्या असल्याने व्यापक संपर्कासाठी या दोन्ही संस्थांचे सहकार्य महत्वपूर्ण आहे, असे त्यांनी सांगितले.

15 मिनिटांचा हा कार्यक्रम दर शुक्रवारी संध्याकाळी  7 ते 9 या  स्लॉट दरम्यान ऑल इंडिया रेडिओ नेटवर्कवर 25 एफएम केंद्र, 4 FM गोल्ड केंद्र, 42 विविध भारती केंद्र आणि 159 प्रमुख  वाहिन्या /स्थानिक रेडिओ केंद्रांवर मराठी, आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी,  नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी अशा 23 भाषांमध्ये   प्रसारित केला जाईल.

या मालिकेच्या 52 भागांमध्ये मतदारांच्या दृष्टिकोनातून निवडणूक आणि संबंधित प्रक्रियेच्या विविध पैलूंविषयी माहिती दिली जाईल.

मतदार नोंदणी’ ही संकल्पना असलेला  कार्यक्रमाचा पहिला भाग 7 ऑक्टोबर 2022  शुक्रवारी संध्याकाळी 7:25 वाजता प्रसारित केला जाईल. श्रोते, ट्विटरवर ‘ट्विटर ऑन @airnewsalerts आणि @ECISVEEP,  न्यूज ऑन एअर’ अॅप तसेच ईसीआय(भारतीय निवडणूक आयोग)  आणि ऑल इंडिया रेडिओच्या YouTube चॅनेलवर देखील कार्यक्रम ऐकू शकतात. ट्यून इन करा आणि भारताच्या दैदिप्यमान  लोकशाहीचा एक भाग व्हा.

 

* * *

S.Kakade/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864842) Visitor Counter : 202


Read this release in: English , Urdu , Hindi , Assamese