पर्यटन मंत्रालय
पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे ‘पर्यटन पर्व - 2022’चे केले उद्घाटन
Posted On:
30 SEP 2022 6:12PM by PIB Mumbai
मुंबई, 30 सप्टेंबर 2022
'पर्यटन पर्व- 2022' चा प्रारंभ आज मुंबईत झाला. केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे तीन दिवसांच्या पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्राचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत आयकॉनिक सप्ताह कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पर्यटन मंत्रालयाने 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत मुंबईत 'पर्यटन पर्व - 2022' (पर्यटन महोत्सव) चे आयोजन केले आहे.
भारताला एक प्रमुख पर्यटन स्थळ बनवण्यासाठी पर्यटन मंत्रालय प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. भारताला वैभवशाली प्राचीन वारसा आणि संस्कृतीचे वरदान लाभले आहे आणि भारतातील पर्यटन स्थळे जागतिक शांतता आणि समृद्धी यांचे प्रचालन करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व राज्यांना देशातील चित्रपट पर्यटनावर आणि भारत यजमानपद भूषवणार असलेल्याआगामी जी- 20 बैठकीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री नाईक यांनी केले. देशातील पर्यटन स्थळांना भेट देण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. "देशात पर्यटन विकास नव्या गतीने होत आहे",असे ते म्हणाले. त्यांनी नुकत्याच झालेल्या पर्यटनावरील राष्ट्रीय परिषदेचा उल्लेख केला. या परिषदेत सर्जनशील, शाश्वत आणि जबाबदार पर्यटनासह सर्वसमावेशक विकासावर चर्चा झाली. पर्यटन मंत्रालयाने देशातील पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 7000 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील पर्यटन विकासाविषयी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने महाराष्ट्रात स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत कोस्टल सर्किट(तटीय परिपथ) आणि स्पिरिच्युअल सर्किटसाठी (आध्यत्मिक परिपथ) 66 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीच्या विकासासाठी 53 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय कान्होजी आंग्रे दीपगृहाच्या विकासासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टला 15 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमध्ये पर्यटनाशी संबंधित विकासासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे नाईक यांनी सांगितले.

‘पर्यटन पर्व’ हे एक उत्तम व्यासपीठ असून दरवर्षी अधिकाधिक लोकांच्या सहभागासह हा उपक्रम अधिकाधिक लोकप्रिय होत जाईल,असे महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्व संबंधितांना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पर्यटन पर्व - 2022 बद्दल
'पर्यटन पर्व' हा देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित उपक्रम आहे. पंतप्रधानांनी, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना 2022 पर्यंत सर्व भारतीयांनी भारतातील किमान 15 पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे आवाहन केले होते.
पश्चिमेतल्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्य तसेच दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील विविध संस्कृती, कला, हस्तकला आणि पाककृतींचे प्रदर्शन करण्यासाठी मुंबईत पर्यटन पर्व आयोजित केले जात आहे. यामुळे मुंबईकरांना या भागातील वारसा आणि संस्कृतीची अधिक उत्तम माहिती मिळेल. विविध पर्यटन उत्पादने, पाककृती, वारसा आणि भारताची संस्कृती याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय (केंद्रीय संचार विभाग), संरक्षण, आयुष (AYUSH), वस्त्रोद्योग (हस्तकलाकृती विकास आयुक्त इत्यादी) इतर केंद्रीय मंत्रालये देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
पर्यटन पर्व स्थानिक पर्यटकांवर, विशेषतः युवा पर्यटकांना जागृत करण्यावर लक्ष केंद्रित करेल. यंदाच्या वर्षी पर्यटन पर्वामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या युवा पर्यटन क्लबच्या सदस्यांना निमंत्रित केले जाईल.
मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय येथे 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या काळात होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे:
- देशाच्या पश्चिम आणि मध्य भागातील 8 राज्य पर्यटन विभागांचे आणि इतर राज्यांच्या मुंबईमधील पर्यटन कार्यालयांचे पर्यटन मंडप/ स्टॉल
- भारताच्या स्वातंत्र्याला75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत, केंद्रीय संचार विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय द्वारे मल्टीमीडिया प्रदर्शन
- किचन स्टुडियो- मुंबईमधील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट द्वारे ‘पश्चिम-मध्य मिलाफ’ या संकल्पनेवर आधारित स्थानिक खाद्य संस्कृतीचे प्रदर्शन.
- वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्तांनी निमंत्रित केलेल्या पश्चिम आणि मध्य भारतातील 5 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील कारागिरांच्या हस्तकलाकृतींचे 15 स्टॉल असलेला क्राफ्ट बझार
- मध्यवर्ती मंचावर भारतभरातील लोककलांचे सादरीकरण.
- आयुर्वेद @2047 या संकल्पनेवर आधारित आयुष मंत्रालयाचा स्टाॅल.
- अग्निपथ योजनेचा प्रचार करण्यासाठी भारतीय वायुदलाच्या मुंबईमधील भर्ती कार्यालयाचा स्टॉल
- छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय आणि आसपासच्या परिसरातील आकर्षणे याबाबत माहिती सांगण्यासाठी स्थानिक पर्यटक मार्गदर्शकांबरोबर मोफत टूर .
- शालेय विद्यार्थ्यांसाठी कला कार्यशाळा आणि स्पर्धा
- पर्यटन पर्वाला भेट देणाऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी इतर परस्पर संवाद उपक्रम.
3 दिवसांचा हा कार्यक्रम सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत सर्वसामान्य जनतेसाठी खुला राहील, तसेच प्रवेश विनामुल्य आहे.
* * *
PIB Mumbai | S.Kane/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1863859)
Visitor Counter : 579