युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय क्रीडास्पर्धा 2002 नंतरच माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीने मोठी झेप घेतलीः सानिया मिर्झा
Posted On:
25 SEP 2022 5:57PM by PIB Mumbai
राष्ट्रीय क्रीडास्पर्धा 2002 ने आपल्या टेनिस कारकीर्दीला मोठी चालना दिली, याबद्दल भारतीय टेनिस जगतातली दिग्गज खेळाडू सानिया मिर्झाच्या मनात जराही शंका नाही.
2002 मध्ये मी जेव्हा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला तेव्हा मी फक्त सोळा वर्षांची होते. मी त्यावेळी चांगली कामगिरी केली आणि प्रकाशझोतात आले. ही कामगिरी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीसाठी अत्यंत योग्य अशी गती देणारी ठरली, असे सानियाने सांगितले.
नाविन्यपूर्ण खेळाचे दर्शन घडवणाऱ्या या हैदराबादी टेनिसपटुने त्यानंतर आपल्या चमकदार कारकीर्दीत सहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या.
परंतु त्याअगोदर,सानियाने दोन दशकांपूर्वी भारतात भरपूर टेनिसस्पर्धांमध्ये भाग घेतला होता. दिल्लीत झालेल्या ज्युनियर नॅशनलपासून ते नॅशनल गेम्स आणि त्यानंतर हैदराबादमध्ये झालेल्या डब्ल्यूटीए स्पर्धेत तिने भाग घेतला.
गुजरातच्या अंकिता रैनासह भारतातील बहुतांश टेनिसपटूसाठी तिचा टेनिस प्रवास हा प्रेरणेचा महान स्त्रोत ठरला आहे.
सुपरमॉम सानिया 7 वर्षांनंतर गुजरातमध्ये नॅशनल गेम्स होत असल्याबद्दल उत्साहित आहे. ती म्हणाली की,मी संयोजकांना यश चिंतिते आणि सर्व स्पर्धकांना त्यांच्या आकांक्षा साध्य करण्यासाठी शुभेच्छा देते.
तिने केवळ टेनिस खेळाडूच नव्हे तर सर्वच स्पर्धकांसाठी एक संदेश दिला आहे. त्यात तिने म्हटले आहे की, स्वतःला आजमावण्यासाठी हा अगदी योग्य मंच आहे,त्यानंतर आंतरराष्ट्रीय मंचावर प्रारंभ करा.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आगळ्यावेगळ्या आहेत कारण ज्यांनी अगोदरच अनेक आंतरराष्ट्रीय शिखरे सर केली आहेत असे टेनिस स्टार आणि उदयोन्मुख खेळाडू यांचा इथे सुरेख मिलाफ असतो असे सानियाने सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूंची उपस्थिती ही उदयोन्मुख प्रतिभाशाली खेळाडूंसाठी एक प्रेरणेचा महान स्त्रोत ठरेल, असेही सानियाने सांगितले. मनगटाला झालेल्या दुखापतीतून ती आता सावरत आहे.
***
N.Chitale/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1862106)
Visitor Counter : 227