संरक्षण मंत्रालय
संरक्षण सचिवांनी नवी दिल्ली येथे शिखर समितीच्या बैठकीदरम्यान डिफेन्स एक्स्पो 2022 च्या तयारीचा घेतला आढावा
हे प्रदर्शन प्रथमच केवळ भारतीय कंपन्यांसाठी आयोजित केले जात असून;या प्रदर्शनात 1,000 हून अधिक प्रदर्शकांनी नोंदणी केल्याने ते आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रदर्शन असेल; प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढण्याची अपेक्षा
Posted On:
24 SEP 2022 5:05PM by PIB Mumbai
संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी आज दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे शिखर समितीच्या बैठकीत आगामी संरक्षण सामग्री प्रदर्शन -2022(DefExpo 2022) च्या तयारीचा सर्वंकष आढावा घेतला. संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि गुजरात सरकारचे मुख्य सचिव श्री पंकज कुमार तसेच गुजरात राज्य सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
12वे संरक्षण सामग्री प्रदर्शन (DefExpo ),गुजरातमधील गांधीनगर येथे येत्या 18-22 ऑक्टोबर 2022 दरम्यान प्रथमच एकाच वेळी चार ठिकाणी आयोजित केले जाणार असून,संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त होण्याच्या दृष्टीने ते लोकांना अंतरिक्ष आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा देईल,अशी अपेक्षा आहे. बैठकीदरम्यान, संरक्षण सचिवांना या द्वैवार्षिक कार्यक्रमासाठी अनेक हितसंबंधितांनी केलेल्या व्यवस्थेची माहिती देण्यात आली. डॉ. अजय कुमार यांनी अधिका-यांना डिफेन्स एक्स्पो 22 यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच स्वदेशी संरक्षण उत्पादनांच्या व्यवसायावर आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
डेफ एक्स्पो (DefExpo 2022) यापूर्वी 10-14 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्याचे नियोजन केले होते,पण त्यावेळी सहभागींना भेडसावणाऱ्या लॉजिस्टिक आव्हानांमुळे ते पुढे ढकलण्यात आले होते.दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी एक्स्पोच्या नवीन तारखा (ऑक्टोबर 18-22, 2022) रोजी जाहीर करण्यात आल्या.आगामी प्रदर्शन हे प्रथमच केवळ भारतीय कंपन्यांसाठी आयोजित करण्यात आलेले पहिलेच प्रदर्शन आहे.डेफ एक्स्पो-2022 साठी, भारतीय कंपन्या, मूळ उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांच्या भारतीय उपकंपन्या(OEM) , भारतात नोंदणीकृत झालेल्या कंपन्यांचे विभाग, भारतीय कंपन्यांसह संयुक्त उपक्रम असलेले प्रदर्शक हे यातील भारतीय सहभागी म्हणून मानले जातील.
डेफ एक्स्पो 2022( DefExpo 2022) ची संकल्पना 'पाथ टू प्राइड' (अभिमानास्पद वाटचाल)आहे आणि भारतीय तसेच जागतिक ग्राहकांसाठी एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रांतील साधनांना समर्थन देत, प्रदर्शित करून आणि भागीदारी करुन भारताला एक सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी राष्ट्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. स्वदेशी संरक्षण उद्योगाचे सामर्थ्य दाखविणे हा यामागचा उद्देश आहे जो आता सरकार आणि देशाच्या 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेला पुष्टी देत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारंभांना अनुसरून, डेफ एक्स्पो 2022 (DefExpo 2022) त्याच्या मागील खेपेपेक्षा अधिक सरस ठरण्यासाठी प्रतिबद्ध आहे, कारण 1 लाखांहून अधिक चौ.मी. (मागील वेळी 76,000 चौ.मी.) इतक्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भागावर आयोजित करण्यात आले आहे. याचा उदघाटन समारंभ आणि परिसंवाद महात्मा मंदिर कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर (MMCEC), येथे होणार असून, प्रदर्शन हेलिपॅड एक्झिबिशन सेंटर इथे, साबरमती रिव्हर फ्रंट (SRF) येथे पाचही दिवस थेट प्रात्यक्षिके आणि पोरबंदर येथे भारतीय तटरक्षक दलाकडून जनतेसाठी जहाजावरील भेटी आयोजित केल्या जातील.आयआयटी दिल्ली येथील स्वदेशी स्टार्ट-अप, मेसर्स बोटलॅब्ज (M/s Botlabs ,एक iDEX विजेता) यांच्या द्वारे सर्वात मोठा ड्रोन शो देखील आयोजित केला आहे,जो या भव्य प्रदर्शनाचे आणखी एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य असेल.या प्रदर्शनासाठी 15 ऑगस्ट 2022 पासून स्टाॅल्सच्या नोंदणीला सुरूवात झाली होती आणि आतापर्यंत1,000 हून अधिक प्रदर्शकांनी त्यासाठी नोंदणी केली आहे आणि डेफ एक्पोच्या मागील प्रदर्शनाच्या तुलनेत ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक नोंदवलेली संख्या असेल, असा अंदाज आहे.
या कार्यक्रमात, विविध राज्यांना आमंत्रित करून मंडप(पॅव्हेलियन) उभारण्यासाठी आणि त्याद्वारे स्वदेशी संरक्षण उत्पादन वाढवून राष्ट्र उभारणीत सहभागी होण्यासाठी एक देशव्यापी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.अनेक राज्यांनी आपल्या राज्याचा मंडप उभारण्यासाठी सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे.सध्या या मंडपांची संख्या आठ असून,विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, मुख्य सचिव इत्यादींना गुंतवणुकीची विनंती करण्यासाठी संधी आणि त्यांच्या संबंधित राज्यांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे देशांतर्गत स्वदेशी अंतरिक्ष आणि संरक्षण सामग्री उत्पादनासाठी अधिक केंद्रे देशभरात विकसित होतील,अशी आकांक्षा आहे.तसेच, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांद्वारे अधिक सहभागासाठी,वेगवेगळ्या स्टार्ट-अप्सना जागेच्या शुल्कावर 50 टक्के सूट दिली जात आहे.
या व्यतिरिक्त, दिनांक 11-12 सप्टेंबर 2022 दरम्यान राजस्थानमधील कोटा,येथे प्रथमच राष्ट्रीय संरक्षण,सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांची एक परीषद आणि प्रदर्शन यशस्वीरित्या भरविण्यात आले होते, ज्याला लोकसभेचे अध्यक्ष श्री ओम बिर्ला प्रमुख पाहुणे आणि संरक्षण राज्य मंत्री श्री अजय भट्ट सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी भारतीय सैन्याने स्वदेशी सामुग्रीचे मांडलेले प्रदर्शन आणि बोटलॅब्सद्वारे झालेला ड्रोन शो याला कोटा मधील जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.
भारत पॅव्हेलियन-
संरक्षण मंत्रालयाचा संरक्षण उत्पादन विभाग, मार्क पॅव्हेलियन -
स्वदेशी संरक्षण उत्पादने, स्टार्ट-अप, संरक्षण क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाची परिपक्वता दर्शवेल आणि 2047 साठी भारताने ठरविलेले लक्ष्य यांची माहिती सादर करेल. याला 'पाथ टू प्राईड,एक अभिमानास्पद वाटचाल' असे नाव देण्यात आले आहे.
डेफ एक्स्पो-2022 ( DefExpo 2022) पूर्वीच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी तून (आयुध निर्माण) ज्या नव्या सात नवीन संरक्षण कंपन्यांच्या स्थापन झाल्या त्या यावेळी आपली वर्षपूर्ती साजरी करणार आहेत. या सर्व कंपन्या पहिल्यांदाच डेफ एक्स्पो मध्ये सहभागी होणार आहेत.
भारत-आफ्रिका यांच्यातला दुसरा संरक्षण संवाद या प्रदर्शनादरम्यान होणार आहे, ज्यामध्ये 53 आफ्रिकन देशांना आमंत्रित करण्यात येणार आहे. अंदाजे 40 देशांच्या सहभागासह स्वतंत्र हिंद महासागर क्षेत्र (IOR+) परीषद देखील आयोजित करण्यात येणार असून,त्याची आखणी सध्या सुरू आहे. या DefExpo 2022 मध्ये सरकार, उद्योग, इंडस्ट्री असोसिएशन, राज्ये, शैक्षणिक संस्था, यामधील नामवंत तज्ञांचा सहभाग विचार विनिमय, संवाद चर्चा यासाठी करण्याचे नियोजन होत येत असून त्यामुळे संरक्षण सामग्रीच्या पुढील उन्नतीसाठी महत्त्वाचे ज्ञान, कृती -उपक्रम याबाबत आदानप्रदान होईल.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861942)
Visitor Counter : 241