पंचायती राज मंत्रालय

पंचायतींमधील  शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण यावरील राष्ट्रीय कार्यशाळेत यशाची गुरुकिल्ली म्हणून लोकसहभागावर देण्यात आला भर


गावचे सरपंच हे विश्वस्त आहेत आणि  त्यांनी गावाच्या विकासासाठी व्यापक स्वरूपात काम करावे -  कपिल मोरेश्वर पाटील

Posted On: 23 SEP 2022 9:21PM by PIB Mumbai

 

गावचे सरपंच हे विश्वस्त आहेत आणि त्यांच्या गावाच्या विकासाची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर असेल असे  केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील म्हणाले.   गावाच्या प्रगतीसाठी व्यापक स्वरूपात  काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंचायत राज मंत्रालयाने ग्रामीण विकास विभाग आणि पंचायत राज सरकार यांच्या सहकार्याने  पुणे इथे आयोजित केलेल्या 'जल समृद्ध आणि स्वच्छ व हरित  ग्रामपंचायत' या संकल्पनांवर आधारित  पंचायतींमधील शाश्वत विकास उद्दिष्टांचे  स्थानिकीकरण या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.  

सबका साथ सब का विकास सब का विश्वास आणि सब का प्रयास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असून ग्राम विकासाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक काम करण्याची गरज  आहे असे पाटील म्हणाले. यावेळी  उपस्थित प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला आणि अनेक उदाहरणे देऊन आपले विचार मांडले.  लोक सहभागाशिवाय गावाचा विकास अशक्य आहे यावर त्यांनी भर दिला.

दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शाश्वत विकास उद्दिष्टांच्या  स्थानिकीकरणाच्या सर्व नऊ संकल्पना साध्य करण्यासाठी  ग्रामपंचायतींना आवश्यक सहाय्य पुरवण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात येतील. अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी राष्ट्रीय कार्यशाळा हे अतिशय स्वागतार्ह पाऊल असल्याचे सांगून त्यांनी महाराष्ट्र आणि इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात जलसाठा पुनरुज्जीवन या विषयावरची चित्रफीत आणि  चर्चेने  झाली, ज्यात पाणी उपसण्यापूर्वी पाण्याचे पुनर्भरण करण्यावर भर देण्यात आला.  हरियाणाच्या प्रतिनिधींनी गावातील तलावांमध्ये खराब पाणी थेट जाते ही समस्या मांडली  आणि पाणी दूषित होण्याची चिंता व्यक्त केली. तज्ञांनी कमीत कमी गुंतवणुकीत स्वदेशी उपाय सुचवले.

उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्याच्या मुख्य विकास अधिकारी अनिता यादव  यांनी वॉटर टेबल रिचार्ज, तामसा नदीच्या पुनरुज्जीवनाद्वारे सिंचनावरील खर्च कमी करण्याबाबतची कामे सादर केली.

शाळांमधील उष्णतेपासून मुलांना दिलासा मिळावा यासाठी  महाराष्ट्रातील विदर्भ प्रांताच्या सरपंचांनी समितीच्या  सदस्यांसमोर समस्या मांडली . त्यावर तज्ज्ञांनी शाळांच्या छतावर पाईपद्वारे पावसाचे साठवलेले पाणी खेळते ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय सुचवला. तलाव संरक्षणासाठी झटणारे आनंद मल्लिगवाड यांनी उपस्थितांना  पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी पंचायतींचे पारंपारिक जलस्रोत/ तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रोत्साहित केले.

पंचायत राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार यांनी कार्यशाळेच्या चौथ्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले. विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी  लोकसहभाग  ही गुरुकिल्ली असल्याचे नमूद केले. तसेच ग्रामपंचायतींना ग्रामसभांच्या माध्यमातून समाजाचा सातत्यपूर्ण  सहभाग सुनिश्चित करण्याची सूचना केली. नागपूरच्या खुरसापार ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर गोतमारे , साताऱ्याच्या  किरकसल  ग्रामपंचायतीचे सरपंच  अमोल काटकर आणि इतर यात सहभागी झाले होते.

ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांनी 5 व्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले. यात  पुढील  मार्ग, उपजीविका आणि रोजगार निर्मिती, नाविन्यपूर्ण आणि उत्तम  पद्धतींचा अवलंब करून  महसूल मिळवण्यावर भर देण्यात आला.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1861857) Visitor Counter : 218


Read this release in: English , Urdu , Hindi