सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
देशभरात 3200 ठिकाणी सांकेतिक भाषा दिवस साजरा
प्रत्येकाला सांकेतिक भाषेची मूलभूत माहिती असणे आवश्यक
Posted On:
23 SEP 2022 9:12PM by PIB Mumbai
भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (आयएसएलआरटीसी) या, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाअंतर्गत येणाऱ्या संस्थेने, 23 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमधील सी. डी. देशमुख सभागृहात सांकेतिक भाषा दिवस साजरा केला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना 'सांकेतिक भाषा आपल्याला एकत्र आणते’, अशी होती.
संयुक्त राष्ट्र संघाने 23 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस म्हणून घोषित केल्यापासून, आयएसएलआरटीसी दरवर्षी 23 सप्टेंबरला हा दिवस साजरा करते. या वर्षी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय अंमलबजावणी समितीने 23 सप्टेंबर, 2022 रोजी (दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग)सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे आयोजित आणि साजरा केला जाणारा “सांकेतिक भाषा दिवस” स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत करण्यास मंजुरी दिली.
कृती आराखड्यानुसार, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत सांकेतिक भाषा दिवस -2022 साजरा करण्यासाठी सुमारे 3,200 संस्था/संस्था सहभागी झाल्या होत्या. सांकेतिक भाषा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट श्रवण अक्षम व्यक्तींच्या जीवनात भारतीय सांकेतिक भाषेचे महत्त्व याबद्दल सर्वसामान्यांना जागरूक करणे,हे होते.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री प्रतिमा भौमिक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले, वसुधैव कुटुंबकम् (सर्व जग एक कुटुंब आहे) या भारतीय संस्कृतीतील तत्त्वाचा अंगीकार संपूर्ण जग करत असल्याचा आपल्याला अभिमान आणि आनंद वाटतो . सांकेतिक भाषा दिवस जगभरात साजरा करण्यातून त्याची अभिव्यक्ती दिसून येत असल्याचे त्या म्हणाल्या.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, प्रतिमा भौमिक यांनी नमूद केले की दिव्यांग व्यक्ती आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना संपूर्ण सुगमता प्रदान करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्वसमावेशक समाज घडवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मूकबधिरांना सांकेतिक भाषेतून शिक्षण आणि उच्च शिक्षण घेणे सोपे जात असल्याने मूकबधिरांच्या शिक्षणात सांकेतिक भाषेचाही महत्त्वाचा वाटा आहे. हा दिवस देशभरातील सर्व श्रवण अक्षम व्यक्तींना सामाजिकरित्या एकत्र आणतो,असे त्या म्हणाल्या.
आयएसएलआरटीसीने 06 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी ) सोबत एक सामंजस्य करार केला होता. त्याद्वारे श्रवण अक्षमता असलेल्या मुलांसाठी पाठ्यपुस्तके सुलभ करण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावी मधील एनसीईआरटी पाठ्यपुस्तके भारतीय सांकेतिक भाषेत (डिजिटल फॉरमॅट) रूपांतरित केली होती. यावर्षी सहावीच्या एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांची भारतीय सांकेतिक भाषा ई-सामग्री सुरू करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवअंतर्गत, केंद्राने नॅशनल बुक ट्रस्टच्या वीरगाथा मालिकेतील निवडक पुस्तकांची आयएसएल अर्थात भारतीय सांकेतिक भाषा आवृत्ती प्रकाशित केली.
आयएसएलआरटीसी आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त प्रयत्नाने, भारतीय सांकेतिक भाषेतील एकूण 500 शैक्षणिक शब्द निश्चित करण्यात आले. हे 500 शैक्षणिक शब्द हे माध्यमिक स्तरावर वापरले जाणारे शब्द आहेत, जे इतिहास, विज्ञान, राज्यशास्त्र, गणित या विषयांमध्ये नेहमी वापरले जातात.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861855)
Visitor Counter : 244