उपराष्ट्रपती कार्यालय
न्यायव्यवस्थेशी संबंधित वार्तांकन अधिक काळजीपूर्वक करण्याचे उपराष्ट्रपतींचे प्रसारमाध्यमांना आवाहन
प्रविष्टि तिथि:
18 SEP 2022 8:54PM by PIB Mumbai
न्यायव्यवस्थेशी संबंधित बातम्यांचे वार्तांकन करताना अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. न्यायमूर्तींचा सन्मान आणि न्यायव्यवस्थेविषयीचा आदर यांचा कोणत्याही परिस्थितीत भंग होऊ नये ही कायद्याचे राज्य आणि घटनावादाची मूलभूत तत्वे आहेत, असे त्यांनी सांगितले.
ते आज मध्य प्रदेशात जबलपूर येथे पहिल्या न्यायमूर्ती जे एस वर्मा स्मृती व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भक्कम कणा असलेली, न्याय्य आणि स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था, म्हणजे लोकशाही मूल्ये समृद्ध करण्याची आणि त्यांचा प्रसार करण्याची अतिशय सुरक्षित हमी आहे, असं त्यांनी सांगितलं. समाजावर दूरगामी परिणाम करणारे अनेक निर्णय दिल्याबद्दल त्यांनी न्यायमूर्ती वर्मा यांची प्रशंसा केली. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी आणि त्यांना पुरेसे संरक्षण पुरवण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा, विशाखा प्रकरणात त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे निर्माण झाली, असे ते म्हणाले.
न्यायमूर्ती वर्मा यांनी संघवादापासून सर्वधर्मसमभावापर्यंत कायद्याच्या विविध पैलूंवर प्रभाव निर्माण केला आणि स्त्री-पुरुष समानताविषयक न्यायाला चालना दिली, असे जगदीप धनखड यांनी सांगितले. त्यांचे जीवन आणि विचार नेहमीच आपल्याला आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देतील, असे ते म्हणाले.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1860428)
आगंतुक पटल : 197