वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पीयूष गोयल 18-19 सप्टेंबर 2022 रोजी आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या मंत्रीस्तरीय बैठकीचे सह अध्यक्ष पद भूषविण्यासाठी सौदी अरेबियाला देणार भेट

Posted On: 17 SEP 2022 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2022

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, 18-19 सप्टेंबर 2022 रोजी आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी सौदी अरेबियाच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री राजपुत्र अब्दुल अझीझ बिन सलमान यांच्यासह पीयूष गोयल आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्घाटन समारंभाचे सह अध्यक्ष पद भूषवतील.  

ही मंत्रिस्तरीय समिती भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या आराखड्यांतर्गत स्थापन केलेल्या दोन मंत्रिस्तरीय कार्यक्षेत्रांपैकी एक असून, त्याचे सर्वोच्च स्तरावरील नेतृत्व भारताचे पंतप्रधान आणि सौदी अरेबियाचे राजपुत्र यांच्याकडे आहे.

दोन्ही मंत्री आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या विविध संयुक्त गटांच्या कार्याच्या प्रगतीवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. पश्चिम किनार्‍यावरील रिफायनरी प्रकल्प, ट्रान्स-ओशन ग्रीड कनेक्टिव्हिटी, हरित  हायड्रोजन, अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा आणि औषधनिर्माण यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी दोन्ही बाजूंनी कृती योजना तयार होणे अपेक्षित आहे; तसेच युवराज  मोहम्मद बिन सलमान यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये आपल्या भारत भेटीदरम्यान भारतात 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती, त्या गुंतवणूकीला गती देण्याबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे.

या भेटीदरम्यान पीयूष गोयल, सौदी अरेबियाचे वाणिज्य मंत्री डॉ. माजिद बिन अब्दुल्ला अल्कासाबी यांची भेट घेणार आहेत. हे नेते दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांच्या विस्तारावर व्यापक चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.

भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध हे सर्व प्रमुख सहकार्य क्षेत्रांचा समावेश असलेल्या दूरदर्शी धोरणात्मक भागीदारीद्वारे परिभाषित केले जातात. आर्थिक संबंध हा या भागीदारीचा प्रमुख स्तंभ आहे. भारत हा सौदी अरेबियाचा दुसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे तर, सौदी अरेबिया हा भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे.

भारताच्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक देश असलेल्या सौदी अरेबियाच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील गतिमान आणि सतत वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीला आणखी चालना मिळेल आणि सहकार्याच्या नवीन क्षेत्रांचा मार्ग मोकळा होईल ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होतील.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860240) Visitor Counter : 202


Read this release in: English , Urdu , Hindi