भूविज्ञान मंत्रालय
मुंबईमधील जुहू चौपाटी येथे आयोजित सर्वात मोठ्या किनारपट्टी स्वच्छता मोहिमेसह स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहीम संपन्न
स्वातंत्र्याच्या 75 वर्षे साजरी करण्यासाठी प्लास्टिक मुक्त महासागरावर विशेष भर
आरोग्यसंपन्न भारतासाठी स्वच्छ भारतासह सागरी किनारे देखील स्वच्छ ठेवण्याचे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे आवाहन
भारताचा 7500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा भारताचा दृष्टीकोन@ 2047 साकारण्यात महत्वाची भूमिका बजावणार; डॉ. जितेंद्र सिंह यांचा विश्वास
Posted On:
17 SEP 2022 5:55PM by PIB Mumbai
मुंबई, 17 सप्टेंबर 2022
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिना निमित्त आज मुंबईत जुहू चौपाटी येथे आयोजित सर्वात मोठ्या किनारपट्टी स्वच्छता मोहिमेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यावेळी उपस्थित होते. भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता मोहीम राबवली. आयसीजीच्या कर्मचाऱ्यांनी विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसह मुंबईमधील जुहू, गिरगाव, वर्सोवा, उत्तन, मढ, मार्वे, कुलाबा, वांद्रे आणि वरळी या ठिकाणचे समुद्र किनारे स्वच्छ केले.
या प्रसंगी बोलताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले. प्राचीन काळापासून भारतीयांना भूमातेबद्दल नितांत आदर आहे. मात्र आज, पृथ्वी, समुद्र आणि निसर्गाबद्दल लोकांच्या मनातील आदराची भावना कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ जमीनच नव्हे, तर महासागर देखील प्लास्टिक आणि अस्वच्छतेने भरले आहेत, याबद्दल राज्यपालांनी खेद करत किनारपट्टी स्वच्छता मोहीम वर्षभर राबवण्याचे आवाहन केले. राज्यपाल म्हणाले, देश अमृत काळामधून जात असताना आरोग्यसंपन्न भारत निर्माण करण्यासाठी आपण स्वच्छ भारतासह सागरी किनारे देखील स्वच्छ ठेवायला हवेत. ते म्हणाले की ‘स्वच्छ सागर सुरक्षित सागर’ मोहिमेला ‘सुरक्षित भारत’ ही संज्ञा जोडली जाऊ शकते, कारण स्वच्छता देशाला सुरक्षित ठेवते.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की भारताचा 7500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा भारताचा दृष्टीकोन @ 2047 साकारण्यात महत्वाची भूमिका बजावेल. समुद्रामधून 15 हजार टन प्लास्टिक कचरा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ. सिंह यांनी दिली. समुद्र किनार्याच्या स्वच्छतेवर भर देत हे म्हणाले, देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी आतापर्यंत कमी वापर झालेल्या सागरी संपत्तीचा आपल्याला फायदा घ्यायला हवा. ते म्हणाले, भारताची जैव-अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे आणि 2025 पर्यंत ती सुमारे 1500 दशलक्ष डॉलर्सचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे. विविध विभाग आणि संस्थांनी स्वतंत्रपणे काम न करता समन्वित काम करावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असल्याचे सांगून डॉ. सिंह म्हणाले की स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहीम संपूर्ण शासन आणि देश पातळीवर लागू करण्यात आली असून, यामध्ये देशाच्या किनारपट्टीवरच्या सर्व राज्यांमधील जनता सहभागी झाली. डॉ. सिंह यांनी ही माहिती देखील दिली की पुढील काही वर्षांत, भारतीय जसे बाह्य अवकाशाचा शोध घेतील, तसेच ते सागरी तळाचा देखील शोध घ्यायला जातील.
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक व्ही एस पठानिया यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. हे म्हणाले की या मोहिमेत पर्यावरणाप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी विविध संस्था पुढे आल्या, आणि अशा प्रकारे “स्वयंसेवकांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग अत्यंत उत्साहवर्धक होता”. ते म्हणाले की पर्यावरणाची सेवा हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे, यावर आयसीजी या आपल्या संस्थेचा विश्वास आहे.
भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन म्हणाले की, महासागरांच्या आरोग्याची पूर्वीपेक्षा झपाट्याने हानी होत आहे आणि त्यामुळे आपल्या महासागरांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. जर महासागर नसतील, तर मान्सून कमी राहील आणि सागरी जीवसृष्टी देखील बाधित होईल. आपल्या पुढील पिढ्यांसाठी आपल्याला सागरी प्रदूषण रोखावे लागेल असे ते म्हणाले.
खासदार (मुंबई उत्तर-मध्य) पूनम महाजन, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, सतीश मोढ आणि एनसीसी, स्वयंसेवी संस्था आणि तटरक्षक दलाचे स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिवस
स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी आणि सामूहिक स्वच्छता मोहिमचे ‘स्वच्छ भारत अभियान’ यासाठी पंतप्रधानांनी आवाहन केले होते. त्यामुळे यावर्षी आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता (आयसीसी) दिनाला नवा जोश प्राप्त झाला आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी प्लॅस्टिक मुक्त महासागर या संकल्पनेवर विशेष भर देऊन 75 समुद्रकिनाऱ्यांवर 75 मिनिटांसाठी 7,500 किमी लांबीच्या भारतीय किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा उद्देश होता.
दक्षिण आशियाई प्रदेशातील दक्षिण आशिया सहकारी पर्यावरण कार्यक्रम (एसएसीईपी) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (युएनईपी) अंतर्गत दरवर्षी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता (आयसीसी) दिवस जगाच्या विविध भागांमध्ये आयोजित केला जातो. भारतीय तटरक्षक दल 2006 पासून किनारपट्टीवरील लोकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतात आयसीसी उपक्रमांबाबत समन्वय साधत आहे.
भारतीय तटरक्षक दलाव्यतिरिक्त, भूविज्ञान मंत्रालय, पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), केंद्र आणि राज्य सरकारचे विभाग, अशासकीय संस्था (एनजीओ) आणि विविध विभागांद्वारेही आयसीसी-22 चे उपक्रम राबवले गेले.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’ मुळे यंदाचे वर्ष विशेष असल्याने, आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिवसासाठी 04 जुलै 22 पासून म्हणजेच 17 सप्टेंबर 2022 पूर्वी 75 दिवस आधीपासूनच उपक्रमांना सुरुवात झाली. भारतीय तटरक्षक दलाने एकट्या मुंबईतच, एनएसएस आणि एनजीओ माय ग्रीन सोसायटीच्या सोबतीने महाविद्यालये आणि शाळांमध्ये 22 जनजागृती मोहीमा राबवल्या. 7.5 किमीची वॉकथॉन, 750 रोपांचे वृक्षारोपण, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि मोटार सायकल रॅली असे उपक्रम देखील संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर राबवण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध मच्छीमार गावांमध्ये मच्छिमारांबरोबर विशेष सामुदायिक संवाद कार्यक्रम राष्ट्रध्वज फडकावून साजरा करण्यात आला. सरकारने भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही मोहिम नेण्यासाठी 05 जुलै 22 रोजी ‘ईको-मित्रम’ नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. या मोहिमेला मिळालेला उदंड प्रतिसाद हे आपल्या जागृत नागरिकांच्या आयसीसी-22 चा भाग होण्याच्या कटिबद्धतेची साक्ष आहे.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/Rajashree/Vinayak/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860163)
Visitor Counter : 302