भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यात स्वच्छ सागर, सुरक्षित सागर मोहिमेची व्यापक कार्यक्रमाने सांगता


राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोहिमेत सहभाग घेऊन युवकांना सागर आणि सागरी जीवांचे संरक्षण करण्यासाठी केले प्रोत्साहित

गोव्यातील सर्व 35 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा अनोखा विक्रम

Posted On: 17 SEP 2022 1:24PM by PIB Mumbai

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ सागर, सुरक्षित सागर या 75 दिवस चाललेल्या मोहिमेचा आज सर्व भागधारकांच्या मोठ्या सहभागाने समारोप झाला. यानिमित्ताने गोव्यातील सर्व 35 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा अनोखा विक्रम नोंदवण्यात आला. मिरामार सागर किनाऱ्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमाला राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्लई; केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थित होती.

राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देश स्वच्छता मोहिमेचा विचार करता नवनवीन विक्रमी टप्पे पार करत आहे. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या यशानंतर आता आपल्याला समुद्र, महासागरांच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. यातून ‘स्वच्छ सागर सुरक्षित सागर’ हे अभियान राबवण्यात आले. भावी पिढ्यांचा विचार करता समुद्र आणि समुद्रकिनारे संरक्षित करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता हा केवळ उपक्रम न राहता स्वच्छतेची सवय झाली पाहिजे, असे ते म्हणाले. कोविड-19 महामारीच्या काळात आपल्या सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व लक्षात आले.

समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे, त्यामुळे आपल्याला नीटनेटके आणि स्वच्छ समुद्रकिनारे राखावे लागतात, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याची अर्थव्यवस्था सन, सी आणि सँड यावर आधारीत आहे. त्यामुळे नील अर्थव्यवस्थेला (ब्लू इकॉनॉमी) चालना देण्यासाठी सागरी स्वच्छता महत्त्वाची आहे. हे केवळ एक दिवसाचे नाही तर

किनेरी स्वच्छतेसाठी आपल्याला ३६५ दिवस सातत्याने काम करावे लागेल. गोव्याचा 104 किमी लांबीचा किनारा पर्यटकांना आकर्षित करतो, पर्यटन राजधानी ही आपली ओळख ठरण्यासाठी आपल्याला स्वच्छता राखावी लागेल. भावी पिढ्यांकडे आपल्याला ब्लू इकॉनॉमी, स्वच्छ निसर्ग हस्तांतरीत करायचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भूविज्ञान मंत्रालयातील विभाग, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारतीय तटरक्षक दल, 1 गोवा एनसीसी बटालियन, भारत पर्यटन आणि राज्य सरकारचे विविध विभाग, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी या  स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

स्वच्छ सागर, सुरक्षित सागर मोहिमेविषयी

"स्वच्छ सागर, सुरक्षित सागर/स्वच्छ समुद्र किनारा" ही 75 दिवसांची नागरिकेंद्री मोहीम देशभर राबवण्यात आली. ही मोहीम 5 जुलै 2022 रोजी सुरू झाली आणि त्यात 1. जबाबदारीने वागा 2. घरातील कचऱ्याचे पृथ्थकरण आणि 3. योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट ही तीन धोरणात्मक उद्दिष्टे आहेत जी व्यवहार बदलाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायची आहेत.  

 

ही जगातील अशा प्रकारची पहिली आणि सर्वात जास्त काळ चालणारी सागरी किनारे स्वच्छता मोहीम होती, ज्यात प्रचंड जनसहभाग दिसून आला. या मोहिमेविषयी जनजागृती करण्यासाठी आणि समुद्रकिनारी स्वच्छता उपक्रमासाठी स्वेच्छेने नोंदणी करण्यासाठी "इको मित्रम" हे मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले होते.

***

S.Thakur/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1860087) Visitor Counter : 177


Read this release in: English