ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशात पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तुकडा तांदळाच्या निर्यात धोरणात सुधारणा : सुधांशू पांडे

Posted On: 09 SEP 2022 10:04PM by PIB Mumbai

 

देशातील कुक्कुटपालन उद्योग तसेच इतर पशुखाद्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या तुकडा तांदळाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तसेच इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी इथेनॉल निर्मितीसाठी सरकारने  तुकडा तांदळाच्या निर्यात धोरणात सुधारणा केली आहे अशी माहिती   ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

भारतात दरवर्षी सुमारे 50-60 लाख मेट्रिक टन इतका तुकडा  तांदूळ होतो आणि तो प्रामुख्याने कुक्कुटपालन आणि इतर जनावरांसाठी  खाद्य म्हणून वापरला जातो. तसेच धान्य आधारित डिस्टिलरीज  इथेनॉल तयार करण्यासाठी कच्चा माल  म्हणूनही त्याचा  वापर करतात . हे इथेनॉल  पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी  तेल विपणन कंपन्यांना पुरवले जाते.

तांदळाच्या देशांतर्गत किमतीत वाढ होत आहे आणि तांदळाचे  सुमारे 10 दशलक्ष मेट्रिक टन कमी उत्पादन होईल असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे आणि गेल्या वर्षीच्या  याच कालावधीच्या तुलनेत बिगर -बासमती तांदळाच्या  निर्यातीत 11% वाढ झाल्यामुळे तांदळाच्या किमती आणखी  वाढू शकतात.  मात्र गेल्या वर्षी 212 लाख मेट्रिक टन निर्यात झाल्यामुळे भारताकडे अतिरिक्त तांदूळ उत्पादन आहे असे म्हणता येईल.

तुकडा तांदळाच्या निर्यात धोरणात सुधारणा: देशातील कुक्कुटपालन उद्योग तसेच इतर पशुखाद्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या तुकडा तांदळाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तसेच इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी इथेनॉल निर्मितीसाठी सरकारने  तुकडा तांदळाच्या निर्यात धोरणात (HS Code 10064000 अंतर्गत)  9 सप्टेंबर , 2022 पासून सुधारणा केली असून अधिसूचना क्रमांक 31/2015-2020 नुसार  मुक्त वरून 'प्रतिबंधित केले आहे. मात्र 9 ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी काही बाबतीत शिथिल केले आहे, उदा. जिथे या अधिसूचनेपूर्वी मालाची उचल सुरू झाली आहे, शिपिंग बिल दाखल केले  आहे आणि जहाजे आधीच  आली आहेत आणि भारतीय बंदरांवर नांगरली आहेत आणि त्यांना या अधिसूचनेपूर्वी रोटेशन क्रमांक  दिला गेला आहे, या अधिसूचनेपूर्वी सीमाशुल्क विभागाकडे माल पाठवला आहे. आणि त्यांच्या प्रणालीमध्ये त्याची नोंद झाली आहे.

बिगर- बासमती तांदूळ (उकडा  तांदूळ) आणि बासमती तांदळाच्या निर्यात धोरणात कोणताही बदल नाही.

सरकारने उकडा  तांदूळ (HS CODE = 1006 30 10) संबंधित धोरणात कोणतेही बदल केलेले नाहीत, जेणेकरून शेतकऱ्यांना रास्त दर यापुढेही  मिळू शकेल. तसेच जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा लक्षणीय  वाटा असल्यामुळे आयातीवर अवलंबून असलेल्या गरीब देशांसाठी उकडा  तांदूळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल.

त्याचप्रमाणे, बासमती तांदळाच्या  (HS CODE = 1006 30 20) धोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही . कारण बासमती तांदूळ हा प्रीमियम तांदूळ आहे , जो प्रामुख्याने विविध देशांमधील भारतीय समुदाय वापरतात आणि इतर तांदळाच्या तुलनेत त्याचे  निर्यात प्रमाण खूपच कमी आहे.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1858182) Visitor Counter : 185


Read this release in: English , Urdu , Hindi