भूविज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राने मुरगावमध्ये "स्वच्छ सागर सुरक्षित सागर" (स्वच्छ किनारा, सुरक्षित किनारा)अभियाना अंतर्गत राबवली जनजागृती मोहीम
17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 75 समुद्रकिनारे महा स्वच्छता कार्यक्रमात गोव्यातील 5 समुद्रकिनाऱ्यांचा समावेश
Posted On:
08 SEP 2022 6:27PM by PIB Mumbai
पणजी, 8 सप्टेंबर 2022
राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केन्द्र (एनसीपीओआर) आणि मुरगाव बंदर प्राधिकरण (एमपीए), विज्ञान प्रसार आणि दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय यांनी स्वच्छ सागर सुरक्षित सागर (स्वच्छ किनारा, सुरक्षित किनारा) मोहिमे अंतर्गत मुरगाव येथे गुरुवार, 8 सप्टेंबर 2022 रोजी जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. या मध्ये वॉकथॉनचा समावेश होता, यात विद्यार्थी आणि शिक्षक उत्साहाने सहभागी झाले. त्यानंतर महासागरांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्याचे महत्त्व या विषयावर व्याख्यान झाले.
या मोहिमेनंतर, एनसीपीओआर मधील शास्त्रज्ञ डॉ. व्ही सकथी वेल सामी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. आपल्या किनारपट्टी आणि महासागरांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेण्याचा संदेश देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. लोकांनी याची जबाबदारी स्वीकारणे तसेच किनारे आणि महासागराची स्वच्छता सुनिश्चित करणे, जेणेकरून पुढच्या पिढीला स्वच्छ समुद्रकिनारे, स्वच्छ पाणी आणि चांगल्या दर्जाच्या समुद्री उत्पादनांचा आनंद घेता येईल हा मोहिमेचा मूळ हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यातील 5 समुद्रकिनाऱ्यांवर 17 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त आयोजित केलेल्या महा स्वच्छता मोहिमेचीही माहिती डॉ. सॅमी यांनी दिली. हा कार्यक्रम केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय (एमओईएस), केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय (एमओईएफसीसी), भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), शैक्षणिक संस्था आणि इतर सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेचा भाग असेल. देशभरातील 75 समुद्रकिनाऱ्यांवर हा कार्यक्रम राबवला जाणार असून स्वच्छ सागर सुरक्षित सागर या 75 दिवस चालणाऱ्या मोहिमेचा समारोपाचा अर्थात 75 वा दिवस असणार आहे. गोव्यातील मिरामार, बायना, बोगमलो, वेल्साओ आणि कोलवा समुद्रकिनाऱ्यांवर 17 सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
पार्श्वभूमी
स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहीम
"स्वच्छ सागर, सुरक्षित सागर/स्वच्छ किनारा सुरक्षित सागर" ही मोहीम सागरी स्वच्छतेची नागरीकांच्या नेतृत्वाखालील 75 दिवसांची मोहिम आहे. ही 5 जुलै 2022 रोजी सुरू झाली. वर्तन बदलाद्वारे संवर्धन करण्यासाठी यात 3 धोरणात्मक अंतर्निहित उद्दिष्टे आहेत. ती परिवर्तन आणि पर्यावरण केन्द्रीत आहेत. मोहिमेची तीन मूलभूत उद्दिष्टे आहेत 1. जबाबदारीने वापर 2. घरातील कचरा वर्गीकरण आणि 3. जबाबदारीने विल्हेवाट लावणे.
एनसीपीओआर
राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन (एनसीपीओआर) ही भारतातील प्रमुख संशोधन आणि विकास संस्था आहे. ध्रुवीय आणि दक्षिणी महासागर क्षेत्रातील देशाच्या संशोधन कार्याची जबाबदारी ती पेलत आहे.
N.Chitale /V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1857842)
Visitor Counter : 190