गृह मंत्रालय
आयएनएस विक्रांतचे राष्ट्रार्पण झाल्याबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून देशवासीयांचे अभिनंदन
आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभिमान असलेल्या आणि वसाहतवादी इतिहासाच्या खुणा पुसून टाकणाऱ्या नव्या भारताच्या उदयाचे प्रतिबिंब या नव्या ध्वजात दिसत आहे.
आपल्या दूरदृष्टीने सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी एक शक्तिशाली आरमार उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरित असलेल्या या मुद्रेमुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या समृद्ध आणि वैभवशाली संस्कृतीचा अभिमान वाटेल
Posted On:
02 SEP 2022 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2022
आयएनएस विक्रांतचे राष्ट्रार्पण झाल्याबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले आहे.
अमित शाह यांनी या संदर्भात विविध ट्वीट्सच्या मालिकेतून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय नौदलाच्या नव्या मुद्रेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केल्यामुळे आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस आहे. ही नवी मुद्रा एका नव्या भारताचे प्रतिबिंब आहे ज्याला आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभिमान आहे आणि तो वसाहतवादी भूतकाळाच्या खुणा पुसून टाकत आहे, असे शाह यांनी म्हटले आहे.
आपल्या दूरदृष्टीने सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी एक शक्तिशाली आरमार उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या या मुद्रेमुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या समृद्ध आणि वैभवशाली संस्कृतीचा अभिमान वाटेल, असे शाह यांनी सांगितले.
याप्रसंगी मी पंतप्रधानांचा ऋणी आहे आणि सर्व भारतीयांचे अभिनंदन करत आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी आपल्या देशाच्या संरक्षण दलांना जगातील सर्वात आधुनिक आणि प्रगत बनवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत, असे अमित शाह यांनी सांगितले. याच मालिकेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रार्पण केलेली आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका भारताच्या अविचल विश्वासाला पंख देत आहे आणि नव्या भारताच्या स्वदेशी निर्मितीच्या सामर्थ्याचे आणि बांधिलकीचे दर्शन घडवत आहे.
* * *
Jaydevi PS/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1856424)
Visitor Counter : 168